जीवनकथा

आपल्या पूर्ण तेजाने तळपावे की नाही याबद्दल नीट विचार न झाल्याने सूर्य आपल्या आळसटलेल्या मलूल प्रकाशाचे जाळे सर्वत्र पसरून बसला होता. भुसभुशीत मातीत पडलेल्या दगडाखाली किड्यांनी धावपळ करावी तसे सर्व व्यवहार त्या पिवळट झाकणाखाली चालू होते.

मळकट पांढऱ्या टोप्या आणि मातकट घामट वास भरून राहिलेल्या त्या बिटक्या खोलीत तो टेबलापाशी बसून आकडेमोड करीत होता, पावत्या फाडीत होता. अगदी नीट थुंकी लावून पान उलटले तरी मागल्याच पानावरचे वाक्य चालू राहावे तसे त्याला वाटत होते.

तो पहिल्यांदा या गावात उतरला तेव्हा सूर्य मावळून गेला होता. काजळी ओकणारे रॉकेलचे दिवे आणि रोगट प्रकाश ओकणारे डांभांवरचे नागडे दिवे यांच्या प्रकाशात ते गाव त्याला बाजारात बराच वेळ उठाव न झाल्याने टोपलीच्या तळाशी पडून असलेल्या जून सुरकुतलेल्या काकडीसारखे वाटले.

त्याच्या वीतभराच्या खळग्याला लागणारे गोळाभर अन्न कुठल्या चुलीवरून यावे यावर त्याचे नियंत्रण असे कधी नव्हतेच. पोरे हाकणे काय, ग्रामपंचायतीतले कागद रंगवणे काय आणि बियाण्यांच्या पावत्या फाडणे काय, सगळे त्याला सारखेच होते. तीच मळकट वळकटी, तीच तेलकट उशी, आणि त्यावर स्वतःला अंथरून घेणारा तोच तो. सगळीकडे भरून राहिलेला कंटाळवाणा तोच तो पणा.

त्या राखाडी कबऱ्या मातीतूनच घडवल्यासारख्या दिसणाऱ्या एका रंगरावाला त्याने बियाणे किती सल्फेटबरोबर पाण्यात घोळवायचे याची माहिती उदास सराईतपणे दिली आणि तोंडातली पिंक थुंकण्यासाठी तो दरवाज्यात आला.

समोरच्या तिठ्यावर चालू असलेली लगबग त्याला बिनरंगाची वाटू लागली. जणू काही सर्व सजीव-निर्जीव वस्तूंमधले रंग त्या लावसट मातीने पिऊन घेतले होते.

स्वतःच्या दुखऱ्या भागावर स्वतःच प्रहार करीत राहावे तसे त्याने मनाच्या कोपऱ्यात निगुतीने जपलेले ते मोरपिशी स्वप्न पुन्हा नजरेसमोर आणण्याचा यत्न केला. मोरपिसांचे डोळे क्षणभर झळाळून गेले, पूरियाची सुरावट कानांवर रेघोट्या ओढून गेली आणि पुन्हा सगळे मूक झाले.

तोंडातली बेचव थुंकी त्याने पुन्हा एकदा थुंकून टाकली आणि तो आत जाण्यासाठी वळला.

काळ्याशार दगडांनी बांधून काढलेल्या विहीरीत सराईत पोहणाऱ्याने पद्मासन घालून उडी मारावी तसा तिठ्यावरून अचानक गलबला उसळला. पत्र्यावर दगड घासावा तशा चरबरीत आवाजात तोंडाचा पट्टा सोडलेली शांताक्का तरातरा चालत होती आणि तिच्यामागोमाग बघ्यांचा एक घोळका दोरीने बांधून घातल्यासारखा सरकत होता.

त्याला आश्चर्य वाटले. शांताक्का जरी फटकळ तोंडाची म्हणून प्रसिद्ध होती तरी चारचौघात बडबडत हिंडण्याचा तिचा स्वभाव नव्हता. आपल्या नवऱ्यामागे ती त्याच्या वाड्यात राहत होती आणि खंडावर जगत होती. तो त्याच वाड्यातल्या एका खोलीत वळकटी ठेवून होता. आता खंड देणाऱ्या कुळांनी वा वाड्यावर कामाला येणाऱ्या गड्यांनी जर तिच्या मते कामचुकारपणा केला तर मूठभर मिश्या असलेल्या आणि एका वेळेस बुक्कीभर तंबाकू दाढेला लावणाऱ्या बाप्यांनीसुद्धा खाली मान घालावी अशा उघड्याबोडक्या शब्दांनी ती त्यांचा उद्धार करीत असे. पण वाड्याबाहेर ती फारशी पडलेली कुणाला ठाऊक नव्हते.

