लग्न म्हण्टलं की आनंद, उत्साह, मौजमजा, धमाल, रुसवेफुगवे या गोष्टी अनिवार्य असतात. कालानुरूप लग्नातल्या वातावरणातही बराच फरक जाणवायला लागलाय. पुलंच्या व्यक्ती आणि वल्लीतील नारायण या व्यक्तिचित्रात वर्णन केलेलं लग्न आणि मुख्यत्वेकरून नारायण ही व्यक्ती या गोष्टी आता दुर्मिळ झाल्या आहेत. अनेक लग्न जमवण्याचा आणि लग्नात स्वतःला झोकून देऊन काम करण्याचा अनुभव हीच फक्त जमेची बाजू असणारी नारायणासारखी माणसं आता जवळजवळ दिसतच नाहीत. काही वेळा दिसली तरी त्याना आता फारसं कोणी विचारीत नाही. अशा माणसांच्या हस्तक्षेपाला अनावश्यक लुडबूड किंवा आगाऊपणा असं म्हणण्याची आता पद्धत आहे. असो. मध्यंतरी राजेशला त्याच्या एका अतिशय जवळच्या मित्राच्या लग्नात नारायणी हस्तक्षेप करण्याची नामी संधी चालून आली. चावटपणा आणि आगाऊपणा ही त्याची जमेची बाजू असल्यामुळे अशी संधी सोडण्याचा मूर्खपणा त्यानी केला नाही.
मनोज राजेशचा अगदी लहानपणापासूनचा जिवलग मित्र. आय आय टी मधून एमटेक आणि आय आय एम मधून एम बी ए झालेला मनोज आणि आय आय टी सारख्या संस्थेत नुसतं जाण्याचं धाडस सुद्धा कधीही न करणारा राजेश अशी ही विलक्षण मैत्री अजूनही टिकून होती. इतकी जीवलग मैत्री असल्यावर मनोजच्या लग्नापूर्वी दोन तीन दिवस जर राजेश त्याच्याकडे सारखा ये जा करत असेल तर त्यात गैर काय?
'काय रे तुझं काय काम आहे त्याच्याकडे? अगदी उठता बसता जायलाच हवं का? चांगले गब्बर आहेत की मनोजच्या घरचे. तू गेला नाहीस मदतीला तर मनोज बोहल्यावर चढायचा थांबणार आहे का? मुलाच्या बाजूला कसली आली रे कामं? त्या लोकाना बरा गडी मिळाला राबायला.' राजेशच्या उत्साहावर त्याच्या घरच्या मंडळींची ही अशी प्रतिक्रिया. प्रतिक्रिया तशी फॉर्मलच होती. ती ऐकून राजेश काही जायचा थांबणार नव्हता. मनोजच्या घरी लग्नाआधि दोन दिवस काही खास मोठी गर्दी वगैरे नव्हती. जेमतेम दहा माणसं. त्याचे किशोर काका, नीला काकू आणि त्यांच्या दोन मुली, मनोज आणि त्याचे आई बाबा, एक आत्या आणि तिचे मिस्टर, पोळ्या करणारी बाई आणि राजेश असे अकरा जण. मनोजची सुलू ताई तिच्या गुजराथी नवऱ्यासह सिडनीहून आणि काकांचे मोठे चिरंजीव जयदीप त्याच्या सिंधी बायकोसह कॅनडाहून लग्नाच्या आदल्या दिवशी उपकार केल्यासारखे त्यांचा मुखचंद्रमा दाखवायला येणार होते. त्यांच्या अतिशय बिझी शेड्यूल मधून त्यानी दोन दिवस कसे काढले, या दिवसात इंडियाची टिकिटं मिळणं कसं कठीण आहे यावर अजून एकदाही भारताच्या बाहेर न पडलेले मनोजचे आईवडील आणि काका काकू डिस्कशन करीत होते. मनोज राजेश आल्यापासून जो फोनवर होता तो होताच. काकांच्या दोन कार्ट्या सारख्या मोबाईलवर काहीतरी करत होत्या आणि एकूण आम्ही खूपच बिझी आहोत हे दाखवत होत्या. दिसायला बऱ्या होत्या. म्हणजे गोरेपण हे एकच सौंदर्याचं लक्षण मानलं तर दिसायला सुंदर होत्या.
