गप्प नसती लोक सगळे नेमके पाहूनही

गप्प नसती लोक सगळे नेमके पाहूनही

गप्प नसती लोक सगळे नेमके पाहूनही
शोधती खोली जळाची ते दगड टाकूनही..

तापते ,भेगाळते ती , ठेचली जाते कधी
ही धरा फुलते कशी पण  एवढे सोसूनही ?

वादळाची एवढी का वाटते भीती तुला
बदलले ना सत्य कोणी फार घोंघावूनही..

झोत वार्‍याचा जसा येतो तशी उडती फुले..
शेवटी येईन मागे मी तुझ्या..थांबूनही..

ठेवते मी केवळ तुझा चेहरा डोळयापुढे
मन भरत नाहीच इतके सारखे पाहूनही..

दूरदेशीच्या कथा अन माणसे जर चांगली-
एकटेपण का म्हणे छळते तिथे राहूनही?

...............................................................................

'का तुझ्या बोलावल्या तू आज येथे मैत्रिणी?'
चूक माझी मान्य केली नाक मी रगडूनही ..

सोनाली जोशी