प्राजक्ता पुन्हा एकदा सायलीचा नंबर फिरवावा काय या विचारात होती. इतक्यात तिचाच फोन वाजला. कॉलर आयडी मुंबईचा नंबर दाखवत होता.
सायोचाच फोन असणार असं मनाशी म्हणत सोफ्यावर बसकण मारत तिनं रिसीव्हर उचलला.
"हॅलो..."
"हॅलो... हं, प्राजू, बोल, सायली बोलतेय. फोन केला होतास? निरोप मिळाला मला दिपककडून..."
"आहात कुठे नोमॅडिक नेमाडेबाई? सकाळपासून सारखा फोन लावायचा प्रयत्न करतेय. मगाशी तुझ्या रूमपार्टनरलाही करून बघितला. ती म्हणाली की तू अजून ऑफिसमधेच आहेस. शेवटी निरोप ठेवला तुझ्या त्या दिपकजवळ."
"ए, 'तुझ्या' दिपकजवळ काय? आमचा ऑफिस बॉय आहे तो. कशासाठी फोन करत होतीस?"
"घ्या! आज तुझा स्पेश्शल दिवस. म्हटलं तुला फोन करावा, गप्पा माराव्यात..."
"अर्र तिच्या! सॉरी, सॉरी, लक्षातच नाही आलं माझ्या."
"अगं सायो, काय हे! स्वतःचा वाढदिवसही विसरलीस? इतकी काय अगदी कामात गढलीयेस?"
"ए बाई, जरा बाहेरच्या जगात काय चाल्लंय ते पण बघत जा! टी.व्ही. लावलायस का सकाळपासून?"
"छे! मी तर सकाळपासून तुला फोन लावण्यातच बिझी आहे."
"प्राजू, आय ऍम सिरीयस."
"सकाळी तुषारनं थोडा वेळ बातम्या लावल्या होत्या गं, तुमच्याच चॅनलवरच्या. आताशा तो दुसरं कुठलं चॅनल बघतच नाही! तिथे कालच्या सानिया मिर्झाच्या मॅचचंच दळण चाललं होतं."
"ती बातमी शिळी झाली. सेकंड राऊंडला हरली सुध्दा ती अमेरिकेच्या अनसीडेड प्लेअरकडून. ते सोड. आज सकाळी नवीनच राडा झालाय. मी नाईट करून घरी निघाले होते तर आमच्या पंटरनं मला थांबवून ठेवलंय. सकाळी तू फोन करत होतीस तेव्हा मी रेस्ट रूममधे डुलकी काढायला गेले होते. आता पुढचे किमान चार पाच दिवस तरी काही बघायलाच नको!"
"अरे बापरे! काय झालंय? मुंबईत दंगल बिंगल पेटलीय की काय? मला काहीच कल्पना नाहीय अजून. आमच्या सोसायटीच्या वार्ताहरानंही अजून काहीच बातमी आणलेली नाही."
सायलीला तशातही ते ऐकून अगदी मनापासून हसू आलं.
"कोण सोसायटीची वार्ताहर?"
"अगं, माझी काटकोनातली शेजारीण गं, अफ़िया."
"काटकोनातली कायऽऽ ! तुझे एकएक शब्द म्हणजे ना..."
"अगं म्हणजे तिचं आणि माझं दार एकमेकांशी काटकोन करतात ना म्हणून!"
"ते आलं माझ्या लक्षात. आणि काय गं, ती म्हणे एक आदर्श शेजारीण आहे..."
"हो, आहे की. पण आख्ख्या दुनियेच्या बातम्या सोसायटीत सर्वात आधी तिला कळतात आणि त्या ती सगळ्यात आधी मला येऊन सांगते. म्हणून मी तिचं सोसायटीची वार्ताहर असं नाव ठेवलंय. तुषारला सांगितल्यावर तो जाम हसला."
"तो हसणारच. त्याची खुन्नस आहे ना त्या फॅमिलीला?"