मध्येच आत्या मनोजच्या आईला म्हणाली, 'काय ग आज एकंदरीत जेवणाचा काय बेत आहे?' त्यावर मनोजची आई म्हणाली, 'डाळिंब्या, भात, सुरळीच्या वड्या, रस मलाई आणि कटलेटस पण मागवणार आहे 'वैद्य सुग्रास आहार' कडून. उद्या आता सगळी मंडळी आली की मग रात्री मागवूया पंजाबी वगैरे काहीतरी.' मेनू ऐकून राजेशला जरा बरं वाटलं. चला नाहीतरी आता पावणे बारा झाले आहेतच. इथेच जेवायला थांबवलं तर बरं आहे. तेवढ्यात मनोजच्या आईनी राजेशला 'आता इथेच जेवायचं आहे बरं का राजेश. लग्नघर आहे ना' असं सांगितलं. चला आजचा बेत तर झकास आहे. राजेश पानावर बसला. सुदैवानी मनोजचा फोन संपला (फोन का बॅलन्स !) आणि तोही राजेशच्या बाजूला बसला. वाढायला सुरूवात झाली. भात आला पण डाळिंब्यांचा अजून पत्ता नाही. मग भजी आली. अरे सुरळीच्या वड्या होत्या ना. कटलेटस पण दिसत नाहीत. लगेच पालकाची ताकातली पातळ भाजी आली. राजेशला काही कळत नव्हतं. तेवढ्यात आत्यानी मनोजच्या आईला विचारलं, 'अगं डाळिंब्या होत्या ना?' आतून आवाज आला, 'अहो व्हन्स, तो रात्रीचा मेनू आहे.' बोंबला ति च्यायला, राजेश मनात म्हणाला. भात, पातळ भाजी, घोसाळ्याची आणि कोबीची भजी, पोळी आणि सिमला मिरचीची पीठ पेरून केलेली भाजी हे लग्नघरातलं जेवण झालं आणि राजेश हात धुवायला उठला. मग त्याची मनोजच्या काकांशी, आत्याशी आणि तिच्या मिस्टरांशी हल्लीची शिक्षणपद्धती, परदेशगमन, ग्रीन कार्ड, सध्याचा डॉलरचा भाव, टेक्नॉलॉजी, सॉफ्टवेअर, रिसेशन, मॅनेजमेंट या विषयावर चर्चा चालू झाली. राजेश इंजिनिअर असून सुद्धा अजून भारतातच राहत असल्यामुळे त्याचं शिक्षण, टॅलंट हे कसं फुकट चाललेलं आहे याकडे चर्चेनी वळण घेतलं. समाधानाची बाब एकच की हे सगळे लोक राजेशमध्ये टॅलंट आहे असं म्हणत होते.
लग्नदिवस उजाडला. मनोजची ताई आणि तिचा नवरा बोलायला अतिशय चांगले होते. नवरा तर उत्तम मराठी बोलत होता. मनोजचे बाबा उगीचच मराठी टिपिकल टोनमध्ये त्याच्याशी गुजराथीत 'केम छो बाबा, भद्दा मजामा छो ना हा हा हा..' असं काहीतरी बोलत आपली कशी गुजराथीवरपण हुकुमत आहे, उगाच नाही च्यायला... असं दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते. काकांची ती सोय नव्हती. कारण सून सिंधी असली तरी सिंधी म्हणजे पापड आणि गिडवानी, जेठमलानी, लखानी असं आडनावात शेवटी 'नी' असणारे लोक इतकीच त्याना सिंध्यांबद्दल माहिती होती. सिंधी भाषा ही कोणा सिंध्यानीही बोलताना त्यानी कधी ऐकली नव्हती. त्यांच्या जयदीपला सारखे कुठून कुठून फोन येत होते. त्याची बायको त्याला 'हे जय, कॉल फॉर यू.' असं इंग्रजीतून सांगून आपण केवळ दिसायला भारतीय आहोत असं भासवत होती. भारतात आल्यावर देखील मराठीत/हिंदीत विचारलेल्या प्रश्नाला मोडक्या तोडक्या का होईना पण इंग्रजीतच उत्तर देण्याचं व्रतच जयदीपच्या बायकोनी घेतलं होतं. तिचं इंग्रजीवरचं प्रेम पाहून काकाना मात्र प्रचंड कौतुक वाटत होतं. स्टेजवर गुरुजींचे मंत्रोच्चार चालू होते. समोर मांडलेल्या खुर्च्यांवर मनोजचे काका, आत्या आणि तिचे मिस्टर बसले होते. तिथे सुद्धा काका आणि आत्याचे मिस्टर इमिग्रेशन, रिसेशन या विषयावर वाद घालत होते.
