विष्णुगुप्त-भाग २

त्या द्वारपालाने पुन्हा एकदा त्याला नीट न्याहाळलं, आणि विचारलं,
"तुझी अभिज्ञान-मुद्रा?" या प्रश्नावर विष्णु एकदम चमकला, आणि पुन्हा
काहीतरी आठवल्यासारखं त्याने कनवटीला हात घातला, आणि आपल्या धोतराची,
कमरेजवळ वळवलेली एक घडी उलगडून एक मुद्रा बाहेर काढून त्या द्वारपालाच्या
हातावर ठेवली. त्या द्वारपालाने ती मुद्रा उलट-सुलट करून निरखून पाहिली
आणि पुन्हा एकदा प्रश्नार्थक नजरेने विष्णुकडे पाहिलं. "ही मुद्रा
तुझ्याजवळ कुठून आली? तू कुठे...." . "नाही नाही, ही माझी मुद्रा नाही.
मला आमच्या राज्यात राजमुद्रा मिळवणंच शक्य नव्हतं. ही मुद्रा मला
शंकरशेटींनी दिली. ते आमच्या राज्यात व्यवसायासाठी आले होते. हे पहा
त्यांचं पत्र." असं म्हणून विष्णुने झोळीमधून एक पत्र काढून त्याचा हातावर
ठेवलं.

शंकरशेटींचं नाव ऐकल्यावर आणि ते पत्र वाचल्यावर त्या द्वारपालाच्या
चेहर्‍यावरचे भाव अचानक पालटले. "तुला शंकरशेटींनी पाठवलं आहे, हे आधीच
नाही का सांगायचंस? एवढ्या मान्यवर व्यक्तिकडून तू आला आहेस म्हटल्यावर तू
कोण, कुठचा हे प्रश्न आम्ही विचारलेच नसते".
"छे छे! शंकरशेटी तर मला पितृसमान आहेतच, परंतु माझी जन्मदात्री जन्मभूमी
ही मला मातेसमान आहे, तिचा प्रथमोल्लेख कसा बरं टाळता येईल? शिवाय माझे
गुरू, माझे पिता यांचेही माझ्यावर संस्कार आहेत. आणि त्यांवरूनच तर माणