व्हीसीआर च्या गोष्टी

     'व्हीसीआर' वर चित्रपट बघणे हा जेव्हा भन्नाट अनुभव होता, तेव्हाच्या या आठवणगोष्टी.

     'व्हीसीआर' वर मी बघितलेला पहिला चित्रपट म्हणजे 'लावारिस'. अगदी लहानपणी पाहिलेल्या त्या चित्रपटातील एकच दृष्य लक्षात राहिलं - अमजदखान भाषण करत असतो आणि समोरून पांढरा कोट घालून अमिताभ येतो. काही दिवसांनी 'दीवार' पाहिला. निळ्या डगल्यातली अमिताभची गोडाऊनमधली मारामारी लक्षात राहिली. कॅसेटवरही अमिताभचा आवाज भरदार वाटला होता. थिएटरवर किती दमदार वाटत असेल, हे मोठं झाल्यावर कळालं. हे दोन्ही चित्रपट मला माझ्या पाळणाघराच्या मावशींनी दाखवले होते. या मावशी चित्रपटाच्या षौकीन जरुर होत्या, पण स्वार्थी नव्हत्या. स्वतःच्या मुलांसह त्या पाळणाघरातल्या मुलांनाही चित्रपट दाखवायच्या. तेव्हा त्या व्हिडिओवाल्याने दर प्रेक्षकामागे दोन रुपये घेतले होते. 
     आमच्या चाळीत कुणी 'व्हीसीआर' घेतला तर लगेच त्याचा 'व्हीसीआर' बघायला लगेच सगळे धावायचे. पाहायचा, त्याला हात लावायचा, त्या काकांचा वशिला लावून एखादी कॅसेट आत टाकून पाहायची, काका नवी कॅसेट केव्हा आणणार आहेत याची माहिती काढायची....व्हीसीआर सुरु केल्यावर ते मिनिटांचे आकडे पाहायला तर मौजच असे. 
    माझ्या वर्गातल्या एका मुलाला तर 'व्हीसीआरचं' फार वेड. नुसता तो शब्द कानावर पडला तरी तो उडायला लागायचा. त्याच्या वडिलांनी तो दहावीत गेल्यावर त्याला सांगितलं की, तू मला दहावीत ऐंशी टक्क्याच्या वर गुण मिळवून दाखव. मी त्याच दिवशी तुला 'व्हीसीआर' घेऊन देईन. हे ऐकल्यावर तो 'शांत' झाला. दुसऱ्या एका मुलाने हट्ट करून आठवीतच वडिलांना व्हीसीआर घ्यायला लावला. मग, त्याचं त्याच्या आईकडे वशिला लावून सतत सिनेमे पाहणं सुरु झालं. एक दिवस त्याचं भांडं फुटलं तेव्हा वडिलांनी त्याला बदड बदड बदडला. आमच्या घराजवळ एक व्हिडिओ पार्लर होतं. बस त्याच पार्लरसमोरून यायची. शाळेतून येताना कोणता चित्रपट पार्लरला लागलाय, हे खिडकीतून रोज पाहण्यात फार मजा यायची. या पार्लरवाल्या लोकांना कलाकारांची नावं अजिबात माहीत नसायची. काय वाटेल ते लिहून टाकायचे. एक दिवस 'सत्येन कप्पू' ऐवजी 'सत्यम कपूर' असं लिहिलेलं होतं. !
    त्यावेळी कॅसेट खराब लागली की, परत देऊन नवी आणायची हा एक 'ट्रेंड' होता. वर्गातला एक मुलगा वाह्यात होता. तो कॅसेट घरी आणायचा, अधून मधून चित्रपट पाहात फॉरवर्ड करत चित्रपट संपवून टाकायचा.  कॅसेट बाहेर काढायचा, मागून उघडायचा. मागची बारीक बटन्स दाबली की, पट्टी उघडायची. फीत दिसू लागायची. हा 'हिरो' बोटाने ती चुरगळायचा. दुकानात जाऊन सांगायचा की कॅसेट खराब आहे. दुसरी मागून आणायचा. त्याच पैशांत दोन चित्रपट !
    आम्हाला जेव्हा कळलं की आमच्या मामानं काहीतरी घेतलंय...तेव्हा जाऊन पाहिलं तर 'व्हीसीपी' होता, 'व्हीसीआर' नाही. त्यावेळी जो तो 'व्हीसीआर' 'व्हीसीआर' च म्हणत होता. प्रत्येकाला समजवावं लागलं की तो 'व्हिडिओ कॅसेट प्लेअर' आहे, 'व्हिडिओ कॅसेट रेकॉर्डर' नाही. व्हीसीपीवर चित्रपट फक्त पाहता येतो, काहीही रेकॉर्ड करता येत नाही.  
    घरी व्हीसीआर आणून तीन चित्रपट पाहणे, हा तेव्हाच्या मध्यमवर्गाचा आवडता कार्यक्रम! शाळेच्या सुट्ट्यांमधला हा तुफान लोकप्रिय कार्यक्रम. आते-मामे भावंड एकत्र आलेली असली तर कुठला चित्रपट आणायचा यावरुन कडाकडा भांडणं व्हायची. तेव्हाच्या गणेशोत्सवात तर मनोरंजनाचा हाच हुकुमी एक्का असायचा. कॅसेटची निवड करायला जायचं म्हणजे पर्वणीच वाटायची. कॅसेटवालं दुकान म्हणजे अलिबाबाची गुहा, काय घ्यावं आणि काय नाही. दुकानात पाय ठेवायचा अवकाश... 
   "ए गोविंदा नको, त्यापेक्षा संजय दत्त बरा". 
   "एखादी आर्ट फिल्मच घेऊ...."  
   "हा बघितलास का, तुफान हाणामारी आहे."
   "हा बघ, यात 'मस्त शॉट' आहेत." 

