कमोदिनी काय जाणे --- १

विद्यापीठाच्या विद्वत्सभेच्या मीटिंगसाठी पुढ्यातले कागदपत्र उचलून मी केबिनच्या बाहेर पाऊल टाकतानाच गणपा शिपाई धावत आला आणि मला कुणीतरी भेटायला आल्याची वर्दी त्याने दिली.आजची सभा महत्वाची होती बरेच महत्वाचे निर्णय घेणे आवश्यक होते.बऱ्याच महाविद्यालयांनी अनेक नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचे निर्णय घेतले होते पण त्यांच्या यथार्थतेची तपासणी करूनच तशी परवानगी त्यांना द्यावयाची होती.माझ्या विषयाशी संबंधित अभ्यासक्रमाविषयी कुलगुरु मलाच विचारणा करणार हे माहीत असल्याने त्याविषयी मी सर्व तयारी करून ते कागदपत्र तयार केले होते आणि ते कुलगुरूंच्यापुढे आजच जाणे आवश्यक होते त्यामुळे सभेसाठी मला वेळेवर जाणे तितकेच जरुरीचे होते.त्यामुळे मध्ये असा अडथळा आल्यामुळे मी बराच नाराज झालो आणि त्या पाहुण्यांना थांबायला सांग असे गणपाला सांगून मी पुढे सटकलो. पण कॉरिडॉरमधून जाताना मी सहज खाली स्वागतकक्षात नजर टाकली तर तुकारामबुवा मुंडास संभाळत खुर्चीवर बसलेले दिसले आणि मला भेटायला आलेले पाहुणे तेच आहेत हे ध्यानात येताच मी बाकी कसलाही विचार न करता खाली उतरून त्यांना भेटायला धावलो.

" बाबा तुम्ही आणि इथ कसे काय आलात ? इतक कसल महत्वाच काम काढलेय ?"

: काय सांगू बाबा,त्या पोरान माझ्यावर ही पाळी आनली,न्हायतर इथ तुला भेटायला येऊन कोड्यात कशाला टाकायला आलो असतो.?पन तुझ कसल म्हत्वाच काम असल तर अगुदर ते पार पाडून ये मी बसतो तोवर इथ.माझ काम अस पाच मिन्टात आटपणार न्हाय "

" बर ठीक आहे." अस म्हणून गणपाला परत बोलावून त्याच्याकडे थोडे पैसे देऊन बाबांना कॅन्टीनमध्ये नेऊन थोडेफार खायला घालून चहा पाजायला सांगितले आणि मी मीटिंगसाठी गेलो.महत्वाचे विषय असून कार्यक्रमपत्रिकेकडे माझ लक्ष कमीच होत कारण माझ्या मनात तुकारामबाबा इतक्या तडातापडीने कशासाठी आले असावेत हाच विचार होता.

तुकारामबाबा आमच्या गावातले तालेवार शेतकरी, पण मला ते जास्त जवळचे ते माझा वर्गमित्र परशुराम याचे वडील म्हणूनच होते. आता गावातली सगळीच मुले एकमेकाना आणि घरातल्या माणसांना अगदी एकाच कुटुंबातील असल्यासारखीच ओळखत त्यामुळे परशुरामसारख्या दांडग्या पोराची आणि माझ्यासारख्या काडीपैलवानाची दोस्ती असणे ही काही विशेष आश्चर्याची गोष्ट होती अशातला भाग नव्हता. पण त्यातही तुकारामबाबानी एकदा त्याला घरी आणून "मास्तर आता या पोराला जर काही चार अक्षर लिवता आली तर तुमच्याकडनच ते काम व्हयील" अस म्हणून आमच्या दादांच्या पायावर घातले आणि मग दादानीही

,"काही काळजी करू नको तुकाराम, करील तो आमच्या गोविंदाबरोबर अभ्यास आणि होत जाईल पास "

अस म्हणून जणु ती माझीच जबाबदारी असल्यासारख परशुरामला माझ्यावरच सोपवल.त्यामुळे आमची विशेष दोस्ती होती.

