याआधीचा भाग - दुवा क्र. १
---------
प्राजक्तानं अफ़ियाच्या दारावरची बेल वाजवली. त्यासरशी आतून धावत येऊन कौस्तुभनंच दार उघडलं आणि आपल्या घराचं कुलूप उघडून दे म्हणून तिच्याकडे लग्गा लावला. त्यानं आदल्या दिवशी रंगवलेलं एक चित्र त्याला त्याक्षणी सालेमला दाखवायचं होतं म्हणजे दाखवायचं होतं. प्राजक्तानं मुलांना स्वतःच्या घराचं दार उघडून दिलं आणि किल्ली लॅचमधून काढून घेऊन ती पुन्हा अफ़ियाच्या घरात शिरली.
अफ़िया स्वयंपाकघरात होती. आत जाऊन प्राजक्तानं मिरच्या-कोथिंबीर, नाडीचं बंडल आणि ओडोमॉस तीनही वस्तू तिच्याकडे सोपवल्या.
"थॅन्क्स!"
"अशा अवस्थेत तर शत्रूला सुध्दा मदत करावी माणसानं. त्यामुळे दर दर वेळेला थॅन्क्स म्हणायची गरज नाहीय, बरं का.", प्राजक्ता लटक्या रागात म्हणाली. त्यावर अफ़िया प्रसन्न हसली.
अफ़ियाचा नवरा घरात तिला काडीचीही मदत करायचा नाही. त्यामुळे विशेषतः तिचे दिवस भरत आल्यापासून प्राजक्ता बाहेर जाताना तिला न चुकता बाहेरून काही आणायचंय का ते विचारायची. ती सांगेल त्या किरकोळ चार दोन वस्तू तिला आणून द्यायची.
"हो गयी रिझर्वेशन्स?"
"हो, झाली बाई! थेट गाडी असली की बरं असतं. नाहीतर मुंबईमार्गे दोन गाड्या बदलून जावं लागतं."
अफ़ियानं पुढे केलेला थंडगार पाण्याचा ग्लास हातात घेऊन प्राजक्ता तिथेच थोडावेळ टेकली.
"बाहेर... ठीकठाक आहे का सगळं?" अफ़ियानं चौकशी केली.
तिला ‘हो’ असं उत्तर देताना प्राजक्ताची जीभ जरा अडखळलीच. कालच्या ‘भारत बंद’नंतर आज म्हटलं तर सगळं ठीकठाक होतं पण...
हिला सांगू की नको?
काय सांगणार म्हणे? नेहमीचं नारळांचं दुकान आज अचानक बंद होतं म्हणून?
बाजारातलं पूजा साहित्य विकणारं ते एकमेव बऱ्यापैकी दुकान होतं. फक्त तोच एक दुकानदार प्राजक्ताला गुढीपाडव्याला साखरेच्या गाठी आणि लक्ष्मीपूजनाला लाह्या-बत्तासे आणून द्यायचा. नाहीतर त्या त्या सणाला या वस्तू इतरत्र कुठेही मिळायच्या नाहीत. शिवाय उत्तम प्रतीचे नारळही फक्त तोच विकायचा.
आजही प्राजक्ता तिथे नारळ आणायलाच गेली होती. पण दुकान बंद होतं. बाजूच्या बोळकांडीतच दुकानदाराचं घर होतं. गाडी सुरू करता करता तिनं तिथेही डोकावून पाहीलं. तिथेही शुकशुकाटच होता.
तिच्या मनात नसत्या शंकेची पाल चुकचुकली. मनाला एक विचित्र ताण जाणवायला लागला. टी.व्ही.वरच्या बातम्यांमधून, पेपरमधून गेले दोन दिवस ज्या भयंकर घटना ऐकायला-वाचायला मिळतायत त्या आता आपल्याही उंबऱ्यापाशी येऊन ठेपल्या की काय? तो नारळवाला दुकानदार तर दाढी राखणारा आणि पांढरी टोपी घालणारा होता! मग इथे नक्की काय घडलं असेल काल?
