दंत-कथा (आधुनिक) भाग-२

भाग १) दुवा क्र. १ वरून पुढे चालु...

"हां... ओठ, तोंड जड झाल्यासारखं वाटतयं का?" -  ह्या डॉ.च्या प्रश्नामुळे मी डोळे उघडून मुकपणे हो म्हणालो, कारण जिभ उचलली जात नव्हती... बहुदा भुलीमुळे ओठ एवढा जड झाला होता की जिभ आपोआप गप्प पडली होती  ....

"रोहीणी ते २०-२१ नंबर घे इकडे, नितीन - अरे सक्शन ला कोण येतयं ?त्या ग्लास मधलं पाणी बदलून टाक आणि X-Ray ची तयारी करून ठेव... " अश्या अनेक सुचना करत डॉ.नि ती अक्टोपस सारखी खुर्चीचे २ हात स्वतःकडे ओढून घेतले... डोक्यावरचा लाईट लावला.. आणि माझ्या दंत चिकित्सेला सुरुवात झाली... ५-१० मिनिटे तोंडात अनेक वेळा ड्रिल मशिन, व्हॅक्युम क्लिनर, आणि हातोडे मारल्याचा भास झाला... गेल्या वर्षी आमच्या घरात रीनोव्हेशन करत होते तेंव्हा आमच्या घराला काय वाटले असेल ते समजले..  !

साफ-सफाई झाली, पण जडत्वाचा गुणधर्म कायम'च होता.. त्यामुळेच थोडासा त्रास कमी होत होता परंतु जाणिवा पुर्णपणे रद्द करणे कोणाला जमले आहे ?...  (बाळंतपणाच्या वेदनांनंतर दुसर्या क्रमांकाच्या वेदना दाताने होतात म्हणे... मी मनोमन देवाचे आभार मानले, की आयुश्यात हा त्रास बहुदा एकदाच होणार...)

डॉः "आ SSSS.... मोठ्ठा आ कर बर..." झालं आता थोडचं राहिलयं..

मीः  ब्यरं, (आता तोंडात २-३ कापसाचे बोळे, जिभ खाली ढकललेली पट्टी, १ छोटा आरसा लावलेला हातोडा, २-३ सुया, आणि त्या आक्टोपस च्या पायातल्या स्प्रिंगचे ईंजेक्टर एवढे सगळे घातल्यावर किती जागा राहणार ह्यांना काम करायला... ?)

डॉः  हे रुट साफ केलय आपण आता,आता केमिकल सोडतोय,आणि तात्पुरते कॅपिंग करुयात... पुढच्या आठवड्यात येऊन क्राऊन बसवून जा... कोणता हवा ते सांग, ( म्हणजे त्याप्रमाणे तुझा खिसा फाडायला... :D)

मीः जो चांगला असेल तो, म्हणजे फार महागडा नको, पण उगिच शो करण्यापेक्षा काम करता आले बीनबोभाट म्हणजे झालं तर..

डॉः ठिक आहे, मग सेमी-मेटल/सिरॅमिक करु. बस बाहेर... १५ मिनिटांत बोलावतो, एक XRay काढून पाहू मग गेलास तरी चालेल..

--  बाहेर येऊन सोफ्यावर बसलो.. ( नशिबाने एक'च जागा तरी शिल्लक होती... ) आणि अजून एक माझ्यासारखाच मुलगा आत गेला...३-४ मिनिटे मी आरामात पंख्याची हवा खाऊन देखील बुट न घालताना पाहुन रीसेप्शनिस्ट म्हणाली-"थांबायला सांगितल आहे का ? "

मीः (मग मी काय मुर्ख आहे का ? का हा पिकनिक स्पॉट आहे? आह...दुखतयं) हो ना.. !

रिसेः तुम्ही जरा तिकडे खुर्चीवर बसता का? म्हणजे बाहेर उभ्या असणाऱ्या पेशंटला मी आत बोलावते..

