कमोदिनी काय जाणे ---- २

    (पहिल्या भागातील कथानक काल्पनिक आणि त्यामुळे असंभवनीय वाटण्याची शक्यता आहे पण ती प्रत्यक्ष घडलेली घटना आहे, यापुढील भाग मात्र कल्पनेचा खेळ आहे )

     परशुरामच पांडुरंगवेड हळूहळू ओसरायला लागलेय अशी कुणकुण मधूनमधून कानावर यायला लागली.गावाकडच्या बातम्या कळण्याचे हमखास साधन म्हणजे गावाकडून येणारी माणस.पुण्याला प्रत्येकाचच काहीनाकाहीतरी काम मधूनमधून निघायचेच आणि अशावेळी कुलकर्ण्याचा गोइंदा तिथच आहे याची प्रत्येकाला पक्की आठवण असायची.जमल तर कामही माझ्याकडून करून घ्याव आणि मुक्काम करावाच लागला तर रात्रीची पथारी माझ्या दिवाणखान्यात पसरावी हा उद्देश असायचाच अर्थात मीही गाववाल्यांची अशी नड भागवणे हे आपले कर्तव्यच आहे असे समजत असे आणि  त्यांची वर्दळ माझ्या बायकोला त्रासदायक वाटली तरी तीही त्याला सरावली होती.त्यामुळे परशुरामचा शेजारी गुंडेराव त्यादिवशी कामानिमित्त माझ्याकडे आल्यावर नेहमीसारखेच त्याचे आगतस्वागत तिने केले .तिचे सगळे आयुष्य शहरात गेलेले त्यामुळे मधून मधून गावाकडच्या गप्पा ऐकायला तिलाही मजा वाटे.  या गोष्टींचे तिला अप्रूप वाटे.रात्री गप्पा मारताना परशुरामाचा विषय निघालाच

"त्याच काही खर नाही गोइंदराव" इति गुंडेराव

" का काय झाल त्याचा पांडुरंग सुटला का.तसे असेल तर बरेच झाले की"

" अहो,पांडुरंग एकवेळ सुटला असता तर बरेच होते पण आता बायकोही सुटणार असे दिसते."

आमच्याच नाही तर कुठल्याही लहान गावांची एक खासियत असते.इथ कुठलीच गोष्ट लपून रहात नाही.एकतर गावातल्या लोकांना उद्योग कमीच असतात आणि एकमेकाच्या वर्मावर त्यांची अगदी बारीक नजर असते.बऱ्याच वेळा घरातल्या लोकांनाही माहीत नसतील अशा गोष्टी बाहेरच्या लोकांनाच अगोदर माहीत झालेल्या असतात.विशेषत: कुठली बाई कुणाला लागू आहे हे तर मांजराला आपण डोळे मिटून दूध पीत आहोत असे वाटत असले तरी बाकीकडे केव्हांच बोंबाबोंब आलेली असते त्यामुळे परशुरामाची काय परिस्थिती आहे हे गुंडेरावाकडून समजून घेण्यासंबंधी मला उत्सुकता लागली.

"का बायको तर चांगली होती बिचाऱ्याची आणि किती जीव होता तिचा त्याच्यावर " मी म्हणालो

" आपण त्यांच्याकडे गेलो  तेव्हांच मला जरा शंका वाटतच होती" मध्येच माझ्या बायकोने फुसकुली सोडली.

" हो तुला काय शंका येण्यासारख घडल ? आली अगदी सांगायला--- "तिचे विकेट घेण्याच्या उद्देशान मी बोललो पण मग  गुंडेरावासमोर तिला असे बोलणे बरे नव्हे ही जाणीव होऊन मी माझे वाक्य मध्येच सोडले.

" वहिनींची शंका अगदी बरोबर आहे" गुंडेरावानेही तिला सावरल. आणि तो पुढे म्हणाला

"हे तुमचे म्हणणे अगदी खरे की दोघांचा एकमेकावर फर जीव होता पण एक गोष्ट ध्यानात घे गोइंदा आता ही एवढी तरूण बाई आणि परशुराम तर लहानपणापासून कसा होता हे काही तुला सांगायला नकोच. अगदी लहानपणापासून शेतावरली म्हणू नको की वाड्यावरली म्हणू नको पण बाई दिसली की घाल खाली असाच गड्याचा नेहमीचा खाक्या मग अशा गड्याची संवय पडलेल्या त्याच्या बायकोला आता जनमभरच चातुर्मास कसा सोसणार ? त्या बाईन मग कुणाकड जाव? देहधर्म कुणाला सुटलाय का?त्यात नवरा सदैव समोर दिसणार रातचा जवळ झोपणार मग तिची बिचारीची आग कशी विझनार ?"