"उगीच खुन्नस वगैरे टोकाचे शब्द वापरू नकोस. हं, तो फारसा त्या लोकांशी बोलायच्या फंदात पडत नाही इतकंच. ए, खरंच, त्याचाही काही फोन नाही आला अजून. नाहीतर ऑफिसमधे नेटवर काही कळलं तर तो मला लगेच फोन करून सांगतो."
"येईल, येईल. त्याच्या पंटरनं त्याला मोकळा सोडण्याचीच वाट बघत असेल तो..."
"हे पंटर, पंटर काय लावलंयस मगापासून? काय झालंय ते सांग आधी."
"तुला खरंच माहीत नाही?"
"आता सांगतेऽस की चॅनल बदलू?"
ते ऐकून सायली जोरजोरात हसायला लागली.
"...हो, तुम्हा मिडीयावाल्यांशी अशाच भाषेत बोललं पाहीजे, त्याशिवाय कळत नाही तुम्हाला."
"अगं, मेज्जर राडा झालाय आणि तो ही मुंबईत नाही, तुमच्या तिकडेच कुठेतरी... ट्रेनचा एक आख्खा डबा पेटलाय..."
ते ऐकताच एकीकडे प्राजक्तानं टी.व्ही. लावला.
"काहीतरी ऍक्सिडेंट वगैरे असेल. सांगतायत ना बातम्यांमधे तसं..."
"वरकरणी तरी तसंच वाटतंय पण मिडीयातल्या जाणकारांची कुजबूज काहीतरी वेगळंच सांगतीये. ऍन्ड आय कॅन सेन्स इट, टू!"
"मग काय? तुमचा दौरा की काय लगेच इकडे? मागे ती कोकणरेल्वेवर दरड कोसळली होती तेव्हा अर्ध्या रात्री तू तिकडे धावली होतीस तुमच्या कॅमेरामनसकट... मावशीला अजूनही माहीत नाहीय ते. हो ना?"
"हो! आणि आईला ते कधी कळताही कामा नये... ती स्टोरी जर तिनं ऐकली तर ती आधी मला नोकरी सोडायला लावेल."
"इकडे येणारेस का? आणि कधी? आज? उद्या?"
"नाही, यावेळी फिरतीवर नाही. इथे मात्र असेन आज, उद्या दोन्ही दिवस प्राईम टाईमला."
"बरोबर! एकच डबा पेटलाय ना... मग तुम्ही कशाला धावपळ कराल?"
"ए, असलं काही नाहीय, कळलं ना! तुला मगाशीच म्हटलं तसं, मला यात काहीतरी वेगळा वास येतोय! एक साधी गोष्ट लक्षात घे - ऍक्सिडेंट असता तर एकच एक डब्याला आग लागली असती का? किमान तीनचार डबे तरी भडकायला हवे होते की नाही?"
"झाली का सुरू तुझी डिटेक्टिव्हगिरी? तुला तिथं न्यूज-ऍन्करिंग करायचे पैसे मिळतात ना?"
"अगं ती बातमी ऐकल्यापासून माझ्या डोक्यात सगळं हे असलंच घोळतंय. हे प्रकरण दिसतंय तेवढं सीधं नाहीय. यातनं मेज्जर काहीतरी उद्भवणार आहे."
"तुम्ही चॅनलवाले नेहमी असलंच काहीतरी पसरवता आणि..."
"नो डियर! नॉट धिस टाईम! माझं भाकीत खरं ठरतंय की नाही बघ! गेली सात वर्षं टिणगिण्या नाही मारलेल्या मी..."
"मला तसं नव्हतं गं म्हणायचं..."
"मला आलं लक्षात तुला काय म्हणायचंय ते. तुझी माझी काय काल-परवाची ओळख आहे? इलेक्ट्रॉनिक मिडीयाबद्दलची तुझी मतं मी पक्की जाणून आहे. बट स्टिल, मार्क माय वर्ड्स!"
"बरं बाई! पुढचे चार-पाच दिवस तुमच्या चॅनलला आम्ही नाक लावून बसू! मग तर झालं?"
