काही वर्षांपूर्वी आमच्या क्लबनी पैसे उभारण्यासाठी चॅरिटी शो लावला होता. त्याची प्रत्येकी १०० रुपयांची अशी २० म्हणजे २००० रुपयांची तिकिटं मला खपवायला दिली होती. तोपर्यंत आयुष्यात मी असलं तिकिटं खपवण्याचं काम केलं नव्हतं. खरंतर एखाद्याला शो चं एरवीपेक्षा महाग असलेलं तिकीट घ्या हे कसं सांगायचं हे कळत नव्हतं आणि त्यानी तरी आपल्याकडून तिकीट का घ्यावं याचं कुठलंही पटण्यासारखं उत्तर माझ्याकडे नव्हतं. त्यात आणखी आमचा क्लब हा उद्योग नसलेल्या पैसेवाल्यांचा क्लब म्हणून बदनाम होता.
तिकिटं विकायला जमणार नव्हतं पण पैसे उभारण्याच्या कामी आपल्याकडून काहीही योगदान नाही हेही मला कमीपणाचं वाटत होतं. त्यावर एकदा वाटलं की दोन हजार ही काही फार मोठी रक्कम नाही. सरळ आपल्या खिशातून देऊन टाकावे नि घरोघर जाऊन तिकिटं विकण्याच्या कामातून सुटका करून घ्यावी. पण पुन्हा मनात आलं, साठी उलटल्यावरही आपल्याला सामाजिक कार्यासाठी साधे २००० रुपये गोळा करता येऊ नयेत म्हणजे काय! आपल्याला समाजात एवढीही पत असू नये? ते काही नाही आपल्याला तिकिटं विकता आलीच पाहिजेत.
मग प्रश्न आला, तिकिटं विकायला कोणाकोणाकडे जायचं? अर्थातच जिथे गेल्यावर आपल्याला पैसे न घेता रिकाम्या हातानी परत यावं लागणार नाही त्यांचाकडे. मग ठरवलं, आपल्याला नाही म्हणणार नाहीत अशांची यादी करू या. अशी पन्नासएक माणसं सहज निघतील हे लक्षात आलं. आणि माझ्याकडे तर फक्त वीसच तिकिटं होती. म्हणजे माझं काम सोपं होतं.
मी यादी करायला बसलो. दोनतीन नेहमींच्या संपर्कात येणारांची नावं लिहिल्यावर त्यांच्याकडे जाऊन ट्रायल घ्यायची इच्छा झाली. मी तिकिटं घेऊन बाहेर पडलो. तिकिटं मराठी गाण्यांच्या कार्यक्रमाची होती. एक जिना उतरल्यावर वाटलं, या मजल्यावर राहणारे मि. बागवे आपल्याला ओळखतात; त्यांना का विचारू नये? त्यांचं नाव माझ्या मनातल्या यादीत नव्हतं. तरी त्यांना विचारायचं ठरवलं. दारावरची बेल वाजवली. त्यांनी स्वतःच दार उघडलं. हसून स्वागत केलं नि आत यायला सांगितलं. मी माझं काम सांगितलं. त्यानी विचारलं, कोणता कार्यक्रम आहे. मी कार्यक्रमाचं नाव सांगितलं. त्यावर ते म्हणाले, "यातले संगीत दिग्दर्शक आमच्या नात्यातले आहेत. " त्यानी दोन तिकिटं घेतली. ही माझ्या आयुष्यातली पहिली तिकीटविक्री. बागवेंनी सांगितलेल्या नातेसंबंधाची मला काहीच कल्पना नव्हती.
