सुखसंवाद

[अध्यात्म संवाद: सद्गुरू कृपेनी अध्यात्म विषयी काही चिंतन, मनन घडले. आयुष्याला एक अधिष्ठान लाभले. एक आनंदयात्रा सुरू झाली. त्या अनुषंगाने स्वत:शीच साधलेला एक सुखसंवाद, प्रश्नोत्तर स्वरूपात. ]

१. तुमचा प्रवास पूर्ण झाला आहे का?
- नाही. वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे याची खात्री आहे. मार्ग प्राधान्याने भक्तीवर आधारित आहे. इथे श्रद्धा, सबुरी, गुरूपदिष्ट आचरण आणि नित्य साधना/ उपासना हेच भांडवल. भक्तीचं दर्शन विलक्षण आहे. नदीने  सगळा प्रवास करून येऊन सागराला मिळावं पण वाहणं सुरूच असावा तसं. पोचलो ही भावना ठेवली, तर डबक साचतं आणि घाण होते. पुढची प्रगती खुंटते. स्वयंघोषित सम्राटासारखा फक्त दुसर्याची 'समज' किती आहे हे मूल्यमापन करणे, सहमत झाल्यास कौतुक करणे, नाही तर फटकारणे या आडमुठ्या, धटिंगण भूमिकेपर्यंत कधीच 'पोचवू' नकोस हीच सद्गुरूचरणी प्रार्थना आहे.

२. अध्यात्म आणि तणावमुक्तीचे प्रयोग यातला नेमका फरक?
- माया - जी त्रिगुणांनी बनलेली आहे आणि जी आपल्याला स्वरूपापासून वंचित ठेवते, तिचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि गुणातीत स्वरूपाला जाणण्यासाठी सत्वाचाच आश्रय करावा लागतो.   ज्यांनी केला, त्याचीच अध्यात्मिक प्रगती होते. बाकी तणावमुक्तीचे प्रयोग. फारसे यत्न न करता ज्ञानमार्गाने/ विहंगम मार्गाने पोचणारे स्वभावत: सात्विक असतात. जे. कृष्णमूर्ती, रमण महर्षी यांच्यासारख्या अलौकिक ज्ञानयोग्यांच्या चरित्रात हे प्रकर्षाने दिसते. तसा पिंड आणि अधिकार नसताना भलते सलते प्रयत्न करणे घातक ठरू शकते. बाल, उन्मत्त किंवा पिशाच्च अवस्थेतले काही जीवन्मुक्त योगी सगळ्या विधीनिशेधापलीकडे असतात उदा. स्वामी समर्थ, गजानन महाराज इ. सर्वसामान्यांच्या दृष्टीने नियमाला अपवाद असतो या दृष्टीकोनातून ही बाजू माहित असावी.    यांचा अधिकार सहजसिद्ध असतो, तो इतरांच्या स्वाभाविकपणे लक्षात येतो. अशांच्या सत्संगात आपसूकच प्रसन्न, कृपांकित असल्याची अनुभूती मिळते. यांनी कधी चार परखड बोल सुनावले, तरी त्या मागे माउलीची ममता असते. शिष्याच्या उद्धाराची विलक्षण तळमळ असते. 'मला आत्मसाक्षात्कार झाला हो' अशी दवंडी पिटणे, उदघोष करणे किंवा बोंबाबोंब करणे हा हास्यास्पद प्रकार आहे. मी झोपलेल्यांना जागे करतो आहे, टकलू लोकांच्या जगात कंगवे विकतो आहे अशी भलामण करणे भंपकपणा आहे.

३. भक्तीमार्ग, ज्ञानमार्ग इ. संदर्भात काय म्हणाल?
-  एकांगी भक्तीमार्गी, ज्ञानमार्गी, कर्ममार्गी असा काही प्रकार नसतो. तसा कुणावर शिक्का मारणे चुकीचे आहे.   भक्ताला ज्ञानातला ओ कि ठो काळात नाही, आणि भावूक भक्तीभाव ज्ञान्याचे अध:पतन करतो ही अत्यंत भ्रांत धारणा आहे. नाही तर 'चिदानंद रूपं शिवोहम शिवोहम' ही अनुभूती घेतलेल्या शंकराचार्यांनी 'भज गोविंदम मूढमते' असा उपदेश का केला असता? मुळात अध्यात्मिक परिणत अवस्थेचा एकच असा ठाम निकष नाही. एकांगी वृत्तीचे लोक कशाला तरी उगाच चिकटून बसतात. माझ्या परिचयाचे एक अत्यंत विरक्त आणि कठोर तपश्चर्या केलेले उन्नत अवस्थेत असलेले एक  दत्तयोगी आहेत. हे सगळ्यांना 'वैराग्य आहे का? मग पुढे बोला' असे सांगून कटवून टाकतात. अलीकडेच निराकाराला झोंबण्याबद्दल आग्रही असलेल्या एका ओशोयोग्यांशी संवाद झाला. (यांनी मला नाराज होऊ नका, निराकार बघा असा आग्रह केला. नंतर मी सहज स्थितीत काही बोलतो, कसला आग्रह नसतोच असा दावा केला. बोलून नामानिराळे होणे, करून अकर्ता राहणे इतकी काही उन्नत अवस्था माझी नाही. मला थोडाफार त्रास झाला. असो. अशी मंडळी रहस्यदर्शी म्हणून काहीश्या उन्नत अवस्थेत असली, तरी सद्गुरू म्हणून पात्र नव्हेत असे मी खात्रीने सांगू शकतो. यांच्याबद्दल आदरभाव ठेवावा, त्यांचे 'मनोगत' समजून घ्यावे,  
जमल्यास संवाद साधावा, अगदीच आडमुठे असतील तर आपल्या मार्गाने निघून जावे हे उत्तम. )

