दृष्टादृष्ट - एक आनंददायी अनुभव

'दृष्टादृष्ट' हे य दि फडक्यांनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रांचा संग्रह. हे लिखाण १९६६ ते १९९१ या सव्वीस वर्षांच्या काळात केलेले. त्यात वैविध्य भरपूर आहे.

सुरुवातीलाच फडक्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करताना "ज्या व्यक्तींबद्दल मी लिहिले आहे त्यांचे संपूर्ण चित्र रेखाटले आहे असा माझा मुळीच दावा नाही. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे काही कवडसे त्यात पडले आहे इतकेच फार झाल्यास म्हणता येईल" असे लिहून ठेवले आहे. आणि ते खरे आहेच. कमीत कमी चार ते जास्तीत जास्ती बारा पानांत मावलेली ही व्यक्तीचित्रे. त्यात सूक्ष्म सोडाच, पण साधे तपशीलही कसे असतील?

य दि फडके हे एक विचारवंत म्हणून आपल्या सगळ्यांनाच चांगले परिचित आहेत. त्यांना ललित लेखनाचेही इतके समर्थ अंग असेल हे पटकन जाणवत नाही. काही व्यक्तीचित्रे वाचून झाल्यावर आपण त्यात गुंगत जातो. लेखक जयवंत दळवी वा तत्सम कुणी असावेत असा ग्रह नेणिवेत ठाण मांडू लागतो आणि अचानक जाणीव होते की हे तर य दि फडके. किमान माझे तरी असे झाले.

इथे फडक्यांनी अत्र्यांपासून सावरकरांपर्यंत, सेनापती बापटांपासून आंबेडकरांपर्यंत, लोकमान्य टिळकांपासून मोगूबाई कुर्डीकरांपर्यंत व्यक्तीचित्रे रेखाटली आहेत. यातल्या सगळ्याजणांशी त्यांचा व्यक्तीगत संपर्क आला असे अजिबात नाही.

काही व्यक्तींबाबत (लोकमान्य टिळक, श्रीधर टिळक, बाबुराव पेंटर, चार्ली चॅपलीन आदि) तर केवळ वाचनातून/श्रवणातून त्यांनी व्यक्तीचित्र उभे केले आहे. आणि बऱ्याचदा तेही ताकदवान उतरले आहे.

फडक्यांना संगीतातली चांगली जाण आहे, हे मोगूबाईंचे व्यक्तीचित्र वाचल्यावर उमजते. ते मोगूबाईंना स्वतः दोनचार वेळेला भेटलेले असल्याने एक व्यक्तीगत स्पर्श त्यात जाणवतो.

वि स खांडेकरांना ते भेटले तेव्हा खांडेकरांना ज्ञानपीठ मिळायचे होते. एक ज्येष्ठ साहित्यिक म्हणून फडके त्यांना भेटले आणि थोडके विचारमंथन झाले. फडके खांडेकरांना आधी शाळकरी वयात स्वाक्षरी घेण्याच्या निमित्ताने भेटलेले होते त्या आठवणीवर या लेखाचा समारोप एखाद्या समेवर अचूक उतरलेल्या चीजेसारखा झाला आहे.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीवर प्रबंध लिहिण्याचा घाट फडक्यांनी घातला आणि आचार्य अत्र्यांना भेटणे अपरिहार्य होऊन बसले. अत्रे उतरणीला लागले होते. त्यानंतर दोन वर्षांच्या आतच ते निधन पावले. पण फडक्यांना त्यांनी भरभरून मदत केली. आणि केवळ प्रबंधाबद्दलच असे नव्हे, तर स्वतःच्या नाटकांपासून फडक्यांच्या संगीतविषयक लेखनापर्यंत ऐसपैस गप्पा मारल्या. परस्परविरोधी विशेषांनी भरलेले, पुस्तकांवर जिवापाड प्रेम करणारे, आपण अतिशयोक्ती करतो हे चारचौघांत जाहीरपणे पुनःपुन्हा सांगणारे अत्रे या व्यक्तिचित्रात फारच उत्तम उतरलेले आहेत.

बेगम अख्तर यांच्यावरचा लेखही चांगला आहे. पण मला स्वतःला ठुमरी, दादरा, गझल यातले काहीच उमजत वा भावत नाही. त्यामुळे एकंदरीत भाषासौंदर्यामुळे लेख चांगला आहे एवढे म्हणून थांबतो.