मध्येच ती एकदम खाली वाकली. तिच्या हाताला दगड लागला नाही पण तिने एक शेणाचा पो उचलला आणि मागून येणाऱ्या घोळक्यावर तो टाकण्याच्या आविर्भावात ती उभी राहिली. पळापळ झाली. कोपऱ्यावरच्या नामू शिंप्याच्या दुकानाच्या कट्ट्यावर बसलेला अड्डा शेणभयाने खिदळायचा थांबला.

त्याने परत आत जाऊन चपला चढवल्या आणि तो तिच्या दिशेने चालू लागला. तो जवळ पोचेपर्यंत तिचे लक्ष तिकडे गेले नाही. तो टप्प्यात आल्यावर तिने हातातले शेण खाली टाकले आणि ती वाड्याच्या दिशेने धुळीत फरकाटे ओढत चालू लागली.

वाड्याच्या दरवाज्यात तिने बसकण मारली आणि मान वळवून ती म्हणाली, "पोरा, जा तू तुझ्या कामाला".

तो आत जाऊन तांब्याभर पाणी घेऊन आला. थेट तोंडाला तांब्या लावून तिने सगळे पाणी घशाखाली उतरवले आणि काचगोट्यांसारख्या निर्विकार निर्जीव डोळ्यांनी ती त्याच्यातून आरपार पाहत राहिली.

"खूप सोसलं रे आत्तापर्यंत. आता संपत आलं. सगळं संपत आलं.

"लहानपणी आमच्या अंगणात फणसाचं एक वृद्ध झाड होतं. मी रांगत प्रथम घराबाहेर पडले तेव्हापासून तो फणस सतत माझ्या आधाराला राहिला. माझे सगळे हितगुज मी त्याला विश्वासाने सांगितले आणि ते गुपित पोटात ठेवून त्याने आम्हांला रसाळ फणस दिले.

"माझे लग्न ठरले आणि त्या फणसावर वीज कोसळली. त्याचे लाकूड नि कोळसा विकून माझ्या लग्नाच्या खर्चाची भर झाली.

"त्या फणसाच्या पुण्याईने मला या घरात ढकलले. स्त्रीसाठी हपापलेल्या एका राक्षसाच्या शेजेवर. अपत्यासाठी चटावलेल्या त्या षंढाची मी चौथी बायको. मारझोड नित्याचीच. वाड्याबाहेर पडायला बंदी.

"त्याच्या दुधाच्या लोटीत पाणी मिसळल्याचा त्याला संशय आला आणि मला स्वयंपाकघरात सोबत करणारी मनी तिच्या चार कापूसकोवळ्या पिलांसकट खांडोळी होऊन दारच्या कुत्र्यासमोर पडली.

"विहीरीचे पाणी काढायला गडी होता. त्यामुळे तो मार्ग बंद होता.

"आरशावर कुंकवाचे बोट पुसल्याचा डाग होता म्हणून आसुडाने मार खाताना माझ्या पोटातला गर्भ पडला. रक्ताची गुळणी टाकून तो राक्षसही विझला.

"पण त्याचा विखारी श्वास माझी पाठराखण करीत राहिला.

"मी हौसेने रोपलेल्या प्राजक्तावर कीड पडली. दुधासारख्या शुभ्र चंपी कुत्रीला नाग चावला. आणि पार मिरजेवरून हौसेने मागवलेल्या तंबोऱ्यात विंचवाने घर केले.

"प्रकाश देणारा दिवा माझ्या नशिबातच नव्हता. माझ्या नशिबात होत्या फक्त अंधार ओकणाऱ्या चिता. काळाजांभळा अंधार.

"पण आज माझी पाटी पुन्हा लख्ख झाली. नवीन डाव मांडायला. मागचं सगळं काही विसरून सगळेजण मला बोलावताहेत. ते बघ फणसाचं झाड. आपल्या खापरपणत्यांना घेऊन आमंत्रणाला आलेली ती बघ मनी. ती बघ प्राजक्ताची माळ गळ्यात घालून आलेली चंपी. ऐक तो भैरव. मी जाते. "

शांताक्का दारातच कोलमडली.

त्याचे वाक्य संपले होते. पानही संपले होते.

जीर्ण झालेल्या अळणी कागदावर त्याला नवीन वाक्य लिहायचे होते.

लिहायलाच हवे होते.

कारण जीवनकथेचा शेवट त्याला अजून सापडला नव्हता.