"अब आयी ना तू लाईन पे..."
"बरं, चल, ठेवते आता. कौस्तुभची बस यायची वेळ झाली."
"ओके, बाय."
रिसीव्हर ठेवल्याक्षणी प्राजक्ताच्या लक्षात आलं की ज्यासाठी फोन करायचा होता ते काही बोलणं झालंच नाही. सायोला वाढदिवसाच्या शुभेच्छा वगैरे काही दिल्याच नाहीत आपण!
स्वतःशीच हसत तिनं कपाळावर हात मारून घेतला. सायोचं हे असंच नेहमी! तिच्याशी बोलताना विषय कुठून कुठे जाईल काही सांगता येत नाही. कायम अशी भरभरूनच बोलते ती. आज काय तर म्हणे मेज्जर राडा. 'मेज्जर' हा सायोचा अगदी लाडका शब्द आहे. दुसरा कुठला बरं? हं, अशक्य! अशक्य हसलो, अशक्य धमाल आली, ट्रेनला अशक्य धक्काबुक्की होती... काय अन् काय!
आता पुन्हा उद्या फोन करेल आणि म्हणेल, "या राड्यामुळे अशक्य धावपळ आणि काम आहे."...
प्राजक्ताचं टी.व्ही.कडे लक्ष गेलं. फोनवर बोलताना तिनं त्याचा आवाज बंद करून ठेवला होता. समोर नुसतीच चित्रं हलत होती. घटनास्थळावरून वार्तांकन करणाऱ्यांचे ताणलेले घसे दिसत होते, ऐकू मात्र येत नव्हते. तिचे कान कौस्तुभच्या शाळेच्या बसकडे लागले होते. तोपर्यंत वेळ घालवायला काहीतरी हवं म्हणून टी.व्ही. आणि आज सायोकडून कळलं म्हणून ही बातम्यांची चॅनल्स्...
प्राजक्ता रिकाम्या डोक्यानं आणि कोऱ्या चेहऱ्यानं ती मूक दृष्यं पाहत राहिली, इकडे तिकडे चॅनल्स् बदलत राहिली.
----------
"मला आज दिवसभरात मान वर काढायलाही सवड मिळाली नाही. आत्ता निघताना तिवारी भेटला रिसेप्शनला, तो सांगत होता, आज काहीतरी राडा झालाय ना म्हणे आपल्या इथे?" संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर चहा घेता घेता तुषारनं प्रश्न केला.
"तू ही सायोसारखंच बोलतोयस की!", प्राजक्ता हसत हसत म्हणाली, "आणि ते आपल्या इथे नाही काही झालेलं; त्या ऍक्सिडेंटचं ठिकाण लांब आहे इथून."
"वा! छान! तू ही तो अपघात होता असंच धरून चाललीयेस वाटतं अजून..."
"तुला कसं माहिती की तो अपघात नाही?", 'नाही'वर जोर देत प्राजक्ता म्हणाली.
"अरे.... तू समजलीस काय मला! तिवारीकडून जितकं काही कळलं त्यावरून मी लगेच ताडलं की देअर इज समथिंग फिशी अबाऊट इट..."
प्राजक्ता तुषारकडे आश्चर्यानं बघायला लागली.
"काय गं? इतके डोळे विस्फारायला काय झालं?"
"सायोपण फोनवर असंच म्हणत होती."
"अरे वा! आज लाडक्या मैत्रिणीचा फोन आला होता वाटतं? तरीच तू आत्ता इतकी खुषीत दिसतीयेस..."
"आधी मीच फोन करत होते पण ती भेटली नाही. मग तिनं केला. आज तिचा वाढदिवस आहे ना!"
"अरे हो, खरंच की! आज २८ तारीख, नाही का! मग, काय म्हणतात मिस् सायली नेमाडे?"
"काही नाही रे, वाढदिवस म्हणून फोन केला खरा, पण त्याबद्दल काही बोललोच नाही आम्ही. पूर्णवेळ हेच चाललं होतं..."
"हेच? म्हणजे?"