न र फाटक आणि दत्तो वामन पोतदार हे जोडव्यक्तीचित्र अगदी एखाद्या जमलेल्या जोडरागासारखे नितांतसुंदर झाले आहे. ही दोन व्यक्तीचित्रे एकत्र लिहिण्याचे प्रयोजन काय हे वेगळे लिहिण्याची अजिबात पडत नाही. त्याच्या तुलनेत स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सेनापती बापटांना एका लेखात बसवण्याचे प्रयोजन कळत नाही. गंमत म्हणजे फाटक-पोतदार जोडगोळीइतकाच सावरकर-बापट यांचा घनिष्ट संबंध होता. किंबहुना थोडा जास्तच. पण पन्नास टक्के तेल आणि पन्नास टक्के पाणी एकत्र केले तर मिश्रण होत नाही तसे काहीसे झाले आहे. फाटक-पोतदार या दुधामधाच्या मिश्रणाच्या तुलनेत हे जास्त जाणवते.

फडक्यांच्या व्यक्तिगत आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींपैकी एक असणाऱ्या डॉक्टर सीताराम दामोदर सातवळेकर यांचे व्यक्तीचित्र भावनास्पर्शी आहे. या व्यक्तीचित्राची सुरुवातच हळुवार शब्दांनी होते आणि मधूनमधून सम गाठत राहते. डॉक्टर सातवळेकर हे पंडित सातवळेकरांचे धाकटे बंधू असे म्हटल्यावर बऱ्याच जणांना संगती लागेल. पण डॉक्टरबुवा किती हुन्नरी होते हे वाचल्यावर पंडित सातवळेकरांना डॉक्टर सातवळेकरांचे मोठे बंधू म्हणावे असा एक उद्धट विचार मनात डोकावून गेला!

फडक्यांचे त्यांच्या जडणघडणीच्या काळात महाकवी बेंद्रे यांच्याशीही निकटचे वैयक्तिक संबंध होते. त्यामुळे बेंद्र्यांचे व्यक्तीचित्रही हळुवार उतरले आहे. विशेषतः बेंद्रे निवर्तल्यावरचा स्मशानभूमीतला प्रसंग.

क्रांतीकार्यात सहभागी होऊन वयाच्या चौदाव्या वर्षी ब्रिटिश जिल्हाधिकाऱ्याला गोळ्या घालून मारणाऱ्या दोघींचे व्यक्तिचित्र चांगले आहे. पण आधीची व्यक्तीचित्रे (जरी त्यातली काही वर्तमानपत्रांसाठी लिहिलेली असली तरी) शांत निवांत खुलवत नेल्यासारखी वाटतात. त्यामानाने हे, गं बा सरदारांचे, वीणा भौमिक-दास यांचे ही व्यक्तीचित्रे वर्तमानपत्रांसाठी(च) लिहिल्यासारखी वार्ताहरी वाटतात.

लोकमान्य टिळकांचे व्यक्तीचित्र अगदीच चारपानी आणि '१ ऑगस्टच्या' वृत्तपत्रांत लिहिलेले असूनही सुंदर झाले आहे. लोकमान्यांच्या एका वेगळ्याच पैलूवर फडक्यांनी संयमित प्रकाशझोत टाकला आहे.

तो संयम श्रीधरपंत टिळकांच्या व्यक्तीचित्रात थोडासा सुटला आहे. काही उल्लेख हे इतरत्र ओझरते येऊन गेलेले असले तरी फडक्यांनी ते ठोक भाषेत मांडले आहेत. 'शोध बाळ गोपाळांचा'वाले फडके हेच याची खात्री पटवणारे व्यक्तीचित्र!

चार्ली चॅप्लीन, बाबासाहेब आंबेडकर यांची व्यक्तीचित्रेही वार्ताहरी झाली आहेत. त्यामानाने बाबुराव पेंटरांचे व्यक्तीचित्र थोडे ऐसपैस झाले आहे. पण तेही  वाचून झाल्यावर त्रोटक भासत राहते.

एकंदरीत एक निश्चितच आनंददायी अनुभव देणारे हे पुस्तक आहे. आपटे रस्त्यावरच्या आशा डायनिंग हॉलच्या खाली दोनच मांडण्यांवर काही वेचक पुस्तके ठेवलेली असतात. तिथल्या गृहस्थांना वाचनाचे चांगले अंग आहे. गिऱ्हाईक काय पुस्तक घेते आहे हे पाहून ते आणखी पुस्तके सुचवतात. मध्यंतरी तिथून काही पुस्तके उचलली, त्यातले हे एक. बाकीच्यांबद्दल लौकरच लिहीन.

प्रकाशक - श्रीविद्या प्रकाशन

प्रथमावृत्ती - ऑक्टोबर १९९२

किंमत - ७५ रुपये