" पण बाईच्या जातीन ---" मी बोलण्याचा प्रयत्न केला

"शाब्बास बाई म्हनजे काय माणूस न्हाई ? त्यात मी म्हणतो नवरा अगदी समजा मेलाच तर एकादी बाई तशी राहीलही न्हायतर दुसरा घरोबा करायला मोकळी तरी होईल."

"परदेशात तर विवाहबाह्य संबंध गृहीतच धरलेले असतात.आपल्याच देशात ही सगळी बंधन आणि तीही फक्त स्त्रीवर" मध्येच माझ्या बहुश्रुत बायकोने आमच्या वर्मावर बोट ठेवले.

" तर वहिनी परिस्थिती अशी आहे मग आता परशाच्या बायकोन काय कराव आणि आता परशान तरी काय कराव की दोघांनीही असच कुचमत दिवस काढायचे?"

" बघूया काहीतरी मार्ग निघेल " मी आशादायक सूर काढून झोपण्याच्या तयारीला लागलो.         

===================

  गुंडेरावने परशुराम या विषयावरची खपली काढल्यावर त्याचे निराकरण झाल्याशिवाय मल चैन पडणे शक्य नव्हते पण त्यासाठी परशुरामचीच गाठ पहाणे आवश्यक होते,तशी संधी लवकरच आलीही.गुंडेराव परत गेल्यावर आठवड्याभरातच परशुरामच पुण्यात आला. यावेळी तो माझ्याकडेच आला होता .

"काय भाऊ काय म्हणतोय तुझा पांडुरंग ?"

" घाल त्या पांडुरंगाला चुलीत "

" कारे बाबा पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी  जागृतीस्वप्नी पांडुरंग अशी तुझी अवस्था होती ना आणि आता एकदम त्याला चुलीतच घालायला निघालास.तुकारामाची एकदम आवली कशी काय झाली ?" त्याच्या चुलीच्या आगीत आणखी तेल ओतत मी म्हणालो.

" बोल बाबा बोल घे करून थट्टा .मी आहेच त्या लायकीचा.तू चांगल मला सांगत होतास ते मी ऐकल नाही आता तर माझी बायकोच जिथ मला विचारत नाही तिथ मी तुला कशाला दोष देऊ?" परशुराम हताश सुरात उद्गारला.

"ऐका हो ते काय म्हणतात आधीच ते पोळलेत आणखी वर त्यांच्या दु:खावर डागण्या कशाला देताय? तुम्ही त्यांचे मित्र म्हणवता ना मग अशावेळी त्याना मदत करायचे राह्यले बाजूला आणि त्यानाच का छळताय ?"माझी बायको त्याचीच कड घेऊन मला बोलू लागल्यावर मला गप्प बसावे लागले,पण तरी तिला थोडे खिजवावे म्हणून मी म्हणालो

"तुला त्याच्यापेक्षा त्याच्या बायकोचाच जास्त पुळका असणार हे उघडच आहे."

" हो मग त्यात काय चूक आहे?" आपले म्हणणेच योग्य असण्याची खात्री असणारी बायको बोलली

"आणि भावोजी आणि धुरपा काही वेगळे आहेत ?"

" गोविंदा,आता तूच मला तार.मला पहिल्यासारख व्हायचेय.धुरपाचे हाल मला पहावत नाहीत.माझा गाढवपणा मला भोवला आणि आता सगळ्या संसाराचाच इस्कोट व्हायची वेळ आली आहे. उद्या ती कुणाचा हात धरून पळून गेली तर मग मी कुणाला दोष देऊ?"

" परश्या अक्कल गहाण ठेवून नको ते करून बसलास आणि आता ते सरळ कर म्हणतोस.अरे शहाण्या कागद कापून पुन्हा जोडता येतो का उसाची कांडी करून पुन्हा आखखा उस करून दे म्हटलस तर जमेल का,केळ कुस्करून त्याच शिक्रण करून मग पुन्हा केळ करून दे -- "

" तुझे दृष्टांत नकोत मला गोंद्या .हे जे काय झाल त्याला काही उपाय सुचतो का सांग.आणि काय रे लहानपणी गणपतीची मूर्ती करताना सोंड तुटली तर आपण चिकटवायचो ते विसरलास का? मला वाटल तुझ्या इंजिनेरीत अस काहीतरी असेल लिहलेल म्हणून आलो मोठ्या आशेने तर मलाच तत्त्वज्ञान शिकवायला लागलास, काही उपाय सुचतो का सांग नाहीतर चाललो मी पुन्हा "

परशुरामने गणपतीचा दाखला दिल्यावर एकदम काहीतरी आठवल्यामुळे मी म्हणालो,

" खरे बोललास परशुभाऊ,माझा एक डॉक्टर मित्र आहे खरा अशा उचापती करणारा.नुकताच अमेरिकेतून प्लास्टिक सर्जरीचे उच्च शिक्षण घेऊन आलाय ,त्याला भेटून बघूया काही उपाय आहे का बृहन्नडेचा अर्जुन बनवायला."