राजेश मात्र सकाळपासून बारीक सारीक कामं अगदी नारायणाच्या निष्ठेनी करीत होता. मनोजच्या गाडीची सजावट, त्याचा सूट सांभाळणं, त्याला तयार करणं, त्याला येणारे फोन घेणं, काही बाहेरून आणायचं असेल तर घेऊन येणं, अगदी गेटवर उभं राहून स्वागत वगैरे सगळं तो एकहाती बघत होता. खरं तर ही कामं काही फार जास्त होती अशातला भाग नाही. पण एक तर मनोजच्या घरी कामाची माणसं (उपदेश करायचं सोडून काम करतील अशी माणसं) थोडी होती.
त्यात भरीस भर म्हणून 'ते कुठले बसलेत यायला इतक्या लांबून' असं वाटणाऱ्या आणि लखनऊला राहणाऱ्या मनोजच्या मावशी आणि तिच्या नवाबी फॅमिलिचं आदल्या दिवशी रात्री अचानक आगमन झालं होतं. त्याना आणायला कोणाला सवड नसल्यामुळे राजेशच गेला होता. मनोजची मावशी आणि तिचं कुटुंब मिळून जवळ जवळ आठ नऊ लोक होते. एवढे लोक आणि घरात जागेची कमतरता असल्यामुळे त्याना डायरेक्ट हॉलवरच पिटाळायचं असं मनोजच्या घरच्यानी राजेशला सांगितलं होतं. ही सगळी मंडळी हॉलवरच झोपायला होती. दुसऱ्या दिवशी लग्न वैदीक पद्धतीचं होतं. फक्त आवश्यक आणि मॅंडेटरी असलेलेच विधी सकाळी होणार होते आणि लगेचच लग्न लागणार होतं. लखनऊच्या नवाबी कुटुंबाला हा सगळा प्रकार परिचयाचा नव्हता. ते आपले सकाळी साडेसात आठच्या सुमारास उठले. आरामात त्यांचा कारभार चालू होता.
राहण्याची सोय कार्यालयाच्या तळ मजल्यावर आणि लग्न पहिल्या मजल्यावर होतं. गुरूजीनी वैदीक पद्धतीतही अजून काहीतरी शॉर्टकट मारल्यासारखा वाटत होता. तेवढ्यात मुलिच्या मामानी काहितरी गुरूजीना विचारलं, 'अहो गुरुजी, लज्जा होम झाला का हो? काही कळलाच नाही.' गुरूजीना चढायला आयताच बकरा मिळाला. सकाळी पाच पासून ते घराच्या बाहेर पडले असावेत आणि त्यामुळे त्यांची झोप बहुतेक पूर्ण झाली नसावी. ते खेकसलेच, 'लज्जा होम झाला कधीच. कळला नाही काय म्हणता? न कळायला तो काय सिनेमा आहे का? कळला नाही म्हणे, आता कॅसेट रिवाइंड करा म्हणजे दिसेल. मला शिकवताहेत. काय हो लज्जा होम तुम्हाला माहीत का आम्हाला? पुरोहित कोण तुम्ही का आम्ही?' मामा त्यानंतर डायरेक्ट जेवणाच्या वेळेसच राजेशला हसताना दिसला. त्याला हसताना पाहून 'गुरूजी घरी गेले वाटतं' असा विचार राजेशच्या मनात आला. थोड्याच वेळात गुरूजीनी अनाउन्समेंट केली. 'हम्म, आता मंगलाष्टकं होतील दहा मिनिटानी. बोलवा सगळ्याना.' गुरूजी बहुतेक आदल्या रात्री अंत्येष्टी करून आले होते आणि त्याच स्टाईलमध्ये म्हणजे, 'हम्म चला आता उचला. मुलाला बोलवा.' असंच बोलत होते.