मीः (शहाणे, ही अजिजी माझ्यावेळेस कुठे गेली होती ग ?) हे पहा, माझा भयंकर दात दुखत आहे, मी उठायच्या/बोलायच्या मनस्थितीत नाहिये हो.. प्लिज...

टींग टींग़... बेल् वाजली आणि रिसेप्शनिस्ट आत पळाली... (वाचली बिचारी.. नाहितर ऐकवलंच असत मी तिच्या त्या "ईंटिरिअर ला सुट होत नाही" वाक्यावरुन....)

आणि मिनिटभरातच मला X-Ray साठी बोलावलं, ते झाल्यावर औषधांची लिस्ट हातात ठेवली गेली--५ गोळ्या सकाळ-संध्याकाळ, आणि मग बाहेर आल्यावर बिलाचा आकडा विचारला - तो अंदाजे खर्च ऐकून माझे डोळे दातापेक्षा जास्त पांढरे झाले..!

क्षणात'च शिताफिने दुखऱ्या दातावर हात ठेवून मी निघालो.. घरी आल्यावर सगळा वृतांत सांगीतला, आणि लहानपणापासून निट दात घासले असते, किंवा चॉकलेटस, गोळ्या कमी खाल्ले असते तर... आणि देवाने दिलेल्या लाखमोलाच्या इंद्रियांची कशी किंमत नसते.. आपण कसे दुर्लक्ष करतो... रात्रीची जागरणे, पार्ट्या, नॉनव्हेज...ई. ई. विषयांवरुन घरातच एक (परिसंवाद) वाद-संवाद रंगला...! ह्यात संवाद कमी आणि वाद'च जास्त... अर्थात वादाचे मुळ कारण शोधण्याच्या खटपटीत माझ्यावर मात्र आरोप-प्रत्यारोपांच्या अनेक फैरी झाडल्या जात होत्या...! पण मला आता ह्या चर्चेला 'चावत' बसणे शक्य नव्हते व जमेलसे पण वाटले नाही  !

सर्व आरोप मी कानावर घेऊन न घेतल्यासारखे केले, भूल उतरत असल्यामुळे पुन्हा सगळे घर भोवती फिरत असल्याचा भास झाला आणि डोक्यावर उशी दाबुन मी झोपून गेलो...

------ खणणणण.... खणनणण....

पहाटे ६ वाजता एवढा गजर ऐकून जाग येणारच होती, हातात काल रात्रीच्या पेपर मधल्या "दात आणि त्यांची निगा" विषयीच्या लेखाचे पान होते... आणि,

दाताला हात लावून पाहिला तर मला धक्काच बसला.. माझे दात जसेच्या तसे होते.. काहिच झाले नव्हते... मग ईंजेक्शन टोचल्याच्या खुणा पाहील्या तर त्या ही गायब.. नक्की भानगड काय म्हणून आरश्यात आ वासून पाहिले, जोरजोराने दंतमंजन घासून पाहिले पण कुठेही दु:ख्ख नव्हते, जखम नव्हती.

लेखातले काहीतरी वाचुन,प्रचंड मोठी कल्पनाशक्ती वापरून आपण एक आठवड्याचे स्वप्न पाहिले आहे हे लक्षात आल्यावर ताबडतोब त्या लेखातल्या डेंटिस्ट ला फोन केला.... " दात उत्तम आहेत परंतु फक्त रुटीन चेक करून घ्यावा म्हणतोय... काय आहे प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर... " संध्याकाळी घरी येताना, विको वज्रदंती, कोलगेट टोटल, आणि झिग-झॅग ब्रिसल्स वाला ब्रश घेउन आलो...   स्वप्नातल्या यातना खरचं भोगाव्या लागल्या असत्या तर ? नक्को रे देवा... म्हणत देवाला हात जोडले... !

आणि बॉस चा फोन आला... "अरे उद्या जरा लवकर ये ऑफिस ला... काम आहे"-- "ओके बॉस... डन !!"

फोन ठेवला, दात घासले आणि बिछाना गाठला-- "आजपासून रात्री काहीही वाचणे बंद असे ठरवुनच.."  !

--

आशुतोश दीक्षित.