परशुराम दांडगा तर होताच पण तितकाच वांडही. एक अभ्यास सोडला तर इतर सगळ्याच बाबतीत भलताच तयार गडी म्हणजे अगदी व्यंकूच्या शिकवणीतल्या व्यकूचाच अवतार त्यामुळे जरी मी त्याचा शाळेतील अभ्यास घेण्याचा आपल्या परीने प्रयत्न करत असलो तरी परीक्षेच्या वेळी त्याचे ( उत्तरपत्रिकेचे) पानही माझ्या मदतीशिवाय हालत नसे.पण मग इतर वेळी मात्र आमच्या गुरुशिष्याच्या नात्यात अदलाबदल होत असे. कारण एक अभ्यास सोडला तर त्याचे सामान्यज्ञान अफाट होते. कधीमधी त्याचे डोस पाजून तो माझ्या ज्ञानाची पातळी वाढवायचा प्रयत्न करायचाही पण मी जसा त्याच्या शालेय ज्ञानाची पातळी वाढवण्यात कुचकामी ठरत असे तीच गत त्याचीही व्हायची आणि इतकी पुस्तकेच्या पुस्तके पाठ करणाऱ्या मला इतकी साधीही गोष्ट कशी कळत नाही याचे त्याला आश्चर्य वाटायचे शेवटी तो कंटाळून " लेका गोंद्या तुला न्हाय कळायचे " म्हणून माझा नाद सोडायचा.

बहुधा उन्हाळ्यात आमचा मुक्काम त्याच्या शेतातील झाडाखाली असायचा आपल्या परीने दादानी तुकारामबाबाना दिलेला शब्द पाळायचा म्हणून त्याला चार शब्द शिकवता आले तर बघावे असा माझा विचार असायचा. तर हा पठ्ठ्या थोडावेळ मुकाटपणे माझ्याजवळ बसायचाही पण अचानक त्याला काय लहर यायची कुणास ठाउक ,"गोंद्या आलोच इतक्यात " म्हणून झटकन तो पसार व्हायचा आणि उभ्या उसात शिरायचा थोड्या वेळात परत येऊन परत अभ्यासाला लागायचा आव आणायचा.एकदा हा असा मधेच कोठे जातो म्हणून मी त्याच्या परत येण्याकडे लक्ष देऊन पाहिल्यावर तो बाहेर यायला आणि पलीकडून त्याच्याच शेतावर काम करणारी सखू दुसऱ्या बाजूने साडी सावरीत बाहेर पडायला एकच गाठ पडली. सखू चांगलीच उफाड्याची पोरगी होती आणि गावातल्या बऱ्याच वांड पोराना झुलवीत होती याची कल्पना असल्याने एकदम सगळा प्रकार माझ्या लक्षात आला मग मात्र जरा ओशाळून,"लेका गोंद्या सांगू नकोस बरका माझ्या बापाला " अशी त्याने तंबीवजा विनंती मला केली.अर्थात अशा गोष्टी त्याच्या बापाला सांगण्याची आवश्यकता होती अशातला भाग नव्हता.

तुकारामबुवा माळकरी असले तरी काही बोळ्याने दूध पीत नव्हते.आपल्या पोराच लक्ष कुठे आहे हे त्यानी पण हेरले होतेच.शिवाय माझ्या ताब्यात देऊनही परशुभाऊ मॅट्रिकपर्यंत काही मजल गाठणार नाहीत याची लक्षणे दिसायला लागली.माझ्या खांद्यावरून माझ्या पेपरात पाहून लिहिण्याची त्याची कुवत माझी उंची जसजशी वाढत गेली तशी कमी होऊन नंतर जवळजवळ संपलीच आणि मग नववीतच नापास होऊन शाळा सोडण्याची पाळी त्याच्यावर आली. आणि त्याला पूर्ण वेळ शेतीकडे लक्ष द्यायला त्यानी लावले.कॉलेजच्या शिक्षणासाठी गाव सोडून मी शहरात गेलो आणि सुट्टी लागल्यावर घरी परतलो.भावंडाबरोबर मस्ती करण्यात थोडा वेळ झाल्यावर मला एकदम परशुरामची आठवण झाली आणि मी धाकट्या भावाला विचारले," अरे परशुराम कसा दिसला नाही मी आलो हे कळूनही फिरकला नाही?"