"म्हणजे हेच, हा निव्वळ एक अपघात नसणार वगैरे. तिलाही त्यात काहीतरी वेगळा वास येतोय म्हणे!"
"ग्रेट माईंड्स थिंक अलाईक, यू नो!" डोळे मिचकावत तुषार म्हणाला.
"आजकाल तू फार इंग्लिश झाडत असतोस हं माझ्यासमोर!" प्राजक्ता त्याच्या गळ्यात पडत म्हणाली.
तुषारनं असे डोळे मिचकावले की ती नेहमीच विरघळायची.
"...आणि त्या अफूच्या संगतीत राहून तुझ्या तोंडात अति हिंदी बसलंय."
"अफू काय रे? तिचं नाव अफ़िया आहे. आणि दरवेळी गाडी तिकडे वळलीच पाहीजे का लगेच?"
"आता तर तिकडे गाडी वळवायलाच हवी! एक से एक सगळे फडतूस, लेकाचे!"
चटका बसल्यासारखी प्राजक्ता बाजूला झाली.
"तुषार, अरे कसली ही भाषा! किती हिणवून बोलतोस रे त्यांच्याबद्दल..."
"त्यांची तीच लायकी आहे."
"इतकी अगदी लायकी वगैरे काढायची काहीही गरज नाहीय. अफ़ियानं आणि तिच्या नवऱ्यानं काय घोडं मारलंय रे तुझं?"
"एकच नाही, चिक्कार मारलीयेत! चांगली पन्नास-साठ लोकं मेलीयेत आज त्या ट्रेनमधली..."
"त्याचा इथे काय संबंध?"
"आता तू वेड पांघरणारच, गं! तुमच्या या अशा ऍटिट्यूडमुळेच आज ही वेळ आलीय..."
तुमच्या??
नवरा बायकोतल्या नेहमीच्या मतभेदांपलिकडचं काहीतरी जाणवून प्राजक्ता एकदम शहारलीच.
"कसला ऍटिट्यूड? काय वेळ आलीय? काय बोलतोयस तू?"
"काही नाही. जाऊ दे. तुझ्याशी यावरून मी कशाला वाद घालतोय? तुला या गोष्टी कधीही पटणार नाहीत आणि पटवून घ्यायचा तू प्रयत्नही करणार नाहीस."
तुषार उठून कपबशी ठेवायला आत निघून गेला. संभाषण संपुष्टात आलंय हे प्राजक्ताला कळून चुकलं.
विषय कुठून कुठे गेला! सकाळी सायोशी बोलतानाही तेच, आत्ताही तेच!
ही गोष्ट इतकी महत्त्वाची आहे का की दोन मैत्रिणींना बोलायला दुसरा विषयच नसावा?
मुद्दा इतका अटीतटीचा झालाय का की नवरा-बायकोतले संवाद त्यामुळे विनाकारण कडवटपणाकडे वळावेत?
सायोचं एक जाऊ दे, तिच्या कामाचा तो एक भाग समजू आपण. पण तुषारही??
अफ़िया किंवा तिच्या नवऱ्याचा विषय निघाला की त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच तुसडेपणा येतो, आवाजाला कुठलीतरी वेगळीच धार चढते!
एका आपल्यासारख्याच चालत्या बोलत्या व्यक्तीबद्दल इतका तिटकारा असू शकतो कुणाच्या मनात?
ते कुटुंब आपल्याशेजारी रहायला येतंय हे सुध्दा त्यानं किती वेड्यावाकड्या चेहऱ्यानं आपल्याला सांगितलं होतं. आपल्याला मात्र अनेक दिवस रिकाम्या असलेल्या शेजारच्या फ्लॅटमधे कुणीतरी रहायला येतंय याचाच आनंद झाला होता. त्यामुळे तेव्हा या गोष्टीवर आपण फारसा विचारच केला नाही. चार पाच वर्षं होऊन गेली त्याला. पण तो संदर्भ आता जुळतोय.