स्वतःच्या मनातली खळबळ प्राजक्तानं पुन्हा एकदा बाजूला सारली... आणि ते ही अफ़ियाला कळू न देता. पण त्यासाठी तिला फार प्रयास पडले.
आपण या अशा इथे एका परधर्मीय शेजारणीच्या घरात बसलोय, दोघींची मुलं खेळतायत... वरकरणी तरी सगळं ठीकठाकच आहे की! मग तरी मनावर हा ताण का? या कुटुंबाचं परधर्मीय असणं आजच प्रकर्षानं जाणवायचं काय कारण?
सुरूवातीचं एक-दीड वर्षं संपूर्ण मजल्यावर फक्त आपणच होतो. नंतर एकाशी दोन घरं झाली, मुलांच्या दंग्यामुळे जरा सामसूम तरी कमी झाली. ही चांगली गोष्ट नव्हती का?
की आपलं हे असं गुण्यागोविंदानं राहणं अपरिहार्यतेचा एक भाग होता? आहे?
"आज सुबह सुबह मेरी सास का फोन आया था दिल्लीसे...", अफ़ियाच्या या वाक्यानं प्राजक्ताच्या विचारांची साखळी तुटली. "...इथे स्टेशनजवळ फातिमानगर आहे ना, तिथे माझ्या सासऱ्यांच्या एका जुन्या मित्राची बहीण राहते. तर, काही दिवसांसाठी हे घर बंद ठेवून तिथे जाऊन रहा असं सांगत होत्या मला... मागेच लागल्या होत्या."
प्राजक्ताच्या छातीत धडधडलं.
"मैंने बोला, ये तो हम हरगीज़ नहीं करेंगे! गेली पाच सहा वर्षं ज्यांच्या संगतीत चोवीस तास राहिलो अशा शेजारपाजाऱ्यांवरच कसोटीच्या क्षणी अविश्वास दाखवायचा? मला मुळीच पटणार नाही ते आणि जमणार पण नाही! मी त्यांना स्पष्ट सांगून टाकलं - नशीबात जे असेल ते होईल, असं घर बंद ठेवून वगैरे काहीही फरक पडणार नाही..."
अफ़ियाचे ते उद्गार ऐकून लगेच काय प्रतिक्रिया द्यावी ते प्राजक्ताला उमगेना. पण आपल्याला हायसं वाटलंय हे मात्र तिच्या लक्षात आलं.
इतक्यात तिला कौस्तुभची हाक ऐकू आली, "आईऽऽ, आज्जीचा फोन...".
तशी हातातला पाण्याचा ग्लास पटकन खाली ठेवून ती उठली आणि स्वतःच्या घरात येऊन तिनं रिसीव्हर कानाला लावला. फोनवर तिची आई होती. आईचा आवाज ऐकूनच तिला जरा बरं वाटलं.
"आज कौस्तुभ घरात कसा काय? तुमच्या इथल्याही शाळा-बिळा बंद आहेत?"
"हो. दोन दिवस बंदच आहेत. परवा सकाळीही अर्ध्यातून सोडून दिलं होतं मुलांना. त्यादिवशी बस आली तेव्हा मी नेमकी बाहेर गेले होते. पण अशा वेळी तो थांबतो शेजारी."
"आजही बाहेर गेली होतीस वाटतं? मगाशी फोन उचलला नाहीस तो?"
"हो, रिझर्वेशन्स करायची होती ना. गर्दी होती चिकार, पण पुढच्या महिन्याची २७ तारखेची तिकिटं मिळालीयेत."
"कौस्तुभनं बरं तुला त्रास दिला नाही ते..."
"अगं, नाही, आजही त्याला शेजारीच ठेवून गेले होते."
".........."
"आई, एकदम गप्प का झालीस?"
"तुला माहितीये त्याचं कारण..."
"आई, प्लीजऽऽ, तुझ्या मनातले हे विचार काढून टाक."
"काढून काय टाक? दोन दिवस तिकडच्या काय एकएक भयंकर बातम्या ऐकायला मिळतायत. अशा वेळेला तरी थोडी विचारपूर्वक पावलं उचलत जा गं जरा! कायम स्वतःचंच खरं करायचं असं करून कसं चालेल?"