" तो कसला येतोय आता ?" भाऊ हसत हसत म्हणाला,"का ,काय झाल ?" मी विचारले आणि त्याने दिलेले उत्तर ऐकून चाट पडलो," त्याच लग्न करून टाकल तुकारामबुवानी "

परशुरामच लग्नही झाल आणि त्याच्या लग्नाला मला तुकारामबुवांनी बोलावल देखील नाही याचा मला रागच आला आणि तसाच जाऊन त्याना जाब विचारायच म्हणून मी घाईघाईने बाहेर पडून त्यांच्याचकडे गेलो. घरात परशुराम नव्हताच.तुकारामबुवा समोरच्या पडवीतच बसून अंगणात काम करणाऱ्या पोरांना सूचना देत होते. मला बघताच त्यांचा चेहरा फुलला."अरेवा गोविंदा तू कवा आलास ?"पण मी त्यांचे स्वागत स्वीकारण्याच्या मनस्थितीत नव्हतो,"हे काय बाबा,परशुरामचे लग्न करायची इतकी का घाई केलीत आणि मलासुद्धा पत्ता लागू दिला नाही,मी रागावलो आहे तुमच्यावर "

" खर हाय,रागाव बाबा रागाव आमच्याकडन चुकी झालीय खरी पण त्याला कारणही तसच होत."

" कसल कारण " अजून माझा रागाचा पारा उतरला नव्हता.

" हे बघ गोविंदा,आमच पोरग काय हाय आणि कस हाय हे तुला तरी सांगायला पायजे अस काय न्हायी. साळ्त काय दिव लावल ते तर तुला म्हाइतच हाय.ती सुटल्यावर म्हटल पोराला शेतीकडंच चांगल लक्ष द्यायला लावू पण तिथबी त्याच लक्ष भलतीकडच आता तूच सांग अगोदर कामाला बाप्ये मंडळी मिळतात का ? जो उठतो तो शहरात जातो आणि बाया लावाव्या तर कामावर एक बाई टिकायला तयार न्हायी. प्रत्येकीची काहीतरी कलागत काढतोयच हा पोरगा ,मग शेतातली इतकी काम कुणी करायची? आता आमा दोगाना काही फार काम जमत न्हायी.आणि परशाला पाठवल की नस्ते उद्योग करणार आनि कायतरी बिलामत आणणार.मंग ठरवल याला पहिल्यांदा अडकवून टाकायच म्हणजे इकड तिकड नजरच जायला नको. त्याचा मामाबी पाठी लागला होता. त्याची पोरगी आहे पण चांगली ,मग पाहिला एक चांगला मुहुर्त आन टाकला उडवून बार.दादाना सांगितले तुला कळवायला पण ते म्हणाले त्याची परीक्षा चालू आहे म्हणून त्याला काही कळवू नका आल्यावर कळेलच आणि भेटल त्याला.आता तूच सांग आमच काही चुकल का ?"

तुकारामबुवांच काही चुकले असे मला म्हणता येईना. माझा मित्र चांगलाच शौकीन आहे याची कल्पना मला पण आलेली होतीच त्यामुळे तुकारामबाबांना योग्य होते तेच त्यानी केल अस मला कबूल करावच लागला,"मग आता तरी आलीय का स्वारी वळणावर ?"मी विचारल."आता अगदी झकास चाललय बघ सगळ. शेतीकड पण लक्ष व्यवस्थित द्यायला लागलाय आणि बायको तर अगदी खुषीतच आहे.बर वाटत बघ आता" त्यांचा चेहऱ्यावरला आनंद पाहून मलाही बरे वाटले.