   लोकांनी चित्रपट थिएटरला जाऊन पाहावा, यासाठी नि्र्माते गाणी कापून कॅसेट काढायचे. 'ऐलान-ए-जंग' चित्रपटात धर्मेंद्रने ब्रेक डान्स केला आहे, अशी बातमी होती आणि कॅसेटमध्ये तो डान्स पध्दतशीर कापला होता. 
   'व्हीसीआर' युगात कॅसेटचं भाडं तीन रुपयांपासून पंधरा रुपयांपर्यंत गेलं. हल्ली क्रिकेट सामना सुरु असताना प्रत्येक षटकामागे जाहिरात दाखवली जाते. तेव्हा टीव्हीचा अर्धा पडदा भरेल इतक्या जाहिराती कॅसेटमध्ये असायच्या. चित्रपटात कुणीतरी एका बाजूने महालात एंट्री केली की, दुसऱ्या बाजूने मिकी माऊस यायचा...'समुद्र व्हिडिओ' नावाच्या कंपनीचं बोधचिन्ह म्हणजे एक लाट होती. 
   'फक्त प्रौढांसाठी' या शब्दांची जागा फक्त वृत्तपत्रातल्या जाहिरातीत असायची. त्या चित्रपटाची कॅसेट आली की, प्रौढ- काही अनुभवी तरुण- काही होतकरू तरूण... सगळे दूरचित्रवाणी संचासमोर बसायचे.   
   आता यू ट्यूब, सीडीज, मोबाईल, भरपूर वाहिन्या...एकापेक्षा एक गोष्टी आल्या आहेत. चित्रपट पाहणं सोपं, स्वस्त झालं आहे. मनोरंजनाची किंमत कमी झाली आहे. पण तेव्हाच्या दुनियेत 'व्हीसीआर' हाच एकमेव पर्याय होता. नेहमीच्या दूरचित्रवाणीपेक्षा वेगळा. अधिक काही दाखविणारा.