पुरंदरावरचा थरारक अनुभव

परीक्षा संपून शाळेला सुट्ट्या लागल्या होत्या, म्हणून शाखेतील बालांची पुरंदरवर सहल नेण्याचे ठरविले. आम्ही पाच "शिक्षक" आणि १७ बाल, शनिवारी दुपारी सगळे निघालो.
सर्व जण अगदी उत्साहात होते. काही जणांची पहिलीच सहल. ओंकार चवथी मध्ये होता. वय बसत नव्हते तरी सहलीला यायाचं म्हणून रडून हट्ट करून आला होता. तो अतिशय खोडकर असल्यामुळे त्याची एक वेगळीच जबाबदारी होती. शेवटी,   त्याला आम्ही बरोबर घेतला.
ठरल्याप्रमाणे नारायणगावच्या मंदिरामध्ये मुक्काम करायचा होता. ठरल्याप्रमाणे सगळे कार्यक्रम मस्त मजेत पार पडले.
सकाळी जयंत शिक्षकांना काही काम असल्यामुळे परत जावे लागले.   आम्ही चार शिक्षक आणि १७ बालांनी  पुरंदरवर चढण्यास सुरुवात केली.
साधारण
2 तासात आम्ही वर पोचलो. सकाळचे १० वाजले होते, सूर्य त्याची शक्ती दाखवू
लागला होता. तिथे जरा पाणी प्यायलो. सर्व जण इकडे तिकडे विखरून किल्ला
बघत होते.
प्रशांत आणि रुपेश लगेचच पुढच्या तयारीला लागले. मी आणि भूषण बालांवर लक्ष ठेवून होतो.
तेवढ्यात ओंकार ओरडत आला, "भूषण शिक्षक, भूषण शिक्षक,.. "
"काय झालं? कशाला ओरडतोय? "..
"अहो तिकडे एक मुलगा दरीत पडला.. त्या कठड्यावरून.. "
"ओंकार, माझ्याशी असली चेष्टा केलीस तर बघच .. "
"अहो नाही शिक्षक, खरंच सांगतो; आईशप्पथ!! "..
मी ताबडतोब सगळ्यांना एकत्र केले.. आणि सर्व जण मोजले; सतरा आकडा आला आणि माझा जीव भांड्यात पडला..
"अहो शिक्षक, खरंच पडलाय कोणतरी, तुम्ही एकदा बघा तर.., "

तिकडे बसलेल्या दुसऱ्या एका ग्रुप मधली मुले माझ्याकडे निरखून बघत होती..  कदाचित 'मी आता कोणता निर्णय घेतोय'  ह्याची ते वाट बघत होते..
ओंकार जरी खट्याळ असला तरी मी त्याला चांगलाच ओळखून होतो, त्याचा तो रडकुंडीला आलेला चेहरा मी यापूर्वी कधीच पाहिलेला नव्हता..
"चल दाखव कुठे ते  ".. मी त्याला बोललो आणि भूषण ला बाकीच्यांवर लक्ष ठेवण्यास सांगितले.
"हे बघा शिक्षक, इथूनच पडला खाली. "
मी जरा नीट बघितलं, खाली कोणीच दिसत नव्हत, एक ५५-६० फूट खोल उभा कडा, आणि निवडुंगाच्या काटेरी वनस्पती, ह्याशिवाय काहीच दिसत नव्हत...
"ओंकार, तुला शेवटच सांगतोय,खरंच पाहिलास का? "
आता
मात्र ओंकार ची चांगलीच जिरली, तो रडायला लागला, "तुम्हाला नसेल विश्वास
ठेवायचा तर नका ठेवू ".. आणि तो तिथून रडत रडत निघून गेला.  
मलाच राहवेना, मी जरा अजून थोडं वाकून बघितलं, आणि बघतो तर काय,
खरंच एक २०-२१ वयाचा तरुण मुलगा खाली प्रचंड जखमी अवस्थेत बेशुद्ध पडला होता.. ती जागा अशी होती की तिथे जायलाच रस्ता नव्हता, दरीच होती ती..
मी
जास्ती विचार न करता जरा उजवीकडून खाली उतरू लागलो, भूषण नि प्रशांत ला
बोलावून घेतले असावे, कारण तो पण माझ्या मागून खाली उतरू लागला.
वाटेत
जाता जाता; छे, वाट कसली, दरीच ती, ती दरी उतरताना  "आपण नीट खाली उतरू
ना, आणि उतरलोच तर वरती येता येईल ना. " असल्या नसत्या शंका मनात येऊ
लागल्या. लोकांनी वेळोवेळी केलेले उपदेश आठवू लागले, जीवनातील जबाबदाऱ्या, कर्तव्ये  वगैरे आठवू लागली..
मनात असंख्य विचार चालू झाले....

