श्री. लकी नशीबे

     श्री. लकी नशीबे आज अचानक झोपेतून जागे झाले... कोणतेही स्वप्न अर्धवट न राहता! त्यांनी डोळे किलकिले करून घड्याळात पाहिले. घड्याळाचा कर्णपडदेफाडी ध्वन्योद्रेक व्हायचा होता अजून.. चक्क! त्यांनी हळूच आपल्या सौ कडे पहिले. तीही जिभेवर साखर घोळवल्याच्या आनंदात झोपली होती!  एकूणच आपण लवकर उठण्याचे महापाप केल्याचे त्यांच्या लक्षात आले!  त्यांनी पुन्हा अंथरुणात घुसण्याचा प्रयत्न केला... पण अंथरुणाने जणू काही विजेचा झटका देऊन त्यांना बाहेर ढकलून दिले!  संडासमार्ग जवळ करण्याशिवाय आता त्यांना पर्याय नव्हता! त्यांनी संडासात पाउल टाकले तर चक्क आज तिथून अत्तराचा सुवास दरवळत होता... आपल्या दक्षिण भागावर चिमटा काढून त्यांनी आपण झोपेत नसल्याची खात्री केली.. आणि कमोड के एक मोड पार दक्षिण भागास ठेवून शांतपणे विचार मग्न झाले!  आश्चर्य ते काय... रोज च्या सारखे त्यांना कुंथावे लागले नाही! ५ मिनिटातच हा कार्यक्रम आटोपल्याचे समाधान चेहऱ्यावर घेऊन ते बाहेर पडतात तो काय... सौ बाथरूमच्या दारात टॉवेल आणि कपडे घेऊन उभी!  त्याच हसऱ्या चेहऱ्याने ते टॉवेल घेऊन आत गेले तर कढत पाणी तयार! आज झालेय तरी काय?.... सूर्य नक्की कुठून उगवला हे पहायचा त्यांनी प्रयत्न केला पण बाथरूमच्या त्या तिरकस रचनेच्या काचांमधून त्यांना दिशेचे पटकन ज्ञान झाले नाही. अज्ञानात सुख मानून घेण्याचे ठरवून त्यांनी पहिला तांब्या अंगावर रिकामा केला!

             अंघोळ, देवाचे उरकून बाहेर येतात तो काय सौ हातात गरमागरम कांदेपोहे घेऊन उभी! टेबलावर जेवणाचा डबा आणि 'पेरूचा पापा' सारे काही व्यवस्थित ठेवलेले!  पोह्याचा पहिला घास तोंडात घ्यावा तर जणू काही संजीव कपूरच आपल्या घरचा खानसामा असावा असा भास!   आता मात्र हद्द झाली! बाहेर जाऊन सूर्याचे तोंड नक्की कुठून बाहेर आलेय हे पाहावेच असा त्यांनी निश्चय केला! मात्र गेटबाहेर त्यांना ती संधी मिळाली नाही कारण रिक्षावाला दारातच उभा!  त्यानेही जणू काही 'लंकेला घेऊन जा' असे म्हटलेत तरी चालेल अशा अविर्भावात मीटर फिरवले! आपण त्याला कुठे जायचे हे सांगितले कि नाही या विचारात असताना त्याने स्टेशन गाठलेले होते!  पैसे दिल्यावर 'सुट्टे द्या ना साहेब' असे तारस्वरातले गाणे त्याने गायले नाही!  श्री. नशीबे बुचकळ्यात पडले! त्याने लहानगा मन्या करायचा तसा टाटा ही केला! ८:१७ ची 'छत्रपती शिवाजी टर्मिनस' महाराजांची कृष्णा घोडी जशी त्यांच्यासाठी थांबायची तशी थांबून जणू काही नशिब्यांची वाट पाहत होती! नशीबे आले तोच त्यांना ट्रेन एकदम रिकामी दिसली! त्यांनी आत शिरून नुसता खिडकी कडे कटाक्ष टाकला तर तेथील  सुवासिक भैय्याने त्यांना आपली खिडकीची जागा देऊ केली! आता मात्र हद्दीचीही हद्द झाली! दादर कधी आले कळलेच नाही! दादरलाही गर्दी नाही! पुन्हा स्टेशनच्या दारात आधीच्या रिक्षावाल्याचा जुळा भाऊ असावा असा एक दुसरा रिक्षावाला उभा होता! त्यानेही आधीच्याच रिक्षावाल्यासारखे त्यांना ऑफिसच्या दारापर्यंत सोडले... रिक्षा जिने चढू शकत नाही म्हणून.. नाहीतर त्याने ती तिथपर्यंतही नेली असती इतक्या प्रेमाने त्याने त्यांना आणून सोडले!  दारात साहेब हारतुरे घेऊन उभे होते! त्यांनी ही अतिशय प्रेमाने विचारपूस केली. सगळे सहकारीही तितक्याच प्रेमाने बोलत होते! दिवसभर फारसे काम नव्हते. संध्याकाळी लवकर निघायचा विचार नुसता मेंदूत येताच कानाशी फोन खणाणला! ''नशीबे! तुम्ही आज लवकर घरी गेलात तरी चालेल हं! '' नशीबे खुर्चीतून पडायचे बाकी होते!

              संध्याकाळसाठी ठरवलेला सिनेमा, जेवण आणि मग भेळ हा प्लान ही विनासायास आणि विनाअडथळा पार पडला! नशीबे आज भलतेच खुश होते! देवाने जणू काही आजचा दिवस त्यांच्यासाठी खास तयार केला होता! रात्रीच्या सुग्रास जेवणानंतर सौ ने चक्क तेलाने त्यांचे पाय दाबून दिले!   हळूहळू त्यांना झोप लागली.... पण झोपेत त्यांना प्रचंड अस्वस्थ वाटू लागले असे वाटले कोणीतरी आपला गळा दाबतंय आणि म्हणताय 'मेल्या, मजा मारायची स्वप्न पाहतोस?... उठ पहिला उठ! ' आणि ते धाडकन जागे झाले! पाहतात तो काय... सौ त्यांना गदागदा हलवून उठवत होती आणि म्हणत होती... "काय मेली ती झोप तरी तुमची... घड्याळांचा बिचाऱ्यांचा कोकलून कोकलून जीव गेला... पण या कुंभकर्णाला जाग येईल तर शप्पथ! मुंबईत राहतो आपण याचा तरी भान ठेवा.... गाव नाही हे तुमचं! नाईलाजाने उठून नशीबे चुपचाप संडासाकडे वळले!

काय हो... मुंबईकर असाल... तर कधी येईल आपल्या नशिबात असा दिवस? आणि मुंबईकर नसाल तर सांगा ना हो प्लीज! कधी येईल आमच्या नशिबात असा दिवस? आम्हाला मुंबईची शांघाई नाही झाली तरी चालेल पण या घाईतून शांतता कधी मिळते असं झालंय!  आहे का तुमच्याकडे काही उपाय? प्लीज सांगा असेल तर.......................