माझ्या नवऱ्याची बायकांच्या कवितेवरची कविता/ विडंबन

बायको जेंव्हा बोलत असते ( <strong>ही मुळ कविता)

बायको जेंव्हा बोलत असते तेंव्हा ऐकून घ्यायचं असतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!

भडका असतो उडालेला अनावर असतो रोष
वाभाडे काढत आपले ती सांगत असते दोष
आपले दोष, आपल्या चुका सारं सारं...स्वीकारायचं असतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!

शब्दानं शब्द वाढत जातो भडकत जातो तंटा
म्हणून वेळीच ओळखायची असते आपण धोक्याची घंटा
समोरची तोफ बरसली तरी
आपण...
तोंड उघडायचं नसतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!

गरजून बरसून झाल्यानंतर थकून जाते बायको
आग पाखडून झाल्यानंतर शांतही होते बायको
अशाच वेळी विसरून सारं
तिला...
जवळ घ्यायचं असतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!

तिची चिडचिड, तिचा संताप प्रेमच असतं हेही
तिची बडबड, तिची कडकड प्रेमच असतं तेही
तिचं प्रेम तिनं करावं
आपलं....
आपण करायचं असतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!
______________________________________

<strong>माझ्या नवर्‍याची वरील कवितेवरची कविता / विडंबन
बायको जेंव्हा बोलतच बसते
        बायको जेंव्हा बोलतच बसते, तेव्हां नाटक करायचं असतं
        साधं उठुन गेलं तर, पेटतेच ती, तेही ’तिला’ चालत नसतं!

        भडका असतो उडालेला अन अनावर असतो झालेला रोष
        भूत काळातले कट-पेस्ट करत, आपले ती काढत असते दोष
        नसलेले दोष, बेहयात चुका, सारं सारं खोटं ....ऐकून सोडायचं असतं
        ऑफिसच्या बोअरिंग मिटींगमधे वेळ काढायचं, ’हे’ प्रशिक्षणच असतं
        शब्दानं शब्द वाढत जातो भडकत जातात तंटे
        खरय! फुकट वेळ वाया जातो, वाया जातात घंटे,
        समोरची तोफ बरसली तरी, आपण.. तोंड उघडायचं नसतं,
        'वायच! जरा गप र्‍हाशीत' छापील, टीशर्ट घालायचं असतं.

        गरजून बरसून झाल्यानंतर थकून जाते बायको
        गत काळी, चोप खाऊन शांतही व्हायची बायको,
        कोर्टाला अमान्य असे पुरावा, रक्तबंबाळ मनाचा, होरपळला तो माणूस,
        ’फिजीकल एब्यूस’निर्विवाद शिक्कामोर्तब होता, स्मार्टही झाला माणूस,
        खरंय पण! अशाच वेळी विसरून सारं, तिला, जवळ घ्यायचं असतं,
        बापू! मिळाली तर आजच संधी, फुकट जास्तं विचार करायचं नसतं

        तिची चिडचिड, तिचा संताप प्रेमच असतं हेही
        त्याची शांतता, नि:शब्दता, प्रेमच असतं तेही
        तिच्या प्रेम ज्वाला तिनं दाखवाव्या, आपलं प्रेम सदैव झळकतच असतं
        नाहीतरी टायगर वुड्सच्या जगात.... दुसरं आपल्या हातात काय असतं!