कविता न कराव्या...

प्रेरणा : "समिधाच सख्या या"  (कविवर्य कुसुमाग्रजांची  क्षमा मागून)

भ्रांतिष्ट कुणीसा कवी करी ही कविता
भेटते जिच्यातुनि त्याची जीवन-वनिता

तडतडे, बडबडे, मुके न दे, फेटाळे

कवी अखंड पाहे वाट प्रेरणेकरिता !

लडिवाळ कान्त तो ही सोडून निघाली
अन्‌ शोधित प्रियकर रानातून ढमाली

नच रम्य बांधणी, सुडौल अथवा घाट

तोंडावर तुरळक लव अंकुरुनी आली !

नव-कवितेच्या या फसव्या शब्दांखाली
ही कॉंग्रेस गवतापरि बहरली, व्याली

वाचे न कुणी, छापे न कुणी संपादक,

"या जळोत कविता -- यांस कुणी ना वाली !"

कविता न कराव्या; हट्ट अता सोडावा,
कोठून कथेपरि पैसा त्यात मिळावा ?

जात्याच भिकारी, एकच मज आकांक्षा,

ना मिळोत पैसे, क्षणभर व्हावी "वा, वा !"