एस्पेरान्तो : एक वैश्विक भाषा

''एस्पेरांतो? ही कसली भाषा? ही तर एखादी इटालियन किंवा स्पॅनिश रेसिपीच वाटते बघ!'' माझी मैत्रीण मला हसून म्हणाली. खरेच, तिचा तरी काय दोष म्हणा.... १२५ वर्षांपूर्वी निर्माण झालेली ही भाषा भारतात येऊन गेली ३० वर्षे झाली तरी अद्याप भारतातील लोकांना तिच्याबद्दल फारशी माहिती नाही. ह्या लेखाचा उद्देश एस्पेरांतो या आगळ्यावेगळ्या भाषेची तोंडओळख करून देणे हा आहे. 
कधी काळी ह्या भाषेचे प्राथमिक, अगदीच जुजबी ज्ञान मिळविण्याचा योग मला प्राप्त झाला आणि एका नव्याच भाषाविश्वात प्रवेश करण्याची संधी त्याद्वारे खुली झाली. (मी ह्या भाषेचा अगदीच प्राथमिक अभ्यास केला आहे ही नोंद जाणकारांनी कृपया घ्यावी. तेव्हा चुभूदेघे  )
तर ही एस्पेरांतो  भाषा नक्की आहे तरी काय?
बोलायला अतिशय सोपी, सरळ व समूहासाठी निर्माण केली गेलेली ही एक कृत्रिम भाषा आहे. कृत्रिम एवढ्याचसाठी, की तिचे मूळ अनेक इंडो-जर्मॅनिक भाषांमध्ये, युरोपीय भाषांमध्ये आहे. कदाचित त्यामुळेच ज्यांना संस्कृत व लॅटीन भाषांची थोडीफार जाण व ज्ञान आहे त्यांना ही भाषा जवळची वाटते. त्यात अनेक स्पॅनिश, जर्मन, इटालियन धर्तीचे, त्यांतून घेतलेले किंवा मूळ असलेले शब्दही आहेत. थोडक्यात, युरोपियन व आशियाई भाषांच्या अभ्यासकांना ही भाषा अवगत करणे अजिबात कठीण नाही. मात्र ह्या भाषेचा उद्देश जगातील सर्व समूहाला एका सामायिक पर्यायी भाषेत एकमेकांशी संवाद साधता यावा हा आणि हाच आहे. आज जगातील लाखो लोक तरी ही भाषा आपल्या स्थानिक भाषेगत सफाईने बोलतात. पुण्यातील ह्या भाषेचे अभ्यासक व एस्पेरांतोच्या भारतातील संघाचे अध्यक्ष डॉ. अब्दुल सलाम म्हणतात त्याप्रमाणे ही काही परिषदांमध्ये, अभ्यासकांच्या मेळाव्यात काथ्याकूट करायची भाषा नव्हे; तर ही जनसमूहाची - सामान्य माणसाची भाषा आहे. 
भाषेचे जनक
पोलंडच्या वॉरसा प्रांतातील (तेव्हा तो रशियाचा भाग होता) जामेनहोफ या सद्गृहस्थांनी इ‌. स. १८७७ ते १८८५चे दरम्यान ह्या भाषेची निर्मिती केली. त्यांच्या काळातील राजकीय, सामाजिक व प्रांतिक भेदांचे मूळ लोकांचा आपापसात परस्पर संवाद नसण्यात आणि तो संवाद करण्यासाठी एखादी सामायिक भाषा नसण्यात आहे याबाबतीत त्यांचे ठाम मत होते. त्यांना स्वतःला रशियन, यिडिश, जर्मन, फ्रेंच, पोलिश, ग्रीक, स्पॅनिश, लॅटीन, हिब्रू, इंग्रजी, इटालियन व लिथ्वेनियन भाषा अवगत होत्या. स्थानिक लोकांच्या आपापसातील भांडणांना, प्रांतवादाला, हिंसेला आणि गैरसमजुतींना जामेनहोफ महाशय कंटाळले होते. त्यातूनच त्यांना एस्पेरांतो ही जागतिक उपभाषा निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली. पुढे त्यांच्या तीन मुलांपैकी लिडिया ही एस्पेरांतो प्रशिक्षक म्हणून युरोप व अमेरिकेत बराच प्रवास करून ह्या भाषेला प्रचलित करत असे. दुर्दैवाने जामेनहोफ यांच्या तिन्ही मुलांची होलोकास्टमध्ये हत्या झाली. 
