शेतकरी आत्महत्या आणि मानसोपचार शिबीरे
१) जेंव्हा जेंव्हा शेतकरी आत्महत्येचा विषय निघतो तेंव्हा तेंव्हा शेतकरी मनोदुर्बलता किंवा मनोरुग्णतेमुळे आत्महत्या करतो असेच निदान केले जाते. आणि त्याच अनुषंगाने उपाययोजना सुचविल्या जातात. सहाजीकच, निदान जर चुकीचे असेल तर सुचविलेले उपाय योग्य कसे असणार? (वाचा - शेतकरी आत्महत्यावर तज्ज्ञांची मुक्ताफळे -http://gangadharmute.blogspot.com/2010/03/blog-post_21.html )
२) आर्ट ऑफ लिविंग किंवा मानसोपचार शिबिरे आयोजित करायला हरकत नाही पण शेतकर्यांचे मनोबळ वाढावे यासाठी काय सांगणार? प्रबोधनाचे स्वरूप काय असणार?
उदा. शेतकरी कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या करत असेल तर त्याचे मनोबळ वाढविण्यासाठी
अ) कर्ज परत करण्यासाठी चोरी करा, दरोडे घाला आणि पैसे मिळवून कर्ज परत करा असे सांगणार? (शेतीच्या उत्पन्नातून/बचतीतून त्याला कर्ज फ़ेड करता आली नाही हे गृहीत धरावेच लागेल.)
आ) मरण पत्करण्यापेक्षा कर्ज बुडवायला शिकण्याचा सल्ला देणार?
इ) आर्थीक हलाखीमुळे मुलीचे लग्न करता येत नसेल तर टेंशन घेऊ नकोस, ती बिनालग्नाची राहीली तरी चालेल पण तू जगलाच पाहीजे असे सांगणार?
ई) सावकाराने कर्जापायी भरचौकात अपमान केला तरी तू मनाला लावून घेऊ नकोस, संवेदनाक्षम, हळवेपणाने जगण्यापेक्षा कोडगेपणाने वाग असा सल्ला देणार?
मानसोपचार शिबिरे घेणार म्हणजे त्याला काय समजावणार याचा उलगडा व्हायला हवा.
रोगाचे निदानच चुकीचे घेवून एखादा मानसोपचारतज्ज्ञ उपचार करणार असेल तर अपेक्षित परीणाम कसा साधला जाईल?
हे प्रश्न अनुत्तरीत राहातात.
थोडे विषयांतर
एक शेर ऐका(वाचा).
"भुईला दिली ओल नाही ढगाने
कशी अंकुरावीत आता बियाणे?"
बीजाची इच्छा आहे अंकुरण्याची, कोंब फ़ुटून वृक्ष बनण्याची,इतर वृक्षाप्रमाणे उंच-उंच वाढून गगनाशी स्पर्धा करण्याची...पण अंकुरण्यासाठी भुईत ओलावा असावा ना? बिना ओलाव्याने अंकुरायचे तरी कसे? अंकुरायला पाणीच हवे, कोणाचा कोरडा सल्ला किंवा अगम्य आशावाद किंवा प्रचंड मनोबळ असून-नसून उपयोग तो काय? ओलावा मिळाला तरच इच्छाशक्ती,आशावाद,मनोबळ उपयोगाचे. नाही तर शुन्य उपयोगिता.
भुईला पण वाटते की त्या बीजाचा जन्म व्हावा. मातृत्वाची प्रेरणा काय असते,हे त्या मातेलाच कळे. पण ती तरी काय करणार बिचारी? ओलाव्यासाठी ती पुर्णत: मेघावर अवलंबून. मेघाकडून तिला पाण्याचे थेंबच हवे. कोरडे गर्जन नकोच. कोरड्या गर्जनाचा आवाज फ़ार मोठा. अशा गर्जनांमुळे गर्जना केल्याचा मेघाला आनंद मिळेलही कदाचित. पण अशा गर्जनांचा भुईने आणि बीजाने उपयोग तरी काय करून घ्यावा?
गंगाधर मुटे