तेवढ्यात राजेशनी सहज वळून मागे पाहिलं तर मनोजच्या मावशीचे नवाबी मिस्टर चट्ट्यापट्ट्याची हाफ पॅंट आणि वर बनियान घालून त्या वेशातच लग्नाच्या स्टेजकडे येताना दिसत होते. हा काय प्रकार? काही कळेना. ते स्टेजच्या आणखी जवळ येण्याआधीच राजेश धावत गेला आणि त्यानी विचारलं, 'काय हो काय झालं? काही हवंय का?' तोंडात ब्रश असल्यामुळे ते कसेबसे बोलत होते, 'अरे बेटा, वहां नीचे सारे संडास फ़ुल हैं यार. तो मैने सोचा उपर चले जाते हैं. यहां भी तो होगा ना संडास.' इथे आता अक्षता पडायची वेळ आली आणि अजून यांचं संडासच चालू आहे. राजेशनी त्याना हवी असलेली जागा दाखवली आणि तो खाली एक चक्कर मारायला गेला. बघतो तर सगळे लखनवी नवाब आरामात आंघोळ वगैरे न करता गप्पा मारत, चहा पीत बसले होते. त्यानी मावशीना जाऊन म्हण्टलं, 'अहो मावशी, चला वर. लग्न लागेलच इतक्यात.' जणू काही त्यानी बॉंबच टाकला असे अस्वस्थ होऊन मावशीच्या सासूबाई एकदम अंगावरच आल्या. 'काय? लग्न लागेल? अरे फक्त साडेनऊच झालेत ना? इतक्यात लग्न?' 'हो. अहो आजी, नऊ चाळीसचा मुहूर्त आहे. दहा मिनिटं आहेत फक्त.' राजेश आवाजात शक्य तितकं मार्दव ठेवून म्हणाला. त्यावर लखनवी नवाबांची आपापसात बडबड सुरू झाली. 'काय ही मुंबईतली लग्न. सगळा नुसता उरकाउरकीशी कारभार. हमारे यहां तो पहले दिन संगीत, फिर मेहेंदी, कितने फंकशन्स होते है. अरे यहां ऐसाही होता है. शादीमे बुलाया यही बहुत बडी बात है.' जास्त काही ऐकून डोकं फिरवून घेण्यापेक्षा राजेश तिथून निघाला.
जेवणाची वेळ झाली. बुफे दुसऱ्या मजल्यावरच्या प्रशस्त हॉलमध्ये होता. मटर पनीर, वेज बिरयाणी, रस मलाई, पुऱ्या, रूमाली रोटी आणि इतर अनेक गोष्टी ज्या स्टॅंडर्ड बुफेमध्ये असतात त्या होत्या. तरी दोन्हीकडची मिळून साधारण पाचशे साडेपाचशे माणसं असतील. बाकिच्यांची जेवणं आटपून मानाची पंगत शेवटी बसली. मानाच्या पंगतीला कोण कोण बसणार यावर वरपक्षातील खोलीत खलबतं चालू होती. आता लग्नात एवढं सगळं राजेश मनापासून सांभाळत होता आणि बालपणापासूनचा मित्र असल्यामुळे आपण शेवटच्या पंक्तीलाच बसणार हे तो मनात म्हणत होता. तेवढ्यात आतून मंडळी बाहेर आली आणि मनोजचे आईबाबा मानाच्या माणसाना एकेक करून पंक्तीला बसवू लागले. राजेश तर अगदी मनोजच्या बाजूलाच उभा होता. मनोजच्या आईबाबानी राजेशला पाहिलं आणि आता त्याला ते मनोजच्या बाजूच्या खुर्चीवर बसायला सांगणारच असं समजून राजेशनी खुर्ची थोडीशी मागे ओढली. तेवढ्यात मनोजच्या आईनी जयदीपला हाक मारली, 'अरे जयदीप, तू बस इथे. राजेश जरा एक मिनिट हं. बस रे जयू.'
