माझा जन्म नागपुरचा पदवी पर्यंत शिक्षण नागपुरमध्ये. त्याकाळची एच. एस एस सी १९६७ मध्ये सोमलवार हायस्कुल, रामदासपेठ, नागपुर व बी. ए. नागपुर महाविद्याल येथून १९७० ला. घरची परिस्थीती बेताची असल्याने कुठेतरी चिटकून कुटुंबाचा भार खांद्यावर घेण्याच्या उद्देशाने १ महिना गोल्ड स्पॉट फैक्टरीमध्ये १२५ रुपये पगारावर टाईम किपरची नोकरी केली. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न सुरुच होते. मग नोकरी लागेपर्यंत एम ए करायचे असे ठरवून मॉर्नीग क्लासेस जॉईन केले आणि दुपारच्या वेळी एक नागपुरचे आर्कीटेक्ट कडे पुन्हा १२५ रुपये पगारावर त्यांचा मैनेजर म्हणून रुजू झालो. दरम्यान ऑगष्ट १९७० मध्ये मुंबईला येउन ए. जी. ऑफीस मध्ये ऑडीटर(यू डी सी) साठी परीक्षा दिली आणि त्यात पास होउन ७ नोव्हेंबर १९७० ला मरीन लाईन्स चे ऑफिसात रुजू झालो. १९७१ मध्ये संपुर्ण ऑफिस नागपुर ला शीफ्ट झाले आणि मग आपल्या गावी आलो. बैंकेतल्या नोकरीचे त्याकाळी खुप फैड होते त्यामुळे तिकडे प्रयत्न सुरू झाले आणि परीक्षा व ईटर्व्युचे सोपस्कार पार करून १० डिसेंबर १९७१ ला बैंकेत रुजू झालो. मध्यम वर्गिय रिवाजाप्रमाणे १९७५ मार्च मध्ये लग्न झाले. १९७५ डिसेंबर ला मुलगा झाला आणि १९७६ च्या नोव्हेंबर मध्ये तो वारला. आणि आमच्या शनी महादशेला सुरुवात झाली. मुलाच्या विरहाने मग मी अंबाला येथे बदली मागीतली आणि मग १९७६ ते १९८४ ईतका काळ अंबाला, फिरोजपुर व होशियारपुर येथे घालवली. दरम्यान १९७७ ला एक मुलगी झाली आणि जिवनाला एक अर्थ मिळाला. सुरवातीपासुनच आमचा संसार म्हणजे आई वडील व लहान लग्नाची बहीण या जवाबदारीसकट सुरू झाला आणि तुटपुंज्या पगारात जे काही सुख घेता आले ते कमी आणि पर्वताएवढे दुःख अशा परिस्थीतित संसार मेड फॉर इच अदर झाला तरच नवल. आयुष्यात आलेले सुखाचे क्षण म्हणजे पदोन्नत्या १९७८-१९८४-१९८८-१९९२ आणि २००२. मुलगी शिकली सवरली तिचे लग्न झाले २००३ मध्ये आणि आम्ही देखिल बैंकेच्या जंजाळातून मुक्त होण्याचे ठरवून ऐच्छीक निवृत्त झालो. दरम्यान मुख्य गोष्ट म्हणजे १९८९ मध्ये बैकेच्या कर्जाने घर बांधले. पण त्या आधी १९८४ च्या पदोन्नती मुळे होशियारपुर(पंजाब) हून धामणगावला बदली झाली. मुलीच्या शिक्षणाची आबाळ होउ नये म्हणून जिल्ह्याच्या ठीकाणी अम्ररावतिला घर केले आणि आमचे अप डाउन सुरू झाले ते कायम विस वर्षे. १९८९ मध्ये घराचा वास्तू डोळेभर पाहून पिताश्री नि इहलोक सोडला. नातवासोबत काही काळ घालवून मातोश्री देखील १९९७ मध्ये निजधामास गेल्या.
आई आणि मुलिची माया अजोड असते त्यात पती निवृत्त झाल्यावर प्रेमाचा ओलावा पतिपेक्षा नातवंडाकडे साहजिकच वाहतो. आपण हि काहिच करावयास नसल्याने खिन्न असतो. मुलिच्या बाळंतपणासाठी पुण्याला गेलेली पत्नी मग तिथेच रमली. मी ही एक महिना पुणे आणि एक महिना अमरावती असे अप डाउन केले. घराचा मोह सुटत नव्हता. आयुष्याच्या २० वर्षाच्या आणि सगळ्या नातेवाईकांसोबत घालविलेल्या आनंदी तसेच दुःखी क्षणांच्या आठवणी त्या घरात साठविल्या होत्या. ते घर बांधतांना झालेली आर्थीक कुचंबणा ओढाताण, त्यासाठी सहन केलेला मानभाविपणा तरिही त्याची झळ कुटुंबाला लागू नये त्यासाठी केलेला आटापिटा हे आठवून ते घर जणू माझ्याशी बोलत आहे, हसत आहे आणि भावविवश होत आहे असा भास मी तिथे एकटा असुनही होत असे आणि माझे मन रमत असे. त्या घरात एकटा असुनही मला एकटे पणा कधिच जाणवला नाही. अमरावतित २० वर्षे मैनेजर म्हणून घालवल्यामुळे मित्रपरिवार प्रचंड होता. जो मित्रात रमतो तो कुटुंबाशी थोड्या फार प्रमाणात तुटतो किंवा असेही असेल की कुटुंबाशी तार न जुळल्याने माणुस मग मित्रांमध्ये रमतो. काही का असेना पण माझी नाळ त्या घराशी जुळली होती.
