भोवरा.....भाग १

आयुष्य फार विचित्र घटनांनी भरलेलं असतं हे मानसी आजवर फक्त ऐकून होती. अश्याकाही प्रसंगाला कधी आपल्यालादेखिल तोंड द्याव लागेल हा विचारसुद्धा तिच्या मनात कधी आला नाही.

खुप साध-सरळ, आखिव आयुष्य जगत होती मानसी. छोटस पंचकोनी कुटुंब... नवरा, सासू-सासरे आणि एक गोड छोकरा; ह्यांच करण्यात तिचा दिवस भुरकन उडून जायचा आणि हो जोडीला ऑफिस होतच. सकाळी घरच आटपून मानसी ऑफिसला पोहोचली की मात्र एका वेगळ्याच दुनियेत हरवून जायची. मग ते ८-९ तास फ्क्त तिचे स्वतःचे असायचे. खुप आनंदी अन सुखी होती आपल्या छोट्याश्या दुनियेत. पण लवकरच तिच्या ह्या विश्वात एक मोठी उलथा-पालथ होणार होती.

मनाच्या तळाशी अगदी खोलवर गाडून ठेवलेला ज्वालामुखी लवकरच उसळणार होता. आजचा दिवस मानसीसाठी वेगळा ठरणार होता. रोजच्याप्रमाणे मानसी ऑफिसला पोहोचली. आज ती एकटीच असल्याने खुप काम होतं, कामाच्या गडबडीत जेवणाची वेळ कधी झाली हे तिच्या लक्षातदेखिल आलं नाही. मैत्रिणी बोलवायला आल्या तशी ती अनिछछेनेच उठली. रोजच्या शिरस्त्याप्रमाणे डबा खाऊन ती मैत्रिणींबरोबर ऑफिसच्या पार्किंग एरियामध्ये फेरया मारत होती आणि अचानक मानसीचं लक्ष समोरून येणारया ग्रुपकडे गेलं... एका क्षणासाठी सगळं जग आपल्याभोवती फिरतय असं तिला वाटून गेलं.

तोच चेहेरा.... हो.... तोच चेहेरा... जो १० वर्षांपूर्वी तिला सोडून निघून गेला होता.... तिची काहिच चुक नसताना, तिला आयुष्यभराचा सलं देऊन गेलेला.... आज असा अचानक समोर आला होता. काय करू आणि काय नको, मानसीला काहिच सुचत नव्हतं. ती धावतचं तिच्याजागेवर येऊन बसली. नंतर मात्र कामातून तिचं सारं लक्षच उडालं. मनात विचारांचं मोहोळ उठायला लागलं... त्यानेपण मला पाहिलं असेल का?... मला ओळखलं असेल का?... मुळात तो तोच आहे की मला झालेला भास?... एका झटक्यात मानसी १५ वर्ष मागे पोहोचली. तिला महाविद्यालयातले सोनेरी दिवस आठवले अन तिच्या ओठांवर हलकेच एक छानसे हास्य पसरले.... तिच्या डोळ्यांपुढून एक-एक प्रसंग सरकायला लागले. जवळ-जवळ तासभर ती अशीच एकाजागी खिळून बसली होती. इतक्यात तिचा फोन वाजला. रिंगटोनवरुनच तिने ओळखलं तिच्या छकुल्याचा फोन आहे. एका क्षणात भूतकाळात भरकटलेले तिचे मन वर्तमान काळात आले. छकुल्याशी गप्पा मारल्यावर मानसीचं मन थोडं निवळलं. आजची घटना तिने मनाच्या कोपरयात एकदम मागे ढकलून दिली अन रोजच्या कामात बुडून गेली.

दुसरया दिवशी मात्र मानसीचं कामात अजिबात लक्ष लागत नव्हतं. कधी एकदा दुपार होते आणि मी खाली जाते असं तिला झाले होते. मनातून खूप भीतीही वाटत होती आणि ह्या गोष्टीची खात्रीही करून घ्यायची होती की तो तोच आहे........ तिचा भूतकाळ. आजही तसच झालं; तो तिच्यासमोर आला आणि त्याला कोणीतरी हाक मारली... अरे मानव.... ती गर्रकन मागे वळली. "मानव" हे नाव गरम शिश्यासारखं तिच्या कानातून ओतत गेलं..... तिचा संशय खरा ठरला. तिने मागे वळून पहायला आणि मानवने तिच्याकडे पहायला एकच वेळ झाली. तिचे डोळे पाहून तोही समजून गेला की ही तिच आहे.... मानसी..... कधीकाळी फक्त त्याची अन त्याचीच असणारी... मानसी. त्याचा उडालेला गोंधळ पाहून मानसी समजून चुकली की मानवही हया सगळ्यामध्ये तितकाच गोंधळून गेला आहे. आता तिथे उभं राहणं तिला शक्य नव्हतं. मानसी निघून गेली. मानव तिच्या पाठमोरया आकॄतीकडे पाहत राहिला.

मानसीचं असं अचानक समोर येण मानवला देखिल पचवणं अवघड होतं. गोंधळ त्याच्याही मनात उडाला होता. मानवने खुप विचार केला आणि ठरवलं की मानसीशी बोलायला हवय. पण कसं? आणि ती माझ्याशी बोलेल का? तिने मला झिडकारलं तर? एक ना अनेक प्रश्न त्याच्यासमोर फेर धरून नाचत होते. मानसी बरोबरचे सगळे बंध तोडल्यावर मानवने स्वतःला जाणिवपूर्वक मित्र-मेत्रिणिंपासून अलिप्त करून घेतलं; कारण कोणाच्याही मार्फत मानसी त्याला त्याच्यापर्यंत पोहोचायला नको होती. खरंतर चूक त्याचीच होती. मानसीला अजिबात विश्वासात न घेता, तिला काहिच न सांगता, कसलेही स्पष्टीकरण न देता तो तिच्या आयुष्यातून निघून गेला होता..... तिला अगदी एकटं टाकून... मानसीच्या मनाची काय अवस्था होइल ह्याचासुद्धा विचार त्याने केला नव्हता. पण चुका आता घडून गेल्या होत्या अन त्या कोणिच सुधारू शकत नव्हतं.... पुलाखालून बरच पाणी वाहून गेलं होतं.

तिसरयादिवशी मनाचा हिय्या करून मानव मानसीसमोर जाऊन उभा राहिला आणि तिला म्हणाला, "मला तुझ्याशी बोलायचे आहे. उद्या ह्याचवेळी मी तुझी वाट पाहीन. नक्की ये. " मानसीच्या उत्तराची वाटही न बघता तो निघून गेला... मानसी मात्र जागच्या-जागी थिजून गेली. काय करायचे अन काय नाही तिला काहिच सुचेना.

तुम्हाला काय वाटतं मानसीने आता काय करायला हवं..... तीने मानवला भेटावं की भेटू नये???

क्रमशः
**********************************************************