मृत्यू

उन्हे येत होती तिथे मी तयांचा
जरा हात हातात कवटाळला,
जसा सूर्य सरला तसा हात अलगद
अपोआप हातातुनी सोडला.

मला वाटते जे जिणे चालतो मी
नसे मात्र यात्रा चितेच्यापरी.
विवक्षीत एका स्थळी भेटण्याची
वचनपूर्ती होईल ती साजरी.

किती संयमाने प्रवासी युगांचा
जपूनी मनाचा दिवा चालतो
किती दाह सोसूनही तो दिव्याला
उराच्या करांतूनी सांभाळतो.

उन्हावेगळे एक नातेही आहे
नसे वय तयाला नसे नावही.
घडे एकदा भेट : आयुष्य सरता,
म्हणावे हसत, "वाट मी पाहिली...!"

-सुजीत