मराठ्या उचल तुझी तलवार

आचार्य अत्रे यांच्या 'दैनिक मराठा'च्या पहिल्या अंकात (१५ नोव्हेंबर १९५६) मुखपृष्ठावर सुरेशची (सुरेश भट ह्यांची)  'मराठ्या उचल तुझी तलवार' ही कविता छापण्यात आली होती. तो तेव्हा २४ वर्षाचा होता. 'दैनिक मराठा' हे वृत्तपत्र संयुक्त महाराष्ट्र समितीचे मुखपत्र होते. सर्वाधिक खपाचा विक्रम या दैनिकाच्या नावावर होता. महाराष्ट्राच्या निर्मितीत 'दैनिक मराठी'चा फार मोठा सहभाग होता. 'कऱहेचे पाणी' या आपल्या आत्मचरित्रात वर या कवितेची तीन कडवी प्रकाशित झालेली आहेत. आचार्य अत्र्यांनी, उदयोन्मुख तरुण, प्रतिभावान कवी, असे सुरेशचे वर्णन केले आहे. ही कविता मला (दिलीप भट ह्यांना) शिरीष पै ह्यांचेकडेही मिळाली नाही. हे गीत श्री. मधुकर झेंडे, ग्रंथपाल, सावर्जनिक वाचनालय, नासिक ह्यांनी प्रेमाने पाठवले.

"मराठ्या"

मराठ्या उचल तुझी तलवार
एकिची उचल तुझी तलवार
शपथ तुला — आइच्या दुधाची
घेउ नको माघार, मराठ्या....

शपथ तुला — शिवछत्रपतींची
चळचळ कापत अवनी सारी
काय विसरली दिल्ली तुझिया
तलवारीची धार, मराठ्या....

दाहिदिशांना तुडवित होत्या
तुझ्याच घोड्यांच्या रे टापा
अवघा भारत पहात होती
गड्या — तुझा वाघासम छापा
तुझी जात मर्दाची मर्दा
कर शेवटचा वार, मराठ्या....

आता दाखव तराजूस तू
अपुल्या तलवारीचे पाणी
सांग विकत का घेतिल तुजला
बनियाच्या थैलितिल नाणी
भीक कशाला घे हक्काने
तुझेच तू भांडार, मराठ्या.....

कमनशिबाने तुझे पुढारी
बाजिरावपळपुटे निघाले
नव्याच बाळाजीपंताने
निशाण चोरांचे फडकवले
अशा पिसाळा उडवाया कर
ऐक्याचा निर्धार, मराठ्या.....

स्वर्गामधल्या पुण्यात्माचे
तुजवर मर्दा खिळले डोळे
आणिक टपून बसले दुष्मन
तुझे पुरे करण्या वाटोळे
जिंकलास तर अखिल विश्व तव
करील जयजयकार, मराठ्या.....


दिलीप श्रीधर भट

१. बाजीराव दुसरा. ह्याने शनिवारवाड्यावर युनियन जॅकचे निशाण फडकावले
२. बाळाजीपंत नातू.
३. सूर्याजी पिसाळ. मराठ्यांचा फितूर सरदार.