त्या काळात आणि त्यातही परशुरामाच्या घरात लवकर लग्न करणे हा काही फार आगळावेगळा प्रकार नव्हता. शाळेत असतानाच आमच्या वर्गातल्या एकदोन पोरांची लग्न झालेली होती.त्यामुळे परशुरामाला लग्नाच्या बेडीत अडकवून तुकारामबुवानी काही वेगळ केल अस मला काही वाटल नाही.आणि परशुराम आणि धुरपाची म्हणजे त्याच्या बायकोची जोडी पाहिल्यावर त्याचा हेवाच करावा वाटला.धुरपा त्याला अगदी साजेशीच होती.मला पाहिल्यावर परशुरामला एकदम आनंदाचे भरते आले आणि त्याने मला मिठीतच घेतले.त्याच्या मिठीतून सुटका झाल्यावर धुरपाकड वळून त्याने माझी ओळख करून दिली.

" धुरपा हा माझा अगदी जानी दोस्त,गोविंदा आणि गोविंदा ही ---"

" सगळ सांगितलेय मला बाबानी " मी त्याला मध्येच अडवत म्हणालो.

" बरका वैनी तुमचा नवऱ्यान मला खूप त्रास दिलाय अभ्यासासाठी."

" आनि अभ्यास तर केलाच न्हाई ना? सगळ हाय मला माहीत. बाबानी सांगितलेय " धुरपान तिच्या गोड पण खणखणीत आवाजात सांगितल.ही परशुरामाला बरोबर संभाळेल याची खात्री पटली तेव्हांच मला.

" बसा थोड च्यापान्याच बघ्ती " आम्हाला सोडून आत शिरत धुरपा म्हणाली.

" लेका परशा,मजा हाय तुझी." त्याच्या पाठीवर थाप मारत मी म्हणालो. परशुभाऊ काहीच बोलले नाहीत पण एकूण तोही मजेत होता यात वाद नव्हता.

परशुरामात लग्न झाल्यामुळे फारच फरक पडला होता.आता अगदी तुकारामबाबांचा मुलगा शोभायला लागला होता.घरातली सगळी जबाबदारी त्या दोघांनी संभाळली होती. आणि तुकारामबाबा आणि त्याची आई दोघ अगदी पूर्णपणे निवृत्ती पत्करल्यासारखे वागू लागले होते आणि तरीही त्यांचा संसारातील सहभाग कमी होऊ न देण्याची दक्षता मात्र परशुराम आणि धुरपाने घेतली होती कारण अंगणात दोन नातवंडे खेळू लागली आणि त्यांच्या मागे फिरताफिरता तुकारामबुवा आणि रखमा आईला दमून पुरेवाट व्हायला लागले.त्यापेक्षा शेतीतले काम परवडले असे त्याना वाटू लागले.

मी इंजिनियरिंगची शेवटची परीक्षा देऊन आलो तेव्हां परशुराम अगदी वेगळाच भासू लागला .हा पूर्वीचाच परशुराम आहे का याविषयी मलाच शंका वाटू लागली.तुकारामबाबांना मात्र एकदम लेक सुधारल्याचा अत्यानंद झाला आणि ज्याला त्याला ते सांगू लागले."तुका म्हणे कृपा केली नारायणे । जाणिले ते येणे अनुभवे ॥" कारण परशुरामही तुकरामबाबांसारखाच माळकरी झाला होता भजन पूजन अगदी भक्तिभावाने करू लागला होता. जणु त्याने " प्रपंच साधुनि परमार्थाचा लाभ जेणे केला तो नर भला भला " हा बापाचा आदर्शच समोर ठेवला होता.

माझी आणि त्याची गाठ पडली त्यावेळी कपाळास बुक्का, गळ्यात माळ,गोपीचंदनाचा लेप असा परशुराम समोर आल्यावर हा लहानपणी माझ्याशेजारी बसून कुचाळक्या करणारा किंवा शेतातील बायकांची छॅड काढणारा परशुरामच आहे यावर क्षणभर माझा विश्वासच बसेना.धुरपाही अगदी त्याला शोभेशीच दिसत होती.दोघ विठ्ठल रखुमाई अन्‍ त्यांची दोन गोजिरवाणी पिले अशा या सुखी संसारास दृष्ट लागू नये अशी मी मनोमन प्रार्थना केली. पण ती ऐकण्याचे देवाच्या मनात नव्हते की काय कोण जाणे !