" गोविंदा लई उपकार होतील बघ अस काही जमल तर "

" ए परशा असल काही बोलणार असशील तर लाग चालायला,तुझ्या बायकोची तुझ्या वहिनीला काळजी लागून राह्यलीय म्हणून सगळ करतोय नाहीतर राह्यला असतास शेपूट तुटलेल्या कोल्ह्यासारखा तर माझ काही नसत बिघडल." मी मुद्दामच त्याला चिडवत म्हणालो.

    डॉ.साळूंके माझा कॉलेजमधला दोस्त.त्यावेळी केवळ गणित जमत नाही म्हणून इंजीनियर व्हायच असून त्याला मेडिकलला जावे लागले पण त्या क्षेत्रातही राहून आपले इंजिनियरिंग कौशल्य चालवून हाडे व्यवस्थोत जोडत होता आणि आता तर प्लास्टिक सर्जन झाल्यामुळे त्याच्या कल्पकतेला बराच वाव मिळणार होता.त्याला फोन केल्यावर त्याने लगेचच बोलावले. त्याच्याकडे गेल्यावर परशुरामाची चित्तरकथा सांगितल्यावर तो म्हणाला,

" ही केस  जरा विचित्र आहे ,लिंगबदल शस्त्रक्रिया अमेरिकेत आता सर्रास व्हायला लागल्या आहेत,पण त्या बहुतेक पुरुषांचे स्त्रीत रूपांतर अशा च स्वरुपाच्या आहेत.असा उलटसुलट प्रकार त्यात बसतो की नाही पहायला हवे.मी स्वत: तरी त्याबाबतीत धोका पत्करणार नाही नाहीतर करायला गेलो गणपती आणि झाला मारुती  अस व्हायच."

हे त्याचे उद्गार ऐकून परशुरामाचा चेहरा अगदी पहावेनासा झाला पण त्याचे पुढील उद्गार जरा त्याला धीर देऊन गेले,

"पण तरीही आपण डॉ.डॉली सिक्वेराकडे जाऊया .तिन या प्रकारच्या शस्त्रक्रियांवर बरेच संशोधन केले आहे." पण त्याचबरोबर स्त्री डॉक्टरकडे जायच म्हटल्यावर परत त्याचा धीर गळाला.पण आम्ही त्याची समजूत घालून कसेबसे घोड्यावर बसवले.

    डॉ.डॉलीने परशुरामची कहाणी ऐकून घेतली आणि यावर निश्चित आपण काहीतरी उपाय करू असा दिलासा त्याला देत ती आमच्याकडे वळून म्हणाली

 " You see Dr.Salunke and Prof.Govind, your  problem is very typical.लिंगबदलाच्या शस्त्रक्रिया आतापर्यंत अमेरिकेत झाल्या आहेत पण त्या बहुतांशी पुरुषाचे स्त्रीत रूपांतर करण्याच्या होत्या.स्त्रीचे पुरुषात रूपांतर करण्यात आले आहे परंतु स्त्रीच्या शरीरावर किंवा ज्या पुरुषाने इंद्रिय अपघातात गमावले अशा पुरुषावर  इंद्रियरोपण करणे अजूनपर्यंत तरी शक्य झाले नाही.सेप्टेम्बर २००६ मध्ये चीनमध्ये अशा प्रकारचा प्रयोग एका पुरुषावर त्याच्या व त्याच्या पत्नीच्या सम्मतीने करण्यात आला होता,आणि तो यशस्वीही झाला पण पंधरा दिवसातच दोघानाही अशा प्रकारचे इंद्रिय नकोसे वाटू लागले आणि त्यानी त्या डॉक्टरांना ते काढून टाकण्यास सांगितले.  ती शस्त्रक्रिया महागडी  पण आहे.शिवाय त्यासाठी कोणीतरी इंद्रियदाता लागतो  आणि अशा प्रकारचे इंद्रिय  यांचे शरीर स्वीकारेल याची पण खात्री देता येत नाही."

"मग यावर काही उपायच नाही का?" साळुंकेने विचारले.