तिथून निघाल्यावर नेहमी रस्त्यात जाता येता ओळख दाखवणाऱ्या नि आमच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या मिसेस गुप्तेंकडे तिकिटं घेऊन जायचं ठरवलं. (त्यांचं आडनाव गुप्ते नाही हे नंतर कळलं). पूर्वी कधी त्यांच्या घरी गेलो नसल्यानी त्यांचा फ्लॅट नंबर विचारण्यासाठी तिथेच खालच्या मजल्यावर राहणाऱ्या ओळखीच्या मि. कुळकर्णींकडे गेलो. प्रथम त्यांनाही तिकिटाविषयी विचारलं. पण शो च्या दिवशी त्यांचा दुसरीकडे जाण्याचा प्रोग्राम असल्यानी त्यानी नाही सांगितलं. मात्र मिसेस गुप्तेंचा जो पत्ता त्यांनी सांगितला त्यामुळे मी गोंधळलो. तो मला वाटल्याप्रमाणे त्या बिल्डिंगमध्ये नव्हताच! दुसऱ्याच बिल्डिंगमध्ये होता. पण तरीही तिथे जायचं ठरवलं. मि. कुळकर्णींनी दिलेल्या पत्त्यावर पोचलो. दारावरची बेल वाजवली. एका बाईंनी दार उघडलं. पण त्या नेहमी दिसणाऱ्या बाई नव्हत्या. त्यामुळे त्यांच्याशी काय नि कसं बोलावं ते सुचेना. पण आडनाव मराठी होतं म्हणून प्रयत्न करायला हरकत नाही असं वाटलं म्हणून मी विचारलं,
"मि. गुप्ते आहेत का? "
"आहेत" बाई म्हणाल्या. त्यानी मला आत येऊन बसायला सांगितलं नि म्हणाल्या, "बाथरूममध्ये आहेत. येतीलच एवढ्यात" असं सांगून बाई आपल्या कामाला निघून गेल्या.
ज्या गृहस्थाशी ओळख नाही त्याच्याशी काय बोलावं असा विचार करत असता मि. गुप्ते आले. हसून मला नमस्कार केला नि विचारलं, "काय काम आहे? "
मी त्यावेळी सुचलं ते बोललो, "तुम्ही मला ओळखत नसाल ....... "
त्यावर लगेच ते म्हणाले, "मी ओळखतो तुम्हाला. तुम्ही मि. कोर्डे."
माझ्या कामातला मोठ्ठा अडसर दूर झाल्यासारखं वाटलं. मी त्याना आमच्या क्लबविषयी नि चॅरिटी शो विषयी सांगितलं. त्यांनी चार तिकिटं घेतली नि वर भेटून आनंद झाला असं सांगून चहाही पाजला.
तिथून निघालो. पण मला माहीत असलेल्या "मिसेस गुप्ते" माझ्या डोक्यातून जाईनात. म्हणून पुन्हा मि. कुळकर्णींकडे गेलो. त्यांना त्यांच्याच बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या "मिसेस गुप्तें"चं वर्णन सांगितलं नि त्यांचा फ्लॅट नंबर विचारला. त्यावर त्यानी त्या बाईंचं आडनाव गुप्ते नसून प्रधान असल्याचं सांगितलं व त्याच्याच बिल्डिंगमध्ये असलेला त्यांचा फ्लॅट नंबरही सांगितला. मी त्यांचे आभार मानून प्रधानांकडे जायला निघालो तेवढ्यात ते म्हणाले, "असं करा. मलाही एक तिकीट द्या. जमलं तर शो ला येईन नाहीतर दुसऱ्या कोणाला तरी देईन. "
मला हर्षवायू व्हायचंच बाकी होतं.
मग मी मि. प्रधानांच्या फ्लॅटवर गेलो. इथे मात्र मी ओळखणाऱ्या बाईनीच दार उघडलं. शो च्या दिवशी त्यांचा दुसरा कार्यक्रम ठरला असल्यामुळे त्यानी तिकीट घेतलं नाही. एव्हापर्यंत सात तिकिटं विकली गेल्यामुळे मीही आग्रह करायचा नाही असं ठरवलं. थोडावेळ प्रधान पतीपत्नींबरोबर इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या नि निघालो. त्यावेळी माझ्या हे लक्षात आलं की मिसेस प्रधानाना मिसेस गुप्ते समजण्याची माझी चूक झाली नसती तर खऱ्या मि. गुप्त्यांकडे खपलेली चार तिकिटं खपली नसती.