कंपनीच्या मालकीचीच दोन्ही घरं. मग तिथे रहायला कंपनीत काम करणारं कुणीही येऊ शकतं. पण कुठलीतरी चार अविवाहित टाळकी येऊन राहण्यापेक्षा एक सुशिक्षित, नांदतं कुटुंब केव्हाही चांगलंच की शेजार म्हणून. त्यांच्या अगदी गळ्यात गळेच घालायला हवेत असं कुठेय? मैत्री कुणाशी करावी हे आपल्या हातात असतं पण आपल्याला शेजार कुणाचा लाभणार आहे हे आपण नाही ना ठरवू शकत?? मग ज्या गोष्टी आपल्या हातातच नाहीत त्या गोष्टींवरून तोंडं वाकडी करायचं कारणच काय?...
तुषारसमोर मात्र हा युक्तिवाद नेहमीच थिटा पडायचा.
प्राजक्तानं एक सुस्कारा टाकला आणि ती स्वयंपाकघराकडे वळली. कपबशी ठेवायला आत गेलेला तुषार तिला ओलांडूनच पुन्हा बाहेर हॉलमधे गेला. पण जाताना त्यानं तिच्याकडे पूर्ण दुर्लक्षच केलं आणि तो टी.व्ही. लावून बसला.
टी.व्ही.चा आवाज ऐकताच प्राजक्तानं घड्याळ बघितलं. आठ वाजत आले होते.
"आज सायो आहे रेऽऽ प्राईम टाईमला...." तिनं आतून ओरडूनच तुषारला सांगितलं. त्यावर बाहेरून काहीच प्रतिसाद आला नाही.
----------
दारावरची बेल वाजल्यावर प्राजक्ताला आश्चर्य वाटलं. दूधवाला, पेपरवाला आणि केरवाला तिघंहीजण आपापली रोजची कामं करून गेले होते. सकाळच्या घाईत आता ही चौथ्यांदा बेल कुणाची असा विचार करून ती थोडी वैतागलीच.
"तुषारऽ, जरा बघ रे कोण आलंय..." तिनं आवाज दिला.
तुषार आतल्या खोलीत ऑफिसच्या कपड्यांना इस्त्री करत होता.
"इतक्या सकाळी कोण असणार दुसरं? ती तुझी जीवलग शेजारीणच असेल. जा, तूच बघ!" त्यानं तिला ताबडतोब झिडकारून टाकलं.
प्राजक्ताला दिवसाची सुरूवात एका नव्या वादावादीनं करायची नव्हती. त्यामुळे तिनं तुषारकडे दुर्लक्ष केलं आणि नॅपकीनला हात पुसत पुसतच बाहेर जाऊन दार उघडलं.
दारात नवव्या महिन्याच्या पोटाचा डोलारा सांभाळत अफ़िया उभी होती. दिल्लीहून तिच्या बाळंतपणासाठी आलेली तिची आई मागे सोफ्यावर जपाची माळ ओढत बसलेली होती.
शाळेसाठी तयार होऊन बसलेला कौस्तुभ दार उघडताच लगेच "आंटी, सालेम क्या कर रहा है?" असं म्हणत अफ़ियाच्या घरात शिरला. सालेमही युनिफॉर्म घालून, पाठीवर दप्तर वगैरे लावून तयार बसला होता. दोघंही जाऊन त्या हॉलच्या खिडकीतल्या बंदिस्त ग्रिलवर चढून बसले. त्या दोघांची ती अगदी आवडती जागा होती. तिथून कॉलनीतला रस्ता दिसायचा. तो रस्ता पुढे रहदारीच्या मुख्य रस्त्याला जिथे जाऊन मिळायचा तो चौकही खिडकीतून दिसायचा.
शाळेच्या वरच्या वर्गातल्या मुलांची बस आतल्या कॉलनीतल्या रस्त्यावर यायची नाही. बाहेरच्या बाहेरच निघून जायची. दोघंही वाकून वाकून लांबून येताना दिसणारी ती बस बघत होते.
