-आता तंबोरे लावायचे
आणि निघून जायचं
-आता सगळ्याकडून आपले
बेसुमार खून करून घ्यायचे
आणि जिवंत राह्यचं
-आता आपण या जगात नाहीच
असं मानायचं
-आता खूप बोलायचं असेल
तेव्हाच गप्प बसायचं
-आता टीपटीप रडावंसं वाटेल
तेव्हा हसायचं
-आता स्वत:तल्या एकाला
पुरात लोटून द्यायचं
आणि दुसऱ्याला किनाऱ्यावर बसवायचं
- पेन आणि वही देऊन...!