पार्किंग आणि माझा रोड सेन्स !

पार्किंग म्हटलं की माझ्या नवऱ्याला फार टेन्शन येतं…..अर्थात मी शेजारच्या सीटवर असले तर…!!  कारण नेहेमी गाडीतल्या एयरकंडीशनरच्या थंडगार झुळकीने मला अगदी गाडीत बसल्या बसल्या लगेचंच गाढ झोप लागते.  पण कशी कुणास ठाऊक….. पार्किंगची वेळ आली की आपोआपच जाग येते आणि माझ्या मेंदूत काहीतरी विलक्षण हालचाली होतात. बापडी मी त्या मेंदूच्या आज्ञेचं फक्त पालन करते.  तर माझं काय चुकलं…!!
आता नवऱ्याचं इतकं ड्रायव्हिंग झाल्यानंतर पार्किंगच्या वेळी जर माझी थोडीफार मदत होत असेल तर काय हरकत आहे.  पण नको…..तितकीसुद्धा मदत नको असते त्यांना माझी.  चालवताना कधी कधी फक्त एकाच बाजूचं पार्किंग दिसतं…म्हणून मी माझ्या बाजूला जर कुठली जागा असेल तर सांगते मग.  हं…..कधी कधी ती जागा नेमकी गेटसमोर असते..किंवा नो पर्किंगची असते…..पण माणसाच्या हातून चुका होऊ शकत नाहीत का….!! पण त्यामुळे डाव्या बाजूची एखादी चांगली जागा गेली तर त्याच्या इतका इश्यू काय बनवायचा !!  आजकाल तर हे सरळ सरळ दुर्लक्ष करतात मी सांगितलेल्या जागेकडे.  धडधडीत अपमान !!  बरं …..आता ही गोष्ट दोघांतच ठेवायची ना……..तर नाही……..सगळ्यांच्या समोर अगदी सगळं सांगून मोकळं होतात.  म्हणूनच मला लिफ्ट द्यायला ह्यांचे मित्र टाळाटाळ करतात.
रस्ते लक्षात ठेवणं ही खरोखरच कला आहे.  पण म्हणून प्रत्येक माणसाला ती कला अवगत असायलाच हवी का…? नाही कळत एकेकाला एखादी गोष्ट ! म्हणून आमच्या हिचा रोड सेन्स अगदी झिरो आहे ह्याची दवंडी कशाला ?  तरी मी जेव्हा कोणाच्या गाडीत बसते तेव्हा आधीच सांगून ठेवते की मला रस्ता अजिबात विचारु नका…….आणि मी जर सांगितला तर अजिबात ऐकू नका.  आता कॉन्फिडन्स माझ्या बोलण्यातून ओसंडून वाहतो त्याला मी तरी काय करणार ?  कुणी सल्ला मागितला तर न देऊन कसं चालेल ना….!! पण रस्त्यांसारखे रस्ते दिसल्यावर गोंधळ उडायचाच.
पण खरं सांगू का, एकदा कुणाला अनुभव आला की कानफाट्या नाव पडतंच ……तसं झालंय माझं.  मी गाडीत बसले रे बसले की कुजबुज सुरु होते…… "आज जयू बसलीये गाडीत…….नीट सांभाळून जा….."!! "अरे आज जयू सोबत असूनही कसं काय बरोबर पोचलो…. "अशी कुजकट वाक्य कानावर पडतात.  मी मात्र कानाडोळा करते.
पण त्यादिवशी कहरच झाला.  माझी "सारे तुझ्यात आहे" ही सीडी आमच्या एका मित्राने गाडीत लावली…..कुठेतरी लांब जायला निघाला होता तो.  गाण्याच्या नादात म्हणे तो रस्ता चुकला.  आता ही चूक कुणाची……!!  घरी आल्यावर काय म्हणावं त्यानं…… "जयश्री तर चुकवतेच……पण ती नसली तर तिची सीडी सुद्धा ते काम चोख बजावते".  आता मला सांगा, माझी बापडीची काय चूक !!