"आई, आता यावरून आपलीही वादावादी होणार असेल तर मी फोन ठेवते."
"ए, चिडू नकोस बाई, मला काळजी वाटते म्हणून बोलले. म्हणून मी आधी ह्यांनाच म्हणत होते फोन करून तिच्याशी बोला म्हणून. पण ते ही तुझेच वडील! योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायला ती समर्थ आहे म्हणे."
"यस्स्! दॅट्स माय बाबा!"
"हो! आला लगेच पुळका बाबांचा! तुम्ही दोघं मिळून मला एकटी पाडता ..."
"एकटी कुठली? तुझा लाडका जावई आहे ना तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा... तू नुसती एक हाक दे, तो येईलच लगेच धावत!"
"हो मग! आसपास घडणाऱ्या घटनांचं त्यालाच भान आहे जास्त... अगं हो, काल रात्रीचा सायलीचा टॉक-शो पाहिलास का? छानच झाला. विषय हाच होता."
"नाही ना अगं! शेवटी शेवटी पाहिला थोडा. कौस्तुभ काल झोपलाच नाही लवकर. पण तुषार बघत बसला होता. तसंही त्याला सायोची मतं नेहमीच पटतात!"
"तुषार कसा आहे? ऑफिस चालू आहे का त्याचं?"
"हो! गेलाय की आज ऑफिसला."
"काळजी घ्या गं बाई. आणि सांभाळून रहा. अच्छा, ठेवते फोन."
"अच्छा."
रिसीव्हर ठेवून देताना प्राजक्ताच्या चेहऱ्यावर खिन्न हास्य पसरलं.
हे काय चाललंय सगळं? तिकडे अफ़ियाची सासू तिला सांगतेय शेजाऱ्यांपासून सावध रहा. इकडे आपल्या आईचंही तेच! पण इथल्या दैनंदिन आयुष्यात ते खरंच शक्य आहे का याचा विचार कुणीच करत नाहीय.
आता ‘तिकडे’ परिस्थिती कशी असेल? तिचा हात चटकन् टी.व्ही.च्या रिमोटकडे गेला. पण तिनं तो लगेच मागेही घेतला. टी.व्ही. लावून तरी काय करायचं? सगळ्याच झाकोळून टाकणाऱ्या बातम्या, उत्साहवर्धक काहीच नाही...
अचानक झोपेतून जाग यावी आणि हे दुःस्वप्न एकदाचं संपावं असं प्राजक्ताला वाटून गेलं. तशाच खिन्नतेत ती संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागली.
दोन्ही मुलं आतल्या खोलीत चित्रं रंगवत बसली होती. स्वयंपाकघरात प्राजक्ताची चाहूल लागताच कौस्तुभ हातातला रंगीत खडू तिथेच टाकून तिच्या मागे मागे स्वयंपाकघरात आला.
"आई, भूक..."
"थांब, लाडू देते."
लाडूचं नाव ऐकताच सालेमही पळत स्वयंपाकघरात आला. त्याला प्राजक्तानं केलेले मुगाचे लाडू खूप आवडायचे.
"आंटी, मुझे भी चाहिये लाडू।"
"हिंदी में तो उसे लड्डू कहते हैं ना?", कौस्तुभनं लगेच सालेमची चूक सुधारली.
प्राजक्ताला ते ऐकून हसू आलं. तिनं दोन वाट्यांमधे एकएक लाडू काढला आणि दोघांसमोर धरला. वाटीत अपेक्षित मुगाच्या लाडूऐवजी रव्याचा लाडू दिसल्यावर सालेमनं हात मागे घेतला आणि "ये सफ़ेदवाला मुझे नहीं अच्छा लगता..." असं म्हणून तो पुन्हा आतल्या खोलीत निघून गेला. लगेच तो ही लाडू मटकावून कौस्तुभही त्याच्या पाठोपाठ गेला.
तितक्यात प्राजक्ताच्या दारावरची बेल जोरजोरात वाजली. एकदा, दोनदा, चारदा... प्राजक्ता बाहेर येईपर्यंत ती वाजतच राहिली. सोबत अफ़ियाच्या हाकाही ऐकू येत होत्या.