"मेरी मम्मी ने बोला, अगले साल से मैं भी उस बस में जाऊंगाऽऽ" कौस्तुभ सालेमला चिडवायच्या सुरात म्हणाला. सालेम त्याच्या एक वर्ष मागे होता.
"तो क्या हुआ, उसके अगले साल मैं भी जाऊंगा। लेकिन तुम आंटी को मम्मी क्यों कहते हो? वो तो तुम्हारी आऽई है ना?"
"लेकिन तुम्हे तो मराठी नहीं समझता! तो तुम्हे कैसे पता चलेगा मैं क्या कह रहा हूं? इसलिये मैंने मम्मी कहा! तुम भी तो मम्मी ही कहते हो। 'अम्मी' क्यों नहीं कहते? जैसे आंटी नानीको कहती है.." कौस्तुभनं स्पष्टीकरण दिलं आणि पाठोपाठ सालेमला जाबही विचारला.
"मैं तो हमेशा मम्मी हीं कहता हूं... जब तुम नहीं होते हो, तब भी..."
दोन्ही आया मुलांच्या गप्पा कौतुकानं ऐकत होत्या. आपल्या लेकाचं हिंदी भाषेवरचं प्रभुत्त्व बघून प्राजक्ताला तर हसू आवरत नव्हतं.
"कल टी.व्ही.पे देखा?? कैसे वो ट्रेन की बोगी जल रहीं थी...", अफ़ियानं तिच्याकडे वळत प्रश्न केला.
उत्तरादाखल प्राजक्तानं नुसती मान हलवली.
टी.व्ही.वरच्या त्या दृष्यांनी अफ़ियाला वाईट वाटलं होतं. तिच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसत होतं. तसं ते नेहमीच दिसायचं. एखाद्या अपघाताची किंवा आसपासच्या सोसायट्यांमधल्या कुणाच्या घरातल्या एखाद्या नैसर्गिक मृत्यूची ऐकीव बातमी असो वा टी.व्ही.वर बातम्यांमधे दिसलेली अशी एखादी घटना असो, अफ़िया त्या तिऱ्हाईत दुःखात जणू बुडून जायची. तिच्या चेहऱ्यावर तेव्हा असे भाव असायचे की जणू तिला स्वतःलाच सुतक लागलं असावं. अशा वेळेला प्राजक्ताला खरं म्हणजे काय प्रतिक्रिया द्यावी तेच कळायचं नाही. बरं, त्यात दिखाऊपणा आहे म्हणावं तर तसंही नसायचं. भावना एकदम खऱ्या, बोलण्यामागचा कळवळा अगदी प्रामाणिक...
"बच्चों को स्कूल भेजना है क्या?"
"का? काय झालं?"
"आज 'राज्यबंद'चं आवाहन केलं गेलंय ना? मी बी.बी.सी.वर ऐकलं पहाटे."
आत्ता इथे सायो असायला हवी होती - त्याक्षणी प्राजक्ताला वाटून गेलं. तिच्या त्या पंटरलाही पत्ता नसेल अजून या ताज्या घडामोडीचा आणि इथे बघ म्हणावं, आमच्या सोसायटीत न्यूज ब्रेक झाली सुध्दा!
उत्तरादाखल तिनं पुन्हा एकदा नुसतीच मान हलवली.
"अर्थात इथे तशी काही चिन्हं दिसत नाहीयेत अजूनतरी..."
"तेच ना! तिकडे ती गाडी जळलीय त्या भागात असेल त्याचा जास्त परिणाम."
"तरी सुध्दा, सालेमला शाळेत पाठवू की नको ते मला कळत नाहीय."
"शाळेत फोन करून बघ मग."
"केला होता. शाळा तर सुरू आहे म्हणतायत."
"हो ना? मग काय तर! आपण पाठवायचं मुलांना..."
त्याक्षणी तरी प्राजक्ताला तिच्या ब्यूटीपार्लरच्या अपॉईंटमेंटची जास्त चिंता होती. आदल्या आठवड्यात कौस्तुभला अचानक ताप भरल्यामुळे एकदा ती रद्द करावी लागलीच होती. आता पुन्हा तसं करण्याची तिची बिलकुल इच्छा नव्हती.