* * * * * * * * * * * * * *

मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. मी चांगल्या प्रकारे इंजिनियरिंगची परीक्षा पास झालो होतो आणि माझ्या प्रवृत्तीस योग्य अशा प्राध्यापकाच्याच नोकरीत दाखल झालो होतो. माझा मुक्काम आता गावात न रहाता मी पुण्यातच स्थायिक झालो होतो.पण माझ्या आईवडिलांनी मात्र गाव सोडायला नकार दिला त्यामुळे मधून मधून गावाकडे मी सपत्निक-- हो आत्तापर्यंत मीही संसारी पुरुष बनलो होतो-- चक्कर मारत होतो आणि त्यावेळी परशुभाऊची पूर्वीच्याच जिव्हाळ्याने गाठ घेत असे.तोही एकदा पंढरपुरी जाताना मुद्दाम वाकडी वाट करून पुण्यात आला आणि माझाही संसार त्याच्यासारखाच बहरलेला पाहून आनंदी झाला.पण आल्या आल्या त्याने मला साष्टांग नमस्कारच घातल्यावर .मी एकदम चमकलोच.

" अरे परशुरामा हे काय ?" त्याला उठवून जवळ घेत मी म्हणालो.

" अरे गोविंदा,सर्वाभूती परमेश्वर अस तुकोबाराय सांगून गेले आहेत.मी नमस्कार केला तो तुला नाही तर तुझ्यामधल्या ईश्वराला."

परशुरामचे बोलणेही फारच सुधारले होते

गावाकडे गेल्यावर त्याच्या होणाऱ्या प्रत्येक भेटीत त्याच्यात अधिकच बदल घडत असलेला दिसत असे.तुकारामबुवांचा अगदी खराखुरा वारसच शोभू लागला होता तो.म्हणजे संसार तो अगदी अलिप्तपणे करत होता असे वाटू लागले.कारण एकदा माझी गावाकडे चक्कर झाली तेव्हां त्याच्या घरी गेल्यावर तो घरात नसून माळावर गेला आहे असे त्याच्या बायकोकडून ऐकायला मिळाले. हे काय करतोय हा शहाणा असे म्हणत मी त्याला शिव्या देतच माळावर गेलो तर हा पट्ठ्या एका झाडाखाली अगदी ध्यानमग्न असल्यासारखा बसलेला !

मी जवळ जाताच त्याला चाहूल लागून त्याने डोळे उघडले आणि एकदम उठून "ये गोविंदा ये,तुझ्या पायाची धूळ घेऊ दे मला "म्हणून मागील वेळेप्रमाणेच हा आता माझ्या पायावर डोके ठेवणार या भीतीने लगेच त्याला जवळ घेऊन मिठीत घेत तो अतिप्रसंग टाळण्यात मी कसाबसा यशस्वी झालो.आणि म्हणालो,

"अरे परशुभाऊ काय चालवले आहेस हे ? तू काय स्वत:ला तुकाराम समजू लागला आहेस का?"

" अरे बाबा त्याच्या पायाच्या धुळीची तरी सर येणार आहे का या पामराला ?"

" पण मग त्यांनीच जोडोनिया धन उत्तम वेव्हारे उदास विचारे वेच करी हे सांगून ठेवले आहे ते विसरलास का? आणि तुझे हे सध्या काय चालले आहे ?तुकारामबाबा आणि रुक्मिणी आई तुझ्यावर डोळे लावून बसलेले आहेत. तुला बायको आहे दोन गोजिरवाणी मुल आहेत आणि त्या सगळ्यांची जबाबदारी आता तुझ्यावर आहे."

"गोविंदा या सगळ्यांची काळजी घ्यायला माझा विठ्ठल समर्थ आहे.

माझी सर्व चिंता आहे विठोबासी ।
मी त्याच्या पायाशी न विसंबे ॥

आणीक दुसरे मज नाही आता ।
नेमिले गे चित्ता पासूनिया ॥

पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी ।
जागृती स्वप्नी पांडुरंग ॥"

परशूला आता काही सांगण्यात अर्थ आहे असे मला वाटेना.तुकारामबाबाच्या मुलाला तुकारामाचच भूत लागल होत.आणि ते उतरवण्याचे मंत्रसामर्थ्य माझ्याजवळ नव्हते.त्याची मजल आता कुठपर्यंत जाते हे फक्त पहाणेच काय ते माझ्या हातात होत.