प्राजक्ताच्या काळजाचा ठोका चुकला. त्वरेनं आणि लटपटत्या हातानं तिनं दरवाजा उघडला.
"प्राजक्ता, जल्दी आओ। लगता है हमारे यहा भी कुछ दंगाफ़साद शुरू हो गया है।", असं म्हणून अफ़िया घाईघाईत तिच्या हॉलच्या खिडकीच्या दिशेनं गेली. स्वतःचे भरत आलेले दिवस, खालच्या गुळगुळीत फरशीवरून पाय घसरण्याची शक्यता या कशाकशाचंही तिला भान नव्हतं.
प्राजक्तानं खिडकीजवळ जाऊन ती दाखवत होती त्या दिशेला डोकावून पाहिलं. काही अंतरावर आकाशात काळ्या धुराचे लोट उठले होते. ठिकाण फारसं लांबवरचं वाटत नव्हतं. ते साधारण कुठल्या भागात असेल याचा दोघी विचार करत असतानाच रस्त्यावरून अग्निशमन दलाच्या दोन गाड्या जोरजोरात आवाज करत गेल्या. त्यांच्यापाठोपाठ पोलिसांच्या दोन गाड्याही सायरन वाजवत गेल्या.
"काय झालं असेल गं तिथे?", अफ़ियानं कापऱ्या आवाजात विचारलं. प्राजक्तानं तिच्याकडे चमकून बघितलं. फोनवर आपल्या सासूला प्राप्त परिस्थितीची स्पष्ट कल्पना देतानाच्या धीरोदात्तपणाचा लवलेशही आता तिच्या चेहऱ्यावर नव्हता.
त्याक्षणी एक प्रश्न प्राजक्ताचं काळीज चिरत गेला - अफ़ियाला आपल्या संगतीत असुरक्षित वाटत असेल का?
‘काटकोनातली शेजारीण’मधला गमतीचा भाग जाऊ दे, पण खरंच आपली अस्तित्त्वं एकमेकींना छेदतायत का? भविष्यात छेदणारेत का?
काटकोन करणाऱ्या दोन रेषांनी एकमेकींचं अस्तित्त्व तर मान्य केलंय; पण आडवी रेष आपल्याला व्यवस्थित तोलून धरेल याची उभ्या रेषेला खात्री वाटतेय का? आणीबाणीची परिस्थिती उद्भवली तरी डावी-उजवीकडे न झुकता आपला कणा ताठ राहील याची तिला शाश्वती वाटतेय का?
आडव्या रेषेला उभ्या रेषेचा भार असह्य झाला तर...? आणि त्यापायी काटकोनाचं मिळालेलं लेणं तिनं झुगारून द्यायचं ठरवलं तर...?
तुषारनं काल आपल्याशी किती वाद घातला - तू फार आदर्शवादी विचार करतेस, प्रत्यक्षात जग असं नसतं, जरा भानावर ये, आसपास काय चाल्लंय, मी काय म्हणतोय त्यावर प्रॅक्टिकली विचार कर!
प्रॅक्टिकली विचार कर म्हणे! सुक्याबरोबर ओलंही जळतं, त्यामुळे काडी लावण्यापूर्वी क्षणभर विचार करावा हा प्रॅक्टिकल विचार नाही?
आपापल्या जागी प्रत्येकजण बरोबरच असतो. मग कुणाचा ऍटिट्यूड चुकीचा? सुवर्णमध्य काढायचा कसा आणि कुणी?
आत्ता इथे तुषारही असता तर? हे धुरांचे लोट आणि अफ़ियाचा कावराबावरा चेहरा पाहून त्याला मनातून आनंदाच्या उकळ्या फुटल्या असत्या??
डोक्यात विचारांचं काहूर, काहूर उठलं होतं... मेंदूला बधीर करणाऱ्या अनेक प्रश्नांचा नुसता गुंता झाला होता.
रोजची संध्याकाळची कामंही एकीकडे आवाज देत होती. संकट अथवा सोहळा, सोयर असो वा सुतक, तिन्ही त्रिकाळ पोटाची खळगी तर भरायलाच हवी...!