घरी आलो तर बायको फोनवर कोणाशी तरी बोलत होती. तिच्या बोलण्यावरून दुसऱ्या बाजूला कोणीतरी ओळखीचं असावं असं वाटलं म्हणून विचारलं, "कोणाशी बोलत्येस? "
"डॉ. देशपाड्यांशी" ती म्हणाली.
मला आणखी एक संधी दिसली. मी बायकोला म्हणालो, "तुझं झालं की मला फोन दे. मला जरा बोलायचाय"
फोन हातात मिळाल्यावर डॉक्टरना हॅलो करून आमच्या क्लबच्या कार्यक्रमाबद्दल सांगितलं. तेही दुसऱ्या एका क्लबचे मेंबर होते. त्यानी दोन तिकिटं घ्यायचं कबूल केलं पण एका अटीवर; त्यांच्या क्लबचा जेव्हा चॅरिटी शो असेल तेव्हा मीही त्याची तिकिटं घ्यायची. क्षणाचाही विचार न करता मी हो म्हणालो. त्यांच्या घरी जाऊन त्याना तिकिटं देऊन आलो. गंमत म्हणजे त्यांच्या क्लबच्या शो च्या तिकिटंबद्दल त्यांनी पुन्हा कधीही विचारलं नाही. अर्थात, विचारलं असतं तर मी ती घेतलीच असती.
त्यानंतर आलेल्या अनुभवांच्या आधारावर मी माझी कार्यपद्धती ठरवली. ओळखीच्या माणसाला प्रथम फोन करायचा. त्याला क्लबच्या कार्याची माहिती देऊन चॅरिटी शो च्या तिकिटंविषयी सांगायचं. नंतर त्याला सोयीची वेळ असेल त्यावेळी घरी जाऊन तिकिटं द्यायची.
वीस तिकिटांचा लॉट एका दिवसात संपला.
या अनुभवातला सर्व घटनाक्रम हा मला मीच घडवलेला चमत्कार वाटला. अशक्य वाटणारी गोष्ट मला शक्य झाली होती. हे सर्व एकाच दिवसात घडलं होतं. निश्चय करून जसजशी कृती करत गेलो तसतसं पुढे काय करावं ते सुचत गेलं.
वरील अनुभवात चमत्कार सदरात मोडतील अशा दोन गोष्टी होत्या.
१) ज्या गृहस्थानी (मि. बागवे) पहिली दोन तिकिटं घेतली त्यांचा कार्यक्रमातल्या संगीत दिग्दर्शाशी असलेला नातेसंबंध. या संबंधामुळे त्याना तिकिटं देणं सोपं झालं व पहिलीच ट्रायल यशस्वी झाली. मला या नातेसंबंधाची कल्पनाही नव्हती. मि. बागवेंचं नाव माझ्या यादीतही नव्हतं. तरी मला पहिल्यांदा त्यांच्याकडे जायची बुद्धी झाली.
२) आडनावातला गैरसमज ही गोष्ट फायद्याची ठरली ज्यामुळे पाच तिकिटं (चार खऱ्या गुप्तेंकडे व एक पुन्हा ज्यांच्याकडे चौकशी करायला गेलो त्यां कुळकर्णींना) विकली गेली. जर ज्यांना मी गुप्ते समजत होतो त्यांचं खरं आडनाव प्रधान आहे हे अगोदर माहीत असतं तर त्या फेरीत एकही तिकीट विकलं गेलं नसतं.
या गोष्टींचं एक स्पष्टीकरण संभवतं. ते म्हणजे प्रत्येक माणसाला 'आतला आवाज' असतो. तो कितीही क्षीण असला तरी त्याच्या प्रयत्नांची दिशा ठरवतो. निर्धार पक्का असेल तर हा आवाज त्याला उद्दिष्टपूर्तीच्या दिशेला वळवतो. अशावेळी ज्या माहितीच्या आधारावर प्रयत्न केले जातात ती चुकीची आसली तरी.