दोन मिनिटं राजेशला काही सुचलंच नाही. स्वतःला सावरून आणि लोकांच्या लक्षात येणार नाही अशा रीतीनी तो उगाचंच सेलफोन वाजल्याचं नाटक करीत 'आलोच हं मी काकू' असं म्हणत बाजूला झाला. क्षणार्धात त्याच्या लक्षात आलं की आपल्या डोळ्यांच्या कडा पाणावल्यासारख्या वाटताहेत. टपकन एक थेंब डोळ्यातून ओघळला. कोणी बघत नाही ना याची खात्री करून डोळ्यात कचरा गेलाय असा अभिनय तो करायला लागला. इतक्यात मनोजच्या बाबांची हाक ऐकू आली. 'अरे राजेश कुठे आहे? राजेश?' आपण खूप पटकन वाईट वाटून घेतो, जरा धीर नाही आपल्याला असं वाटून राजेश पुन्हा एकदा सगळं विसरून त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला, 'काय काका?' काका म्हणाले, 'अरे दोन खुर्च्या जरा कमी पडताहेत. पहिल्या मजल्यावरून दोन खुर्च्या घेऊन ये पटकन. या राजश्री आणि तनुश्री (काकांच्या सुंदर मुली) दोघिनाही बसवायला हवं बाबा नाही तर रागवायच्या हा हा हा... जा बाळ, पटकन घेऊन ये बरं खुर्च्या.' त्या क्षणी प्रथमच राजेशला आपण खूप एकटे आहोत असं वाटायला लागलं.
सकाळपासून कार्यालय ते मनोजचं घर, तळ मजला ते दुसरा मजला आणि इतर बरीच धावपळ करून दमायला तर झालं होतंच पण भूकही प्रचंड लागली होती. तीन सव्वातीन झाले होते. जाऊदे च्यायला बुफे आहे की असा विचार करून राजेश बुफेच्या जागी गेला तर त्या बुफे टेबलावर आचारी का कोणीतरी दोन तीन जण अंग टाकून झोपले होते. त्यातल्या एकाला जागं करून राजेशनी विचारलं, 'काय हो बुफे कुठाय?' झोपलेला माणूस म्हणाला, 'असं काय करताय साहेब, वाजले किती बघा. बुफे फक्त दोन वाजेपर्यंतं. शेवटी फक्त मानाची पंगत.' असं म्हणून तो परत निद्राधीन झाला. चांगलं आई म्हणत होती 'अरे आमच्या बरोबर जेवून घे, जेवून घे'. पण नाही मानाच्या पंगतीत बसायचं होतं ना. घ्या मान च्या मारी. मिळाला मान.. असा विचार करत आणि चडफडतच राजेश तिथून बाहेर पडला. तोवर कार्यालयाची घंटा वाजत होती. कार्यालय रिकामं करायचं होतं. चारच्या सुमारास कोणालाही काही न सांगता चुपचाप राजेश खाली गेला आणि कार्यालयाच्या बाहेर पडणार तेवढ्यात जयदीप समोरून आला. 'गुड वर्क ड्युड' असं म्हणून शेकहॅंड करून निघून गेला.
थोडा आणखी पुढे जातो तो पुन्हा एकदा मनोजचे बाबा समोर आले आणि म्हणाले, 'काय राजेश एंजॉय केलंस ना? निघालास कुठे? चल निघायचंय ना आपल्याला आता. आवरायचं आहे. चल वर चल.' इतकं बोलून ते वर निघून गेले. शेवटपर्यंत 'अरे राजेश जेवलास का तू' असं मनोजकडच्या एकाही माणसाला राजेशला विचारावसं वाटलं नाही. पुन्हा आयुष्यात कधीही नारायण होण्याचा प्रयत्न आपण करायचा नाही हे मनाशी पक्क ठरवून राजेश बाहेर पडला तो थेट पुढच्या गल्लीतल्या उडुपी हॉटेलात शिरला. दोन ओनियन उत्तप्पे आणि एक इडली सांबार असं चेपून, वर एक नेसकॅफे पिऊन त्यानी समोरच्या टपरीवरून एक गोल्ड फ्लेक घेतली आणि धूर काढत तो घरी निघाला. घरी पोहोचल्यावर आईनी त्याच्याकडे कौतुकानी पाहिलं आणि बाबाना म्हणाली, 'जीव आहे मनोजचा आणि त्याच्या घरच्यांचा राजेशवर. अगदी पुढे पुढे होता आपला राजेश लग्नात. काय रे कशी होती मानाची पंगत. आम्हाला लक्षात आलंच की तू शेवटी बसणार मानाच्या पंगतीला. तुम्ही मानाची माणसं. म्हणून आम्ही जेवून घेतलं. छान होतं हो जेवण.' आईला लेकाचं कौतुक वाटत होतं. इतका वेळ कसेबसे थांबवून धरलेले अश्रू आता थांबणं अशक्य आहे हे लक्षात येऊन राजेश तडक बाथरूमकडे वळला.