स्वयंपाक उरकल्यावर प्राजक्ता कौस्तुभला गोष्टींचं पुस्तक वाचून दाखवत बसली होती. एकीकडे ती तुषारचीही वाट बघत होती. संध्याकाळच्या त्या काळ्या धुराची दृष्यं अजूनही नजरेसमोरून हटत नव्हती. इतक्यात फोन वाजला. फोनवर तुषारच होता.
"हॅलो, तुषार, अरे आज संध्याकाळीऽऽ..."
"मी काय सांगतोय ते ऐक आधी... इथे हाय-वे वर दोन ट्रक जाळलेत आणि रस्ता बंद आहे असं कानावर आलंय. बहुतेक कर्फ्यू लागलाय. इथे नक्की काही कळायला मार्ग नाहीय. आम्ही सगळे अजून कंपनीतच आहोत. एच.आर.ची सगळी लोकं पण थांबलीयेत. खबरदारीचा उपाय म्हणून एकेकट्यानं कुणीही घरी जाऊ नका असं सांगितलंय आम्हाला. शक्य झालं तर मी जरा उशीरानंच येईन घरी. नाहीतर इथेच राहीन. तुम्ही दोघं जेवून घ्या. माझी वाट बघू नका."
"अरे, पण तुषार, तुझ्या जेवणाचं..."
"माझ्या जेवणाची चिंता तू करू नकोस गं! आम्ही बघू, इथे काहीतरी करू..." असं म्हणून तुषारनं फोन ठेवून दिला.
प्राजक्ताचे पाय क्षणभर लटपटले.
जाळपोळ...
कर्फ्यू...
खबरदारीचा उपाय...
तिच्या डोक्यात प्रतिध्वनी उमटत राहीले.
अनिश्चितता, धाकधूक यांनी मनात धुमाकूळ घालायला सुरूवात केली.
----------
अचानक प्राजक्ता झोपेतून दचकून जागी झाली. अंथरुणातच ताडकन् उठून बसली. उशाशी ठेवलेलं गजराचं घड्याळ तिनं अंधारात डोळ्यांजवळ धरलं. तीन वाजत होते. म्हणजे तुषार घरी येऊन जेमतेम तास दीडतासच झाला होता. आल्याआल्या त्यानं अंथरुणावर अंग टाकलं होतं. ताटकळत त्याची वाट बघत जागत बसलेल्या प्राजक्तालाही लगेच झोप लागली होती...
आपल्याला नक्की कशामुळे जाग आली? बेल वाजली का? की आपल्याला भास झाला? तिच्या लक्षात येईना. तिनं मान वळवून पाहिलं. तुषार आणि कौस्तुभ गाढ झोपेत होते. त्यांची झोप चाळवलेली नाही म्हणजे आपल्याला भासच झाला असेल असं मनाशी म्हणत प्राजक्तानं कौस्तुभच्या अंगावरचं पांघरूण सारखं केलं आणि ती आडवी झाली. जेमतेम एखादं मिनिट गेलं असेल आणि बेल पुन्हा वाजली - दोन-तीनदा. अर्धवट झोपेत प्राजक्ता पुन्हा दचकली. म्हणजे मगाशी आपल्याला भास झाला नव्हता तर...
तिनं दबक्या आवाजात तुषारला हाक मारली. हलवून जागं केलं.
"तुषार, कुणीतरी बेल वाजवतंय..."
त्यालाही दोन क्षण काही उलगडेना.
"दूधवाला असेल."
"अरे नाही! आत्ताशी तीन वाजलेत फक्त..."
तेवढ्यात तिसऱ्यांदा बेल वाजली.
"कोण असेल आत्ता? बघ ना जरा..."
हेलपाटत तुषार उठला आणि बाहेर दाराशी जाऊन त्यानं कानोसा घेतला. प्राजक्ताही त्याच्यापाठोपाठ बाहेर आली.
"कौन है?"
"मैं हूं, सालेमकी नानी..."
