भोवरा...... भाग-२

"तिसरयादिवशी मनाचा हिय्या करून मानव मानसीसमोर जाऊन उभा राहिला आणि तिला म्हणाला, "मला तुझ्याशी बोलायचे आहे. उद्या ह्याचवेळी मी तुझी वाट पाहीन. नक्की ये. " मानसीच्या उत्तराची वाटही न बघता तो निघून गेला... मानसी मात्र जागच्या-जागी थिजून गेली. काय करायचे अन काय नाही तिला काहिच सुचेना. "
------------------------------------------------------------------------

आजवर जे फक्त दोघांच्या मनातच होतं ते अचानकपणे समोर उभं ठाकलं होतं. मानव-मानसी दोघेही नियतीच्या ह्या खेळावर आश्चर्यचकित झाली होती. दोघांनाही हे उमगत नव्हतं की १० वर्षांनी नियतीने त्यांना असं एकमेकांसमोर का उभं केलं? कशासाठी?

मानसीचा रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. मानवला भेटायला जावं की जाऊ नये? ह्या पेचात रात्रभर तळमळत होती. एक मन सांगत होतं की, "नाही... तुला जायला हवं. त्याचं काय म्हणणं आहे ते एकून घ्यायला हवं. तेव्हा नसेल त्याला संधी मिळाली तुला परिस्थिती समजावून देण्याची, पण आता तु ही संधी घालवू नकोस. (किती वेडं असतं नाही आपलं मन... ) तर दुसरं मन सांगत होतं " का?... का म्हणून जायचस त्याला भेटायला? जेव्हा परिस्थिती हाताबाहेर चालली होती तेव्हा त्याला एकदाही तुझ्याबरोबर बोलून काही मार्ग काढावासा वाटला? मग आता काय सारवा-सारव करणार आहे तो? "

मानवदेखिल रात्रभर विचार करत होता की " मी मानसीला भेटायला तर सांगितलं पण.... पण ती येईल का? आणि आलीच तर मी तिच्याशी कसं आणि काय बोलू? मी खूप दुखावलय तिला. ती नाही आली तरी रागवायचा किंवा दु:खी होण्याचा मला काहिच हक्क नाही. तोही रात्रभर जागाच होता. उद्याचा सूर्य त्या दोघांच्या आयुष्यात एक नवीन पहाट घेऊन येणार होता.... फरक इतकाच होता की तो हवाऱ्हवासा नव्हता.... दोघांसाठीही....

मानसी ऑफिसच्या कामात बुडून गेली होती. जेवणाची वेळ होत आली पण तिला आज ना तहान होती ना भूक. तिने जेवण घ्यायचे टाळले. अजूनही ती जाऊ की नको ह्या डिलेमा मध्यी अडकलेली. रोज न जाणारा वेळ आज वारयाच्या वेगाने पळत होता. मानवने दिलेली वेळ मिनिटांगणिक जवळ येऊन टळूनही गेली. अचानक मानसीच्या मनात एक विचार चमकून गेला.

मानवही कधी नव्हे ते मानसीला भेटायला चक्क वेळेच्या बराच आधी जाऊन उभा होता. त्याचं लक्ष सारखं-सारखं घड्याळाकडे जात होतं. भुतकाळातील घटना त्याच्या डोळ्यापुढे नाचत होत्या. पण..... हे काय? मी दिलेली वेळ टळूनदेखिल बराच वेळ झालाय. अजून मानसी कशी आली नाही? का? कदाचित तिने अजून मला माफ नाही केले. ती अजूनही झालेल्या गोष्टींसाठी मला दोषी मानते आहे. ह्यात तिची तरी काय चूक आहे. मानवच्या मनात विचारांची आवरतनं उमटत होती.

बराच वेळ होऊन गेलेला म्हणून तो जायला वळला अन तिथेच थबकला. त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. चक्क मानसी त्याच्या पुढ्यात उभी होती. क्षणभर त्याला काही सुचलच नाही. त्याचे डोळे अलगद भरून आले. महत्प्रयासाने त्याने आलेलं पाणी मागे सारलं. दोघांनाही एकमेकांच्या डोळ्यात बघणे शक्य नव्हते. बराच वेळ दोघेही निशःब्द उभे होते. "हम भी चुप हे, तुम भी चुप हो.... बस खामोशी को आज बाते करने दों" अशी त्यांची अवस्था झाली होती.

क्रमशः
*************************************************************