काही क्षणानंतर आम्ही कसे बसे तिथे जाऊन पोचलो.
 तो जबरदस्त जखमी झाला होता, इतकं रक्त मी आतापर्यंत पाहिलं नव्हतं.   भूषण तर घाबरला, "चले, कटू इथून.. उगाच नसत्या भानगडी नकोत, त्याची हालत बघ कसली बेक्कार झालिये, चल निघू इथून"..
मी त्याच पाकीट बाहेर काढलं आणि त्याच नाव बघितलं.. 'अजय'
 त्याच्या चेहऱ्याकडे बघवत नव्हतं, संपूर्ण रक्तानं भरलेला होता, दातखिळी बसली होती, जीभ फिरली होती.. दात रक्तानं माखले होते, आणि तो एका विचित्र आवाजात घोरत पडला होता, त्याच्याकडे बघवत नव्हतं..

प्रत्येक
क्षणाला मी आवंढा गिळत होतो.. ह्याला इथून बाहेर कसा काढणार ह्याची चिंता
वाटू लागली.. त्याच शरीर चांगलं धष्टपुष्ट होतं, जीम करून कमावलेलं वाटत होत ,   ७५-८० किलो तर सहज असेल.
प्रशांत ला हाका मारायला सुरुवात झाली, त्यानं पाण्याची बाटली खाली फेकली, मी अजय  ला  थोडं पाणी पाजायचा  प्रयत्न केला, त्याच्या शरीरानं तो धुडकावून लावला. तेवढ्यात प्रशांत वरून बोलला..
"अजून ३ जण खाली येत आहेत रे, येतीलच बघ ५ मिनटात "..
आता इथे ६ जण कुठे थांबणार ह्याची एक वेगळीच चिंता सुरू झाली.. मी वेळ ना घालवता त्याचा मोबाईल काढला, आणि नंबर डायल केला.
"हॅलो कोण बोलतंय? "
"अरे अजय आहेस कुठे? आम्ही इथे किती वेळ वाट बघतोय, कुठे आहेस? "..  तिकडून रीप्लाय आला.  
"अरे अजय इथे दरीत पडलाय.. तू कोण बोलतोय? त्याचा मित्र का? "..
हे
ऐकल्यावर कठड्यावरून ४ डोकी खाली वाकू लागली.. त्यांची चांगलीच जिरली,
थोड्या वेळा पूर्वी जो ग्रुप माझ्याकडे बघत होता, ते अजय चे मित्र होते.
त्यांच्यातील कोणालाच खाली यायची हिम्मत होत नवती.. एक जण कसाबसा खाली पोचला..
गडावरील
एका दुकानाचा मालक, २ मिलिटरी चे अधिकारी, मी आणि भूषण, आणि अजय चा
मित्र असे  सगळे जण तिथे कसेबसे उभे होतो. ह्याला वर न्यायच कस हा विचार
करत असतानाच कोणालातरी घोंगडी ची युक्ती सुचली, वरून खाली एक
मोठी घोंगडी टाकली आणि अजय ला त्यात ठेवला.. प्रत्येकाचा जेमतेम एक पाय
कसा बसा ठेवता येईल, अशी ती जागा होती.. घोंगडिचे एक टोक प्रत्येकानी
धरले;   ओरडत, हाकत त्याला आम्ही वरती चढविला.

 त्याला खालि ठेवतो
ना ठेवतो तोच समोरून एक टंम टंम रिक्षा आली, त्याच्या मित्रांनी
प्रसंगावधान राखून हे एक चांगले काम केले... त्याला तसाच रिक्षात ठेवला,
त्याचे मित्र पण बसले, आणि त्याला ते सासवड ला घेऊन गेले...
हे सगळा व्हायला साधारण २०-२५ मिनिटे गेली असतील, प्रत्येक क्षण खूप मोठा वाटत होता...
एवढ्या वेळेत बालांना रुपेश दुसरीकडे घेऊन गेला होता. ते सगळे किल्ला बघण्यात रमले होते... माझ्या आणि भूषण च्या डोक्यातून हा विषय जाईना..
शेवटी आम्ही पण किल्ला फिरायला निघून गेलो..
दुसऱ्या दिवशी अजय च्या बाबांचा फोन आला,
अजय ला संह्याद्री मध्ये ठेवला होता, तो कोमात गेला होता.
आज, २० एप्रिल ला ह्या घटनेला २ वर्ष पूर्ण होतील,..
अजय मात्र अजून कोमातच आहे..