पावसाने धरती चिंब भिजली
सुर्यास चकवून मस्त न्हायली
मृदगंधाची पखरण झाली
फुलापानास झिंग आली
आणि माझे,
कौलारू घर चाळीतले
डोळ्यासमोर उभे राहिले
मनाच्या पागोळ्यातून गळलेले
दाटलेल्या आठवणींनी ओथंबलेले
सभोवती खेकड्यांची बिळे
मध्येच एखादा साप वळवळे
अंगणात फिरती असंख्य गांडुळे
कौलातुनही कधी सुरवंट लोंबकळलेले
पागोळ्यांखाली गंजकी गळकी बादली
आंघोळीची सोय तेथेच केलेली
चुकून मिळाले साबण तर चंगळच झाली
आणि नंतर तर
कोऱ्या चहाची रंगत न्यारी
बिनकानाच्या कपातली
मोऱ्या, शौचालये तुंबलेली
घरातली जमीनही ओल आलेली
बोटे पायाची भेगा पडलेली
अन, मिळालीच तर,
हातावर शिळी भाकर घेतलेली
पागोळ्या गळतात, तेंव्हा मग
आठवणीही दाटतात
अंगणातल्या रांगोळ्या गॅलरीत सजतात
स्मृतींच्या कागदी होड्या,
हॉलमध्येच नांगरतात
पागोळ्यांची गरज आता संपली, पण
आठवणी मात्र थेंब थेंब गळतात.