भाषेच्या नावामागील इतिहास 
जामेनहोफ यांनी एस्पेरांतोविषयीचे पहिले पुस्तक डोक्तोरो एस्पेरांतो (डॉक्टर एस्पेरांतो) या नावाखाली इ. स. १८८७ साली प्रकाशित केले होते. एस्पेरो शब्दाचा अर्थ ''आशा बाळगणारा'' असा होतो. ह्या भाषेचे मूळ नाव ''ल इंतरनॅशिया लिंग्वो'' (द इंटरनॅशनल लॅन्ग्वेज) असे होते. जामेनहोफ यांच्या सन्मानार्थ आज ही भाषा एस्पेरांतो नावाने ओळखली जाते. 
एस्पेरांतो भाषेची वैशिष्ट्ये 
१. आंतरराष्ट्रीय भाषा : जेव्हा वेगवेगळ्या मातृभाषा बोलणारे लोक एकत्र येतात तेव्हा एस्पेरांतो भाषेचा खरा उपयोग होतो. जगात ही भाषा बोलणाऱ्यांची संख्या दिवसेंगणिक वाढतच आहे. आज एस्पेरांतो भाषा प्रामुख्याने बोलणाऱ्या कुटुंबांमध्ये वाढलेल्या व आपल्या मातृभाषेसह एस्पेरांतोला सफाईने बोलणाऱ्या मुलांची संख्या हजारांच्या वर आहे. 
२. समानता : ही भाषा सर्व लोकांना एकसमान पातळीवर नेऊन ठेवते. येथे भाषेच्या जोरावर कोणी श्रेष्ठ कनिष्ठ नाही. सर्वांनीच ही भाषा शिकण्यासाठी समान परिश्रम घेतले असल्यामुळे ही समानतेची पायरी परस्परसंवादात फार कामी येते.
३. तटस्थ : ही भाषा कोण्या एका जातीचा, देशाचा वा संप्रदायाचा मक्ता नसल्यामुळे एक तटस्थ भाषा ह्या अर्थी काम करू शकते. 
४. सोपेपणा: ही भाषाच मुळी सोप्यात सोप्या पद्धतीने शिकता यावी, बोलता यावी अश्या प्रकारे तयार केली गेली असल्यामुळे त्या तुलनेत ती शिकण्यासाठी कमी कष्ट पडतात. 
५. जिवंत भाषा : इतर भाषांप्रमाणेच ह्याही भाषेचा कालपरत्वे विकास होत गेला आहे आणि ह्या भाषेतही आपण आपले विचार व भावना प्रभावीपणे मांडू शकतो हे तिचे वैशिष्ट्य. 
आज ह्या भाषेत कित्येक हजार पुस्तके, मासिके, वृत्तपत्रे, संगीत व काही प्रमाणात चित्रपटांची निर्मिती झाली आहे. तसेच जगभरातील नामवंत साहित्यिकांचे साहित्य ह्या भाषेत रुपांतरित झाले आहे. संपूर्ण दुनियेत ह्या भाषेला आत्मसात केलेली मंडळी तिचा उपयोग जगभरात प्रवास करताना, पत्रमैत्रीसाठी तर करतातच! जगातील एस्पेरांतो  बोलणारे लोक एकमेकांच्या घरी आतिथ्याचा विनामूल्य लाभ घेतात. शिवाय एकमेकांच्या भेटीगाठीत फक्त एस्पेरांतो बोलण्यावर भर, परस्पर संस्कृती-पाककला-परंपरा-विचार इत्यादींची एस्पेरांतोच्या माध्यमातून देवाणघेवाण ह्याही गोष्टी आठवणीने पाळल्या जातात. ह्या भाषेसंदर्भातील वेगवेगळ्या परिषदा, संवाद, स्नेहसंमेलनांतून निरनिराळ्या ठिकाणी एस्पेरांतो बोलणारे लोक एकत्र येऊन सांस्कृतिक आदानप्रदान करतानाच ह्या भाषेचा मूळ उद्देश जपण्याचे काम करतात. 
भाषेचा उद्देश
ह्या भाषेला निर्माण करण्यामागे जगातील सर्व लोकांना आपली भाषा सोडून, परस्परांशी बोलण्यासाठी एक समान भाषा असावी... ती भाषा प्रांतमुक्त, जातिमुक्त, देशमुक्त, वर्चस्वमुक्त असावी हा उद्देश होता. त्यात स्थानिक भाषेला ही भाषा पर्याय म्हणून गणणे, भाषावैविध्यात खंड पाडणे हे उद्देश अजिबातच दिसत नाहीत. एक तटस्थ, कोणतीही विशिष्ट संस्कृती नसलेली व स्वतःची वेगळी ''वैश्विक'' संस्कृती असलेली ही भाषा तिच्या ह्या वैशिष्ट्यांमुळेच अनेक टीकाकारांचे लक्ष्य बनली आहे. तसेच ह्या भाषेतील शब्द प्रामुख्याने युरोपियन धाटणीचे असल्याचा आरोपही तिच्यावर केला जातो. मानवी इतिहासातील एक समृद्ध, विचारपूर्वक आणि ऐतिहासिक - क्रांतिकारक पाऊल म्हणून ह्या भाषेची किमान ओळख करून घेणे प्रत्येकच 'ग्लोबल' नागरिकाच्या फायद्याचे ठरणारे आहे. इ. स. १९५४ मध्ये युनेस्कोने ह्या भाषेला औपचारिक मान्यता बहाल केली आहे.   
