तूं परत येणारंयस्

मी दिसताक्षणी
फणकारत निघून गेलास्
तेव्हापासून
कोळपलेले माझे शब्द-
मूक झालेत्
कंठात त्यांनी कोंडून घेतलंय्
खूप समजावलं, पण
त्यांची मुस्कटदाबी
ते नाही विसरू शकत!

माझे दुखावलेले अश्रू-
त्यांचा नेत्रत्याग पाहून
डोळे हळहळताहेत्
खूप समजावलं, पण
त्यांची हेटाळणी
ते नाही विसरू शकत!

माझं हळवं मन-
त्याच्या फुरंगटून बसण्यानं
जीव बेचैनंय्
खूप समजावलं, पण
झालेली त्याची बेदखली
ते नाही विसरू शकत!

माझी मायाळू उमेद
ती मात्र नाही कोमेजलेली
अजून तरी
तिला आहे भरवसा
परत येणारंयस् तूं
परत येणारंयस् तूं
तिला वारसा आहे
सनातन वात्सल्याचा!!