आता मला सगळ्यांच्या टोमण्यांची सवय झालीये.  त्यामुळे मी ते फारसं मनाला लावून घेत नाही.  पण कधी कधी असे काही प्रसंग घडतात की सगळ्यांना बोलायला कारणच मिळतं.  अशीच एकदा माझी मैत्रिण एका सेलमधून बरीच खरेदी करुन आली होती.  घेतांना स्वस्त स्वस्त म्हणून हाताला येईल ते उचललं.  पण घरी गेल्यावर साईझ चा प्रॉब्लेम लक्षात आला.  तर कपडे एक्स्चेंज करायला तिच्यासोबत येईन का म्हणून तिने मला विचारलं.  मी मोकळीच होते.  म्हटलं….. दोन वाजायच्या आत नक्की घरी पोचणार तर येते म्हणजे मुलांचा खोळंबा नको.  तर ती म्हणाली, आरामात येऊ परत तोपर्यंत.  आम्ही साडे नवालाच घरातून निघालो.  साधारण एक तासाचा रस्ता होता म्हणजे साडे दहापर्यंत पोचून एका तासात काम आटोपून बाराला जरी निघालो तरी एक वाजता नक्की पोचणार होतो आम्ही घरी.  सालमियाच्या एक्झिटला तिने नेमका मला नको तो प्रश्न विचारला, "ए हाच आहे ना गं एक्झिट…?" मी पण विचारलेल्या प्रश्नाचं प्रामाणिकपणे उत्तर दिलं……"हा नाही पुढला आहे बहुतेक"  कुठलाही प्रश्न अनुत्तरीत ठेवायचा नाही हे शाळेत मिळालेलं बाळकडू अजूनही लक्षात आहे माझ्या !  पण आता माझ्या "बहुतेक" वर तिने इतका भरवसा का दाखवावा !!  म्हणजे चूक कोणाची ?  त्या एका चुकीच्या एक्झिटमुळे आम्ही अजून तासभर फिरत होतो रस्ता शोधत.  शेवटी पोचलो एकदाचे………तर पार्किंग साठी पुन्हा मारामारी.  आता माझ्या नवऱ्याला माझ्या सल्ल्यांकडे दुर्लक्ष करायची सवय झालेली पण मैत्रिणीला नव्हती ना….!! "अगं ती बघ जागा, ती बघ" असं करत करत मी तिला खरंच पिडलं.  जवळची जागा काही दिसतच नव्हती आणि जी जागा दिसायची त्या जागेवर वळसा घालून पोचेस्तोवर तिथे आणखीन कुणीतरी पार्क करायचं.  शेवटी दोघीही कंटाळलो.  कशीबशी कोपऱ्यावर एक जागा मिळाली……हुश्श झालं अगदी.  जग जिंकल्याच्या आनंदात दुकानात शिरलो…घड्‌याळात बघितलं तर चक्क १ वाजला होता.  म्हणजे आम्हाला लगेचंच घरी निघायला हवं होतं नाहीतर पिल्लाला घराबाहेर थांबावं लागलं असतं.  मी तिच्या चेहेऱ्याकडे बघितल्यावर मला तिची दया आली.  इतका जीवाचा आटापिटा करुन दुकानात पोचूनही आत जायला वेळच उरला नव्हता.  मला तर इतकी लाज वाटत होती ना…..!!  आज फक्त माझ्यामुळे तिला त्रास झाला होता.  येतांना मी अगदी गप्प होते….. म्हणूनच कदाचित चक्क ४५ मिनिटात आम्ही व्यवस्थित घरी पोचलो.  त्यादिवशी पासून तिने काही पुन्हा मला एकटीला तिच्या सोबत यायचं आमंत्रण दिलं नाही.
एकंदरीत काय…… तर मला गाडीत बसवायचं असेल तर ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर बसवावं हा माझ्या नवऱ्याचा त्याच्या आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींना धोक्याचा इशारा सगळे अगदी मनापासून लक्षात ठेवतात