मी पुण्यास परत गेलो आणि एक दिवस माझा क्लास ऐन रंगात आला असताना वर्गातच निरोप घेऊन शिपाई आला मला भेटायला कोणीतरी आले आहे असा निरोप घेऊन.नाइलाजाने मी बाहेर पडून पहातो तो परशुराम.मला पाया पडण्याचा त्याचा प्रयत्न मी त्याला तातडीने खुर्चीवर बसवत हाणून पाडला आणि ,"बोला पांडुरंगा " अस त्याच्याच थाटात मी म्हणाल्यामुळे तो जरा वरमलाच. पण मग त्याला जरा चुचकारत मी म्हणालो,"कस काय येण केल परशुरामा ?संतकृपा होणार की नाही पामरावर?"

लगेचच त्याच वेड काही ओसरले नव्हते हे त्याने जाणवून दिले. कारण माझ्या या प्रश्नावर उत्तर देताना तो म्हणाला,

" गोविंदा,कसे सांगू तुला ?सांगायला लाज वाटते रे पण सांगायलाच पाहिजे तुला. दिवसभर पांडुरंगाचे नाम मुखात असत आणि रात्री पण तेच मुखावर असाव अस वाटते पण कधी कधी पापी मनाला काही आवर घालता येत नाही विकारांना आवर घालता येत नाही त्यामुळे वाटू लागलय

पापाची वासना नको दावू डोळा त्याहून आंधळा बराच मी

अपवित्र वाणी नको माझ्या मुखा त्याजहूनि मुका बराच मी "

" अरे हो हो तुला काय म्हणायचे आहे परशुरामा ?" त्याला आवरत मी म्हणालो.

"कस सांगू तुला गोविंदा.पांडुरंगाचा क्षणभरही विसर पडायला नको अशी माझी इच्छा आहे"

"मग तू काय करतो आहेस तुझ्या मुखी बसता उठता पांडुरंगच आहे की"

"खरे आहे पण काही क्षण असे येतात की या सगळ्या गोष्टींचा विसर पडतो.विकारांचा पगडा मनावर पडतो समोर बायकोला पाहिल्यावर रहावत नाही आणि मग माझा तोल सुटतो"

" अरे मग त्यात विशेष ते काय ?ती नैसर्गिक प्रवृत्ती आहे.अगदी तुकाराम महाराजानासुद्धा मुले झालीच ना ?"

" नाही गोविंदा आता अशा मोहावर विजय मिळवता आला पाहिजे आणि तसे होत नसेल तर "त्याहून आंधळा बराच मी" म्हणून मी तुझ्याकडे आलोय.मला त्या वासनेचे मूळच खुडून टाकायचे आहे आणि त्यासाठी तुझी मदत पाहिजे."

परशुरामाचा विचार ऐकून मी चकितच झालो.

"तुला वेडबीड लागले नाही ना?आणि तुझ्या या भक्तिमार्गात धुरपावहिनीचा विचार केलास का?ती काय म्हणेल माहीत आहे का?"

" ते मला काही माहीत नाही.आणि तू पण मला काही एक सांगू नकोस पांडुरंगाच्या नामस्मरणात जराही खंड पडलेला खपणार नाही मला . मग एकच सांग मला मदत करणार की नाही ?"

"मी काय मदत करणार तुला?"

" तुझ्या माहितीचा असा कोणीतरी डॉक्टर असेलच की असले ऑपरेशन करणारा."

"परशा वेडा की खुळा तू?"आता मात्र माझा तोल सुटला आणि अनेक दिवसांनी त्याला परशा या नावाने मी हाक मारली.

" हे बघ असले काही करणार असशील तर तुझा माझा संबंध संपला.चल मी आत्ताच तुझ्याबरोबर येतो आणि तुकारामबाबांना सांगतो हा तुझा अघोरी विचार."

