वळवाचा शिडकावा

अवलोकन करीत असताना आकाशात

मळभ भरून आले होते कसे गगनात
कृष्णमेघांची दाटी झाली कांही क्षणात
तिमिर पसरे कसा, जलद आसमंतात
सुरू  झाला  कसा, सोसाट्याचा  वारा
हलवी गदागदा खूप, सर्व उंच तरुवरा
मागोमाग येती कशा, वळवाच्या धारा
चिंब भिजवुनी टाकती , सुंदर वसुंधरा
अवचित झालेल्या या, शिडकाव्याने
प्रफुल्लित होई सृष्टी, किती आनंदाने
सुसह्य होई ग्रीष्म, शीतल गारव्याने
काहिली शांत होई, अंगाची पावसाने
गारपीटीने मात्र अशा, या वळवाच्या
मार बसे आम्रफळास, कसा वृक्षाच्या
गळती फळे , सोडून आधार  तरूचा
आनंद होई मुलांना, फळे वेचण्याचा
तारांबळ उडे जनतेची, कशी रस्त्यात
चुकविण्या गारपीट, थांबती आडोशात
खच पडे गारांचा, सर्व  त्या  वस्त्यात
भिजती  स्त्रिया, मुले  खूप  आनंदात