पण विधिलीखित वेगळे होते. मुलीवर लळा होताच त्यात तिला मुलगी झाली. नोकरीत असतांना तिचे बालपण मी भोगू शकलो नाही ते मग मी तिच्या मुलित शोधु लागलो. त्यात रमलो आणि खुपसा अटैच पण झालो. मुलगी देखिल खोटे खोटे रागावून म्हणायची "पप्पा, तुम्ही माझे असे लाड कधिच केले नाही. " मनात म्हणायचो बेटा, त्याकाळी जे हरवले होते तेच तर आता गोळा करतो आहे.
माझे एकटे नागपुरला राहणे आणि पत्नी मुलीकडे याकडे समाज , नातेवाईक वेगळ्या दृष्टीने पाहतात. मला मात्र असे वाटते कि संसार संपल्यानंतर जर पतिपत्नी मध्ये जिव्हाळा नसेल तर त्यांनी आपले सुख आवडिच्या गोष्टीत शोधावे. बायकोला संसार, नातेवाईक ईकडे ओढा तर मला एकांत, आठवणी, वाचन याची आवड. त्यामुळे ती मुलीच्या संसारात रमली तर मी माझे अम्ररावतीचे घर, वाचन आणि ज्या नातेवाईकांपासून दुर झालो होतो त्यांच्या भेटी यात रमलो. नवऱ्याच्या नातेवाईकाशी बहुतांश बायकांचे जितके जिव्हाळ्याचे संबध असतात त्यामुळे आपले बहिण, चुलत भाउ, मामे भाउ, मावस भाउ हे दुरावतात. मी निव्रुत्त आयुष्यात त्यांचेशी जवळीक साधण्यात रमलो. मुख्यत्वे करून मोठी बहिण तीच्या मुली.
पण मग माझ्या एकुलत्या एक मुलीच्या आग्रहास्तव मी अमरावतीचे घर विकून पुण्यात घर घेण्याचा निर्णय घेतला. मुलगी व जावई व्यवसायात व मुलीचे सासरे व सासू बाई आपल्या गावातिल शेतीच्या व्यापात त्यामुळे तिला आईची नितांत गरज होती. बायको जरी मुली जावयाकडे राहत असली तरी तिचे पुण्यात हक्काचे घर असणे आवश्यक आहे हा विचार माझे मनात होता. मला लष्करच्या भाकरी भाजण्यात विषेश रुची त्यात माझी फिरस्ती. मुलगी जावई नात कुठे फिरावयास गेले तर आई-सासू ची अडचण भासू नये त्यामुळे पुण्यात घर असणे सर्व दृष्टीने सोईस्कर होते. माझ्या आयुष्यात माझा मुलगा, वडील आणि आई गेले तेंव्हा दुःख झाले त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त दुःख मला माझ्या अमरावतीचे घराचा करार होवून ईसारापोटी घेतलेले टोकन चे ५००० रुपये घेताना झाले. एका निर्जीव वास्तुवर ईतके प्रेम जडू शकते याचे प्रत्यंतर मला तेंव्हा आले. त्यानंतर घराचा ताबा देणे, आपले सामान ट्रक मध्ये चढवीणे हे सर्व सोपस्कार माझी मुलगी, जावई व पत्नी यांनीच केले. रजिस्ट्रार चे ऑफिस मध्ये सह्या केल्यानंतर म्हणजे ७ एप्रिल २००८ मला त्या घराकडे फिरकावयाचेही धाडस झाले नाही. जणू काही मि तिकडे गेलो तर मीच कोसळून पडेन अशी मला धास्ती होती.
पुण्यात येउन मला आता दोन वर्षे होत आहेत. पण या फ्लैट च्या भीतींही मला परक्या वाटतात. दिवसातून एकदा मुलीकडे जाउन नातीसोबत २-४ तास घालवितो व परत फ्लैट वर रात्र काढून सकाळची कामे आटोपून पुन्हा दुसऱ्या दिवशी नातीकडे जातो. हा दिनक्रम सतत दोन वर्षे सुरू आहे पुढेही राहील नात मोठी होइ पर्यंत. मग तिला आबांची गरज राहणार नाही. तिच्या मैत्रीणी तिचे जग यात तिला माझा विसर पडेल ही कल्पना देखील किती भयावह . माझ्या घराच्या भिंती जितक्या जिवंत वाटायच्या तितक्याच फ्लैटच्या भीती यांत्रिक वाटतात. म्हणुनच मग जिवंत विषय शोधून त्यात रमण्याचा निश्चय करून त्याच्या आनंदात आनंद व त्यांच्या दुःखावर फुंकर घालून काहितरी समाधान मिळवून पुढे जाणे हे ध्येय ठेवले आहे. कोणीतरी कुठेतरी सहप्रवासी मिळेल या आशेवर.