साधारणतः १९९० पूर्वी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये तीन प्रकार दिसत असत.
चांगला मुलगा, मनाने चांगला पण अभ्यासाकडे दुर्लक्ष असलेला मुलगा आणि वाया गेलेला मुलगा.
चांगला मुलगा तेल लावून, चप्प भांग पाडून आणि पावडर लावून सायकलवर वेळेवर तासाला येत असे. वर्गात प्रश्न विचारत असे. कँटिनमध्ये बसून 'कटिंग' चहा मारता मारता मुलींना न्याहाळणे हे या मुलाला पाप वाटत असे. महाविद्यालयातून परतताना मुलींकडे अजिबात न बघता अभ्यास करण्यासाठी घरी परत येत असे. महाविद्यालयातून परतण्याची आणखी कारणे म्हणजे काकांच्या दुकानात बसायला जाणे किंवा संध्याकाळी शाखेवर जाणे. 'भ' पासून सुरु होणाऱ्या तर लांबच, पण 'च्यायला' ही शिवी मनातही न आणणारा हा मुलगा.
दुसऱ्या प्रकारातला मुलगा म्हणजे शिकण्याची गरज पटलेला पण विडी-काडीच्या नादी लागून अभ्यासातून लक्ष उडालेला. तशातच कुणीतरी त्याच्या ह्रदयावर डल्ला मारलेला. आठवड्यातून एकदा तरी छपरी मित्रांना म्हणणारा- "लै बिल झालं. एक दिवस हिला मी पटवणारच". अधून मधून तासांना बसणारा आणि परीक्षा जवळ आल्यावर 'पोर्शन काय आहे?', ही चौकशी करणारा. एखादा सज्जन मित्र मधूनच त्याला म्हणायचा- "जरा अभ्यासात लक्ष दे. काकूंना चांगले दिवस दाखवावेसे वाटत नाहीत का तुला?" त्रिकोणी काळा गॉगल काढून हा उत्तर द्यायचा- "यार, आमचं हे असंच चालायचं. तू कर अभ्यास, जा पुढे...आपली 'लेव्हल' वेगळी आहे".
वाया गेलेल्या मुलाची काही ठरावीकच लक्षणे असत. अभ्यासातून पूर्ण लक्ष उडालेला. वेळी अवेळी घरी येणारा. तोंडात तंबाखू. रस्त्यातून सायकल किंवा कुणाची तरी 'जावा' मोटरसायकल निरूद्देश फिरवत असलेला. चोरून 'ब्लू फिल्म' बघणे, रस्त्यावरच्या मारामारीत सामील होणे हे याचे ठरेलेले कार्यक्रम. कुणी काही समजवायला गेलं तर - "मला शिकवू नका. बघेन माझं मी".
या तीनही मुलांचे आर्थिक आणि सामाजिक स्तर वेगळे होते आणि म्हणूनच की काय, ही तीनही मुलं वेगवेगळी कळत.
नव्वद सालानंतर जागतिकीकरण झालं. तंत्रज्ञानाचा वापर सर्व समाज करु लागल्यामुळे तंत्रज्ञानाच्या पातळीवर सर्व समाज एकच झाला. वातावरणात मोकळेपणा आणि समानता भासू लागली. चांगला आणि मधला प्रकार एका मर्यादेपर्यंत एकत्र झाला. हा एकत्र झालेला गट म्हणजे साधारण मधला गट.
या प्रकारात हुषार मुलगाही एखाद्या विषयात अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले असतील तर म्हणतो- शीट, या विषयाने माझी चांगली ---. अपेक्षेपेक्षा जास्त गुण मिळविल्यावर रस्त्यात बाईक थांबवून 'क्रेझी क्रेझी' म्हणत चेकाळतो. एखाद्या मोनिकाकडे अभ्यासाला जाण्याआधी तिला विचारतो-'घरी बिअर आहे का?' अभ्यासाची सुरवात 'नॉन-व्हेज' विनोदाने करतो. पूर्वी एखाद्याकडेच टीव्ही असायचा. आता सगळ्यांना 'इंटरनेट' उपलब्ध आहे. सगळ्यांना 'ब्लू टूथ' वापरता येतो. बहुतेकांना गर्लफ्रेंड हवी आहे. सगळेच 'डूड' आणि 'हंक'.
संपूर्ण निर्व्यसनी, भरपूर अभ्यास करणारा, भारत देशासाठी गुणात्मक काम करण्याची महत्वाकांक्षा ठेवणारा आणि पालकांनी पाहून दिलेल्या मुलीशीच लग्न करणारा प्रकारही अस्तित्वात आहे. हा मुलगाही तंत्रज्ञान वापरतो पण त्याचा वापर न्याय्य् पध्दतीने करतो. 'राजकारणात शिरून एकदा बदलवून टाकायला पाहिजे सगळं' असा प्रामाणिक विचार दर सहा महिन्यांनी करतो. एखाद्या चर्चासत्रालाही उपस्थित राहतो. एकंदर विचार स्वच्छ आणि उजळ. हा साधारण पहिला गट. या प्रकारात 'जिनिअसच' उरले आहेत की काय, अशी शंका यायला वाव आहे.
वाया गेलेल्या मुलाचा शेवटचा प्रकारही अजून आहेच. किरकोळ फरक वगळता प्रकार तसाच आहे. 'जावा' च्या जागी 'एस्टीम' आली. भेट देण्याच्या 'ठिकाणां' मध्ये बदल झाला. मराठी शिव्यांऐवजी इंग्लिश शिवी आली.
पूर्वी चांगली मुलं साठ टक्के असायची. मधली मुलं पस्तीस टक्के आणि वाया गेलेली पाच टक्के.
आता कदाचित् असं असावं- संपूर्ण स्वच्छ गट वीस टक्के, डूड हंक गट पंचाहत्तर टक्के आणि पाच टक्के पूर्ण वाया गेलेला गट.
अर्थात, टक्केवारी अंदाजपंचेच !
समाजाची वीण बदललेली आहे.