सर्वसामान्यांसाठी ज्ञान (साक्षेपाने केलेले चिंतन, वाचन, मनन), कर्म (नित्य, नैमित्तिक इ. कर्मे उत्साहाने आणि मनापासून करणे. प्रपंच, समाज, राष्ट्र इ. विषयक जबाबदार्या प्रसंगी कष्ट सोसून यथाशक्ति, यथामति काटेकोरपणे निभावणे) आणि उपासना (सद्गुरूप्रणीत अथवा आपल्या आवडीची - यात तुळशीला पाणी घालणे, नाम जप किंवा अगदी आपली आवड म्हणून विनामूल्य शिकवणी घेणे, समाजसेवी संस्थांमध्ये सेवा रुजू करणे यांचा समावेश होतो. त्या मागची भावना उपासनेची हवी, उपकार केल्याची किंवा उरकून टाकण्याची नको हे महत्वाचे) असा त्रिविध मार्ग सर्वोत्तम. हाच मार्ग व्यष्टी आणि समष्टी दोन्हीच्या हिताचा, म्हणून रॉकेट च्या गतीचा नसला तरी सर्वोत्तम असा निर्वाळा भगवंतानी गीतेत दिला आहे.   

४. अध्यात्माच जग Binary  म्हणजे एक (मी पोचलो, निराकाराशी एकाकार वगैरे झालो) किंवा शून्य (मी गर्तेत, खड्ड्यात, घोर अंधारात आहे) इतकंच आहे का?
- मुळीच नाही. हे जग नित्याच्या जगावेगळे  नाहीच. काळा आणि पांढरा या मध्ये रंगाच्या अनेक छटा असतात तोच प्रकार आहे. एखादा बघायलाच तयार नसेल, तर तो दृष्टीदोष म्हणावा लागेल. हा जन्मोजन्मीचा प्रवास आहे. योगभ्रष्ट कसा, कुठे जन्माला येतो आणि आपली प्रगती कशी साधतो याचे गीतेच्या/ ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात सविस्तर वर्णन आहे. प. पू. वासुदेवानंद सरस्वतीना नाशिकच्या देव मामलेदारानी कोवळ्या वयातच "तुझी मागची वाट पुढे चालू झाली, की मोठा योगी होशील. पूर्ण संन्यस्त होशील" असा आशीर्वाद दिला होता. मी सिद्ध आहे, माझ्यासाठी तू सिद्धच आहेस, आणि उगाच चालढकल आणि कालापव्यय करतो आहेस असे तर्कट मांडून निरुत्तर केले नव्हते. तसेच झाले. "अंतरीच्या खुणा, अंतर्निष्ठ जाणती".   फळ पिकले की पडणार, कच्चे तोडायला गेले तर कधीच पिकणार नाही, आणि झाडाला जखम होणार हा निसर्ग नियम सत्पुरुष जाणतात.

५. सगुण भक्ती बद्दल काय म्हणाल?
- समर्थ रामदास स्वामींच्या समर्पक ओव्या देतो: 
मुक्तक्रिया प्रतिपादी| सगुणभक्ती उच्छेदी| स्वधर्म आणि साधन निंदी| तो एक पढतमूर्ख||
आपलेन ज्ञातेपणे| सकलास शब्द ठेवणे| प्राणिमात्राचे पाहे उणे| तो एक पढतमूर्ख||    
तुज सगुण म्हणू की निर्गुण रे हा अनुभव घेणाऱ्या एकाही संतानी सगुण भक्तीला डावे मानले नाही, कालापव्यय समजले नाही, तिचा उपहास केला नाही.   इतकेच काय सद्भावनेने आणि ईश्वरप्राप्तीच्या प्रामाणिक तळमळीने केलेले कुठलेही कृत्य कधीच वाया जात नाही असा नि:संदिग्धपणे निर्वाळा दिला.