ह्या भाषेतील काही शब्द उदाहरणादाखल :
हॅलो : सालूतोन : Saluton
येस : जेस : Jes
नो : ने : Ne
गुड मॉर्निंग : बोनान मातेनोन : Bonan matenon
गुड आफ्टरनून : बोनान वेस्पेरोन : Bonan vesperon
गुड नाईट : बोनान नोक्तोन : Bonan nokton
ऑल राईट : बोने : Bone
थॅंक यू : दांखोन : Dankon
प्लीज : बोन्वोलू : Bonvolu
भाषा कशी शिकायची?
इंटरनेटच्या जमान्यात काही संकेतस्थळांच्या माध्यमातून तुम्ही ही भाषा शिकू शकता.
त्यासाठी http://www.lernu.nethttp://www.ikurso.net या संकेतस्थळांवर नजर टाका. 
तसेच ह्या विषयावर या संस्थळांवर व यूट्यूबवरही काही चित्रफिती उपलब्ध आहेत. त्याही जरूर पाहाव्यात!
मराठीत ह्या भाषेवरील पुस्तकाची निर्मिती डॉ. अनिरुद्ध बनहट्टी यांनी केली आहे. मला इंटरनेटवर पुस्तक मागवण्यासाठीचा त्यांचा मिळालेला पत्ता हा असा : बी ३, कांचन नगरी, कात्रज, पुणे - ४६. 
ईमेलः anibani@rediffmail.com 
तसेच ह्या विषयावर तेलुगू व इंग्रजी भाषेत डॉ. रंगनायकुलू यांनी पाठ्यपुस्तकनिर्मिती केली आहे. 
त्यांचा मिळालेला पत्ता असा : 
पी. व्ही. रंगनायकुलू 
असिस्टंट प्रोफेसर, ४६, ज्युनियर ऑफिसर्स क्वार्टर्स, बिहाईंड टीटीडी ऍडमीन बिल्डिंग्ज, के टी रोड, तिरुपती, ५१७५०१, आंध्र प्रदेश. 
(वरील पत्ते हे इंटरनेटवर मिळालेले असून त्यांची लेखिकेने खात्री करून घेतलेली नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी! )
या भाषेविषयी काही बातम्या स्थानिक वृत्तपत्रांमध्येही छापून आल्या आहेत. त्यातीलच ही एक बातमी :
माझे शिक्षक
माझे शिक्षक डॉ. अब्दुल सलाम यांच्याविषयी दोन शब्द लिहिल्याखेरीज हा लेख संपवता येणार नाही. त्यांच्या माध्यमातूनच मला या भाषेची सुरेख ओळख झाली. अनेक विद्यार्थ्यांशी, समाजातील विविध स्तरांतील लोकांशी सुसंवाद साधण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. उत्साह, नैपुण्य, विनम्रता, सौहार्द आणि कार्यनिष्ठा यांचा अपूर्व संगम त्यांच्या व्यक्तिमत्वात पाहावयास मिळतो. अनेक वर्षे समाजकल्याण खात्यातील महत्त्वपूर्ण अधिकारपद निभावल्यावर निवृत्तीनंतरही समाजहितासाठी झटणारे डॉ. अब्दुल सलाम ज्या सफाईने, सहजतेने वावरतात, बोलतात त्यावरून त्यांना दृष्टीचे सुख नाही हे कोणाला कळणारही नाही! पण कदाचित त्यामुळेच त्यांच्या कार्यातले झपाटलेपण, त्यांची तळमळ समोरच्या व्यक्तीच्या मनाचा ठाव घेते. त्यांचे मोकळे हास्य, वागण्यातील सुसंस्कृतता त्यांच्या विश्वनागरिकत्वाचीच प्रचीती देते. डॉ. सलामांना माझे ह्या लेखाद्वारे विनम्र अभिवादन!  
(लेखातील बरीचशी माहिती विकिपीडियामधून साभार! 
विकीपीडियाची लिंक : http://en.wikipedia.org/wiki/Esperanto)
डॉ. अब्दुल सलाम यांना आपण खालील पत्त्यावर संपर्क साधू शकता :
हेल्पो फाऊंडेशन
इंडिया ऑफिस
५, अर्चना कॉर्नर, साळुंके विहार रोड,
पुणे ४११०४८, भारत. 
फोन : ०२० - २६८५५६३२, २६८५५६४४. फॅक्स : २६८५५६४४
ईमेल : helpo@vsnl.com 
-- अरुंधती