" नाही गोविंदा पांडुरंगाच्या नामस्मरणात जराही खंड पडलेला मला सहन होत नाही आणि त्यात ही मोठी धोंड आहे आणि ती मला दूर करावीच लागेल"

शेवटी त्याच्या समाधानासाठी मी त्याला माझा मित्र डॉ.लिखितेकडे घेऊन गेलो.त्याने त्याला अशी शस्त्रक्रिया करण्याचा परिणाम सांगावा अशी माझी इच्छा होती.आणि अर्थातच तो त्याला त्या प्रकारापासून निवृत्त करेल याविषयी मला खात्री होती.डॉ.लिखितेने त्याला काय सांगितले कोणास ठाऊक पण परशुराम नंतर बराच निवळल्यासारखा दिसला आणि मीच त्याची गावाकडे रवानगी केली.आणि आता सगळे सुरळीत चालले असेल अशा समजुतीत मी असतानाच आज अचानक तुकारामबाबाना आलेले पाहून मला मोठे आश्चर्य वाटले.

"गोविंदा,शेवटी परशानं जे करायला नको होत तेच केलं." मला पहाताच तुकारामबाबानी डोळ्यात पाणी आणून मला जवळ जवळ मिठीच मारत हंबरडा फोडला.

" काय सांगताय काय बाबा ?डॉ.लिखित्यांनी त्याला किती समजावले होते आणि मला खात्री झाली होती की आता तो ताळ्यावर आला म्हणून "

"न्हाय र पोरा त्यान दुसरे कुणी करायला तयार नाहीत म्हणून आपल्या हातानच कुऱ्हाडीच्या पात्यान स्वत:ला खच्ची करून घेतल.लगेच दवाखान्यात घेऊन जाव लागल तेव्हा कुठ पोर हाती लागल."

इतक कसल वैराग्य आल होत या परशाला.मला काही समजतच नव्हत आणि आता त्याचा उपयोगही नव्हता.सूरदासांनी विकारांवर ताबा मिळण्यासाठी स्वत:चे डोळे फोडून घेतले होते हे माहीत होते पण आजच्या काळात असा महान भक्त कोणी निघेल आणि तोही प्रत्यक्ष माझा जवळचा मित्रच असे वाटले नव्हते पण झाले तरी होते तसेच !

तुकारामबुवांच सांत्वन करणे अवघड होते तरीही मी कसेबसे त्याना सावरण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी त्याना बरे वाटावे म्हणून त्यांच्याबरोबरच गावी जाऊन परशुरामला भेटायचेही कबूल केले आणखी दोन तीन दिवसांनी खरोखरच गावाकडे चक्कर मारली नाहीतरी आईबाबांची पण गाठ बरेच दिवसात घेतली नव्हती.

गावी गेल्यावर लगेचच परशुरामकडे गेलो.घरात शिरताच तोच समोर आला.बराच अशक्त झाल्याचे जाणवत होते.

"गोविंदा ,जय पांडुरंग" हल्ली तो रामराम न म्हणता असेच म्हणायचा तेवढेच नामस्मरण.

"आता मी सगळ्या विकारातून मुक्त झालो गोविंदा आता उरलोय केवळ नामापुरता.दुसर कसलही व्यसन नाही,मोह नाही

"तरीच जन्मा यावे । दास विठ्ठलाचे व्हावे ।
नाहीतरी काय थोडी । श्वान शूकरे बापुडी ।

झाल्याचे ते फळ । अंगी लागो नेदी मळ ।
तुका म्हणे भले । त्याच्या नावे मानवले।

"अशी परिस्थिती झालीय.दुसरे कसलेही व्यवधान नाही.केवळ विठ्ठल आणि विठ्ठल !"

परशुराम अगदी पांदुरंगमय झालेला दिसत होता.तेवढ्यात आतून धुरपाला भेटून बाहेर आलेल्या माझ्या बायकोने झटक्याने मला चलायचा इशारा केला.परशुरामासारखा मीही पांदुरंगमय होतो की काय अशी भीती कदाचित तिला वाटली असावी.

परशुरामाच्या पांडुरंगकीर्तनाचा हाच उत्तररंग असावा आता भरतवाक्य म्हणून हेचि दान देगा देवा होणार असे मी गृहीत धरून चाललो होतो पण माझा हाही अंदाज चुकणार असे वाटू लागले.