सांजा (तिखट शिरा)

  • जाडा रवा १ वाटी.
  • कांदा १ मध्यम
  • बटाटा १ मध्यम
  • भाजलेले शेंगदाणे २ टेबल स्पून (सोलून)
  • हिरवी मिरची २-३
  • मोहरी, फोडणी साठी, १ टी स्पून
  • उडदाची डाळ १ टी स्पून
  • आलं १ इंच
  • कोथिंबीर २ टेबल स्पून
  • तूप १ टेबल स्पून
  • तेल २ टेबल स्पून
  • कढीलींब ८ - १० पानं.
  • हळद पाव चमचा
  • मिठ चवीनुसार
  • साखर १ टी स्पून
  • लिंबू अर्धे
  • किसलेले सुके खोबरे, कोथिंबीर सजावटी साठी.
३० मिनिटे
दोघांना पोटभर

एका कढईत तुप गरम करून रवा मंद आचेवर, खमंग वास येई पर्यंत, परतावा. बाजूला काढून ठेवावा.

कांदा बारीक चिरून घ्यावा. मिरच्या, कोथिंबीरही चिरून घ्यावी. आलं खलबत्यात बारीक कुटून घ्यावे. (खलबत्ता नसेल तर बारीक चिरून लाटण्याने वाटून घ्यावे.)

बटाट्याच्या पातळ चतकोर चकत्या करून घ्याव्यात. (काचऱ्या)

एक वाटी पाणी गरम करत ठेवावे. त्यात कुटलेलं आलं, साखर, मिठ, अर्ध्या लिंबाचा रस घालावा.

पुन्हा कढईत तेल गरम करून मोहरी टाकावी, मोहरी तडतडली की उडीद टाकावेत. उडीद लालसर झाले की मिरच्यांचे तुकडे, शेंगदाणे आणि कढीलींब घालावा. पाठोपाठ बटाट्याच्या चकत्या (काचऱ्या) घालून जरा परतून झाकण ठेवावे. आंच मंद करावी.

बटाट्याच्या चकत्यांना (काचऱ्यांना) एक दणदणीत वाफ दिली की झाकण काढून रवा मिळसळावा आणि परतून घावे. आता गॅस बंद करून, गरम करून ठेवलेले पाणी घालून, रवा व्यवस्थित मिसळून घ्यावा. कुठेही कोरडा राहता कामा नये. रवा व्यवस्थित मिसळला गेला की अत्यंत मंद गॅसवर कढई ठेवून झाकण ठेवावे. रवा व्यवस्थित शिजला की कलथ्याने (उलथण्याने) तो अगदी मोकळा करून घ्यावा. आणि पुन्हा झाकण ठेवून थोडा वाफवावा. आता गॅस बंद करावा.

बशीत काढायच्या आधी पुन्हा एकदा कलथ्याने (उलथण्याने) मोकळा करून घ्यावा आणि बशा भराव्यात.

वरून सुक्या खोबऱ्याचा किस, कोथिंबीर टाकून सजवावा. बरोबर लिंबाची फोड द्यावी. 

शुभेच्छा....!

यावर आवडत असेल तर किसलेल्या सुक्या खोबऱ्या ऐवजी कच्चा टोमॅटो चिरून टाकावा.

सांजा गरम गरम खावा. खाताना, गॅस वर चहा करायला ठेवण्यास विसरू नये.

ति. आई