" मी सुचवत असलेला उपाय आपल्याला योग्य वाटतो का पहा "डॉलीने उत्तर दिले आणि तिने सिलिकोन या द्रव्यापासून कृत्रिम इंद्रिय बनवता येईल आणि आवश्यक तेव्हा ते बसवून वापरता येईल ही माहिती दिली.

डॉ.डॉलीने जरी इतके समजावून सांगितले तरी मला त्याची खात्री वाटत नव्हती.हे साळुंकेच्या ध्यानात आले त्यामुळे तो माझ्याकडे वळून म्हणाला डॉक्टर सांगतात हे अगदी शंभर टक्के खरे आहे.अशा अनेक शस्रक्रिया त्यानी अगदी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत आणि सिलिकोनचे अवयव अगदी हुबेहूब खऱ्या अवयवासारखे असतात खात्रीच करून घ्यायची झाली तर हे पहा "असे म्हणून त्याने माझ्यासमोर आपल्या नाकाचा शेंडा ओढला आणि काय आश्चर्य सगळे नाकच त्याच्या हातात आले आणि त्याच्या चेहऱ्यावर दोन भोकेच काय ती दिसू लागली.थोडावेळ आम्हाला आचंबित करत पुन्हा आपले नाक पूर्वीच्या जागी बसवत तो म्हणाला."मध्यंतरी एका अपघातात मला माझे नाक गमवावे लागले पण डॉ.डॉली यानी माझी ती उणीव अशी भरून काढली.

मग मात्र आमची खात्री पटली. परशुराम तर ते पाहून अवाकच झाला.

" पण या इंद्रियास कसलीही संवेदना नसणार अर्थात केवळ तुमच्या मित्राच्या पत्नीस वैवाहिक सुख मिळावे हाच त्या कृत्रिम इंद्रियाचा उपयोग राहील.पहा विचार करून "डॉली पुढे म्हणाल्या.

परशुरामाला ही गोष्ट सांगितल्यावर काही वेळ विचार करून तो म्हणाला " माझ्या अस्तुरीसाठीच तर हे करायच आहे मला .त्यामुळे माझी या गोष्टीस मुळीच हरकत नाही."

  "त्याला बराच खर्च येत असेल " मी उगीचच शंका व्यक्त केली पण परशुरामानेच लगेच " त्याची नकोस काळजी करू यंदा उसाच पीक अगदी सोळा आणे आलय आणि भावही वाढवून दिलाय कारखान्यान " असे परस्परच मला उत्तर दिले.

     डॉ.डॉलीनेच या इंद्रियरोपणासाठी सिलिकोनचे इंद्रिय तयार करणाऱ्या फर्मशी संपर्क साधून आम्हाला पंधरा दिवसानंतरची तारीख दिली आणि सोळाव्या दिवशी परशुराम पुन्हा एकदा (बायकोच्या) कामापुरता पुरुष बनूनच गावाकडे गेला.थोड्याच दिवसांनी  तुकारामबुवांचा मला फोनही आला पोराचा संसार पुन्हा झकास चालू लागल्याचा.

  दसऱ्याला गावात मोठी जत्रा भरते,त्यावेळी देवीच्या दर्शनाला सगळ्या कुटुंबासच घेऊन आम्ही गावी गेलो. अर्थात त्यावेळी परसुरामकडे चक्कर मारणे हे ओघानेच अले.तुकारामबाबानी आनंदाने मला मिठीच मारली.

"गोविंदा, माझ्या पोराचा संसार पुन्हा मार्गी लावलास तू.नाहीतर अगदी जीवच द्यायला निघाला होता तो. दोघ आता एकदम मजेत हायेत."

   परशुरामाची गाठ पडाल्यावर सगळ्या गप्पा झाल्यावर निघता निघता माझ्या बायकोन धुरपाला चिमटा काढलाच,

"काय धुरपावैनी आता काही तक्रार नाहीना ?"

यावर परशुरामच म्हणाला "तिला काय विचारता ती अगदी खुषीत आहे पण वैनी गोविंदान मला मात्र तसच ठेवल उपाशी ते उपाशीच"

" लेका परशा --- " आणि माझ्या मनात विचार आला "आधी होता वाघ्या नंतर झाला पाग्या पण त्याचा येळकोट राहीना "

पण उघडपणे मी म्हणालो,

" लेका तुला डॉडॉलीने अगोदरच सांगितले होते तेव्हां मोठ्या तोंडान तूच काय म्हणाला होतास ? आणि बेट्या तू तुकारामाचा भक्त ना , मग तुकारामानीच काय सांगितलेय विसरलास का?" आणि तोंड वासून माझ्याकडे तो पाहू लागल्यावर माझे वाक्य पुरे केले

"कमोदिनी काय जाणे तो परिमळ भ्रमर सकल भोगीतसे "