शेतकरी राजा


सार्‍या जनतेचा भार, हाये तुया पाठीवर
माह्या शेतकरी राजा, जीव नको लावू फासावर....|| धृ ||

घराच्या चार भिंती ,  उद्या पडल रे सुन्या
मातीच्या चुलीवर , कश्या शिजल रे कण्या
तुयावाचून घरात , कसे येई सण वार
माह्या शेतकरी राजा , जीव नको लावू फासावर.......|| 1 ||

पायण्यातल्या लेकराले , तुवा हाये रे आधार
आता कुठं उघडलं , त्याच्या जीवनाच दार
घरट्यातल्या पाखरांले , नको सोडू वार्‍यावर
माह्या शेतकरी राजा , जीव नको लावू फासावर......|| 2 ||

आज सोडून जाशील , नाती अन् गोती
असरु डोयातून गाळलं , शेतातली काळी माती
उद्या नाई तर परवा , पडल सरीवर सर
माह्या शेतकरी राजा , जीव नको लावू फासावर.......|| 3 ||

दुखा पाठी सुख , येई रे जीवनी
जगण्याच ध्येय ठेव , ध्यानी अन् मनी
आले एकामागून एक , वादळ वारंवार
तरी,माह्या शेतकरी राजा , जीव नको लावू फासावर....|| 4 ||

संदीप