अफ़ियाच्या आईचा आवाज ऐकताच स्वतःशीच काहीतरी पुटपुटत तुषार मागे वळला. त्याच्या त्रासिक चेहऱ्याकडे दुर्लक्ष करत प्राजक्तानं पुढे होऊन दरवाजा उघडला. अफ़ियाची आई अस्वस्थपणे दारात उभी होती. चेहरा कावराबावरा होता.
"क्या हुआ?"
"अफ़ियाला त्रास व्हायला लागलाय. आत्ता हॉस्पिटलला न्यावं लागणार आहे..."
ते ऐकून प्राजक्ता एक क्षणभर गडबडली. मनात शब्दांची जुळवाजुळव करत राहिली. पटकन् निर्णय तर घ्यायलाच हवा होता.
"तुम्ही तयारी करा निघायची, तुषार गाडीतून येईल तुम्हाला सोडायला..."
"अफ़िया म्हणतेय, हवं तर आमच्या कारमधून जाऊ या."
"नाही, नाही, त्याची काही गरज नाही. आमच्या गाडीतून सोडेल तो तुम्हाला."
हायसं वाटल्याप्रमाणे अफ़ियाची आई घरात गेली.
प्राजक्ता अपेक्षेनं मागे वळली. तुषार हॉलमधल्या सोफ्यावरच मागे डोकं टेकून डोळे मिटून बसला होता.
"तुषार..."
"तिचा नवरा काय करतोय? झोपलाय वाटतं डाराडूर..." तसाच तुसडा चेहरा, आवाजाला तीच ती निराळी धार!
"शूंऽऽ, हळू जरा! अरे, तो बंगलोरहून आला नाहीय अजून..."
"का? इतके दिवस असतात का ऑफिसची कामं? की इकडच्या बातम्या ऐकून घाबरून दडून बसलाय अजून तिथेच?? फालतू बेजबाबदारपणा सगळा..."
"तुषार, प्लीजऽऽ...", मनावर शक्य तितका ताबा ठेवत प्राजक्ता म्हणाली, "तुझी ती फडतूस, फालतू वगैरे विशेषणं तात्पुरती बाजूला ठेव. आत्ता ती केवळ एक अडलेली बाई आहे आणि तिला आपल्या मदतीची गरज आहे. समजलं? तरीही तुझी इच्छा नसली तर सांग. मी जाते गाडी घेऊन तिच्याबरोबर. तू थांब मुलांजवळ..."
----------
"काय झालं? मुलगा की मुलगी?"
ऑफिसमधून घरी आल्याआल्या बूट-मोजे काढण्यापूर्वीच तुषारकडून या प्रश्नाची प्राजक्ताला मुळीच अपेक्षा नव्हती. अफ़ियाला आणि तिच्या आईला तिऱ्हाईतासारखं हॉस्पिटलमधे पोहोचवून अर्ध्या तासात घरी परतलेला हाच का तो आपला नवरा असा तिला प्रश्न पडला.
"मुलगी! पण आधी बाहेर परिस्थिती कशी आहे ते सांग. मी आज दिवसभरात बाहेर पडलेच नाही."
"ठीकठाक वाटतंय सगळं. बरीचशी दुकानं-बिकानं उघडलेली होती. कर्फ्यू तर काल रात्रीही नव्हताच. नुसतीच अफवा होती. तिकडेही निवळतंय ना सगळं आता हळूहळू..."
"हं! संपू दे हे आता एकदाचं..."
"चहा कर ना मस्तपैकी आलं घालून... कालच्या जागरणानं डोकं दुखतंय."
"तुषार, थॅन्क्स... काल माझं ऐकलंस त्यासाठी!"
"असू दे, असू दे! तू मला एवढी दमदाटीच केलीस म्हटल्यावर कायऽऽ? अर्ध्या रात्री, तीन वाजता तुला एकटीला जाऊ देणार होतो का मी? नाईलाजच झाला ना माझा!", तुषारनं डोळे मिचकावत प्राजक्ताची समजूत काढण्याचा आव आणला.
डबडबत्या डोळ्यांनी ती नेहमीप्रमाणे त्याच्या गळ्यात पडली.
(समाप्त)