काईटस् ची हाईट...

जाहिरातबाजीचा 'कडक मांजा' लावून रोशन फँमिलीने पतंग उडवलाय खरा पण तो
अपेक्षित उंची गाठू शकला नाहीये.
कालच 'काईटस्' हा चित्रपट 'फ्रेँड'सोबत
पाहिला.(ती/तो कोण? हा प्रश्न तूर्त बाजूला ठेऊ!). तर हा पिक्चर
'फ्रेँड'लाबरोबर घेऊनच पहावा असा सल्ला (मित्रत्वाच्या नात्याने) देत आहे.
कारण यात सरळ सरळ अनैतिकतेचा पुरस्कार केलेला असल्याने हा चित्रपट
जोडीदारासोबत पहाल तर पस्तावाल!
खोटं नाटं लग्न केलेला 'ह्रतिक' जेव्हा
डान्स क्लासमध्ये 'कंगना'ला भेटतो, तेव्हा प्रथम तुज पाहता वगैरे होते.
वास्तविक त्याची (खोटी) प्रथमा(बायको) 'बार्बरा' असते.(ही मेक्सिकन
अभिनेत्री 'दिसलीय' छान तशी 'बोलली' मात्र नाही!) खरी द्वितिया म्हणजे
कंगना अतिश्रीमंत असल्याने ह्रतिक तिच्यावर पाघळतो. तिच्याशी लगट वाढवतो.
त्याच दरम्यान बार्बरा कंगनाच्या भावाला पटवते तेही त्याच्या
श्रीमंतीमुळेच. त्यांच्या साखरपुड्यामध्ये ह्रतिक व बार्बराची नजरानजर
होते. पहिली पत्नी खोटी असली म्हणून काय झालं शेवटी ती बायकोच नाही का? मग
पुन्हा त्यांच्यात प्रेमाचा पाझर फुटू लागतो. याचा सुगावा खऱ्‍या नवरदेवाला
लागल्यावाचून राहील काय? त्याला संशय येण्याइतपत हे प्रेमी जीव
प्रीतसागरात यथेच्छ डुंबून घेतात. (ते पोस्टर वरूनही लक्षात घेता येईल!)
आपले बिंग फुटले म्हटल्यावर त्यांना पळून जाण्याशिवाय पर्याय उरत नाही.
दोघे परागंदा होतात. त्यांच्या शोधार्थ भावी नवरा बाहेर पडतो. ही सगळी
पळापळ आणि धावाधावी म्हणजे आसमानात काटाकाटी खेळणारे पतंग(म्हणजेच काईटस्.)
काईटस्
म्हणावा तितका वाईट नसला तरी त्याची हाईट मात्र इंग्रजी व स्पँनिश
संवादांमुळे बहुतेक ठिकाणी खुरटलीय. मेक्सिकन बार्बराचे टाईट आउट फिटस् (व
दृश्येही) काहीजणांना टाईट करून सोडणारे आहेत हे नक्की. काईटस् ला फाईट
द्यायला दुसरा कुठला वजनदार पिक्चर आला नसल्याने माईट बी तो सुपरहिट होऊ
शकतो. अमेरिकेतील लव्हेबल लोकेशन साईटस् पहायच्या असतील किँवा ह्रतिकचा
व्हाईटवॉश देणारा नृत्याभिनय (नृत्य+अभिनय दोन्हीही अत्युत्तम!) अनुभवायचा
असेल तर जरूर काईटस् पहावा. अन्यथा दोन चार मित्रांना जमवून पतंगांच्या
फाईटस् खेळणे केव्हाही फायदेशीर ठरेल!
जाता जाता एकच सल्ला- काईटस्
पाहून कुणीही आपल्या नाईटस् बरबाद करून घेऊ नयेत!