"क्या हुआ? तुम्हें कहीं बाहर जाना है?", तिचा विचारमग्न चेहरा पाहून अफ़ियानं विचारलं.
"हो ना! अगं, पार्लरची अपॉईंटमेंट घेतलीय दहा वाजताची. आता हा शाळेत नाही गेला तर..."
"मग काय झालं? माझ्या घरी खेळेल तो..."
प्राजक्ताला नवल वाटलं. काय उत्साह आहे या बाईच्या अंगात! दिवस भरत आलेले असतानाही दोन दंगेखोर मुलांना तास-दीड तास सांभाळायची तयारी आहे हिची! पण तिला पटकन् ‘हो’ देखील म्हणवेना.
या दोघींच्या बोलण्याकडे मुलांचेही कान होतेच. चेहऱ्यावर अगदी समजूतदारपणाचा आव आणत कौस्तुभ खिडकीतूनच मागे वळून म्हणाला, "आई, तू जा. मी सालेमकडे खेळेन."
अफ़िया त्याच्याकडे कौतुकानं बघायला लागली. तिला त्या वाक्याचा शब्दशः अर्थ जरी कळला नाही तरी सारांश बरोबर लक्षात आला.
इतक्यात खालून रोजच्या शाळेच्या बसचा परिचित आवाज ऐकू आला.
"मी बसवाल्याला सांगून येते की शाळा सुरू असल्याची खात्री करूनच मुलांना तिथे उतरव; नाहीतर सरळ परत नीट घरी आणून सोड...", असं म्हणून अफ़ियानं मुलांबरोबर जिना उतरायला सुरूवात केली.
अचानक एका अनोळखी अस्वस्थतेनं प्राजक्ताला घेरून टाकलं.
सकाळपासून बाहेरचे सगळे व्यवहार तर सुरळीत चालू असलेले वाटतायत. नाहीतर पेपरवाल्यानं तरी काहीतरी सांगितलंच असतं. तो रेल्वे स्टेशनवरून पेपर घेतो तेव्हा अशा बातम्या त्याला तर कळतातच. मग स्वतःच्या अशा अवस्थेतही तीन मजले चढ-उतर करण्याइतकी अफ़ियाचीच का हुलहूल चाललीय? का सायो आणि तुषारप्रमाणे तिच्याही मनात 'तेच' आहे?
मुलं, शाळा याबाबतीत निर्धास्त, निश्चिंत असल्याचं आपण अफ़ियाला दाखवलं खरं पण... पण खरंच ते तसं आहे का? तो खराखुरा निर्धास्तपणा म्हणायचा की सत्य स्विकारायला दिलेला नकार?
या प्रश्नाला त्वरित कुठलंच उत्तर का देत नाहीय आपलं मन?
सायोचं 'मेज्जर राड्या'चं बेधडक भाकीत, तुषारची धुसफूस, अफ़ियाची नकळत चाललेली घालमेल आणि आपलं अजूनतरी निश्चिंत असलेलं मन, यापैकी नक्की काय खरं? कशावर विश्वास ठेवू? काहीच कळत नाहीय...
स्वतःच्याच विचारात प्राजक्ता आत वळली खरी पण घराचं दार तिनं तसंच उघडं ठेवलं. अफ़ियाची आई समोरच बसलेली असताना त्यांच्या तोंडावर दार लावून टाकणं तिला प्रशस्त वाटलं नाही.
दरम्यान तुषारची कपड्यांना इस्त्री करून झाली होती. पेपर चाळायला थोडी सवड मिळतेय हे लक्षात येताच त्यानं बाहेर येऊन टी-पॉयवरचा पेपर उचलला.
पाठोपाठ प्राजक्ताला स्वयंपाकघरात एक आवाज ऐकू आला... दार ढकलून धाडकन लावून घेतल्याचा...!!
(क्रमशः)
यापुढील भाग - दुवा क्र. १