बाबो

भाषाः आग्री / मराठी

नेहमीच मी करायचो गरबर(गडबड)
लानपनापासून मना रास (खुप)चरफ़र

मी छान गोर गानी बोलायचो
अन, छान सुंदर चितरं बी कारायचो

घाटी कवा सोकली, अन
पेनसल कवा टाकली कललच नाय

बापासला माझ्या वंगाल खपायचा नाय
कारन त्यो लय शिस्तीचा हाय

माझी मस्ती, माझा इपरितपना
निखली भाईगिरीच आवरू लागली मना

बाबा कईच बोतला नाय
कं बोलंल?
आपल्या पोराचा हात धरायची त्याच्यात आता हिम्मत नाय

आरं बाबा,
लानपनी माजी मसती तुला आवरायची
तवा मी शाना व्हतो
शालेनच्या माझ्या दंग्याची चर्चा
समद्या गावभर रंगायची

नशिबात लिवल्यालच व्हनार
असं म्हंताना तुझ्या हातानशा माझा सुटलेला बोट
 तु का न्हाई धरला रं बाबा
बाबो, बाबो ओरडताना सुकला रं माझा ओठ

बोट सुटला अन अंतर वाढतच गेला
तुटलेली नाळ येते का रे जोडता
म्हाईत व्हता ना रे तुला समदा
मंग ही तुझ्या माझ्यात दरी का?
बघ माझा आवाज दरीत घुमला
जरा कान दे रे बाबा
माझा टाहो ऐकायला येईल तुला

मी तुला रास दुख दिला
जवानीने माझा झाकला रे डोला
डोल्याआर वासनेचा भरका ऊरालेला
आन त्यात ती दहावी , बारावी
डोल्याचा कॅमेरा झालेला
समद्या बायकांचा सदानकदा
एक्स रे कारलेला
नापास न्हांई व्हनार त मंग कं?

नापास म्हंजे मुर्ख
आयुष्याती माती
दुनिया खुन्यालाबी सुधरायची संधी देती
बाबा
ह्या डोल्यावरली झापरं तात्पुरती व्हती
कवा ना कवा नजर साफ व्हनारच व्हती
बाबा तु का थांबला नाही ?
आरं ह्या तुझ्या सोन्याला चंदेरी रुपेरी
पालवी फुटनार व्हती

मना रास वाटतो तुझी सेवा करावी
तु मारलेली हाक ऐकावी
पन तुला बी दुसऱ्यांनी पलवला
ना ' ब ' ना बाबो भेटला मला

माझ्या ईच्छेला आता बेड्या पडल्या
ठेचा लागून साऱ्या अंगल्या होल्या अंधल्या
दुर्दैवाच्या पट्ट्या डोल्यावर बंधल्या
गाव सारा मज्जा पाहतो,
पन माझ्या कालजांन एकच आवाज घुमतो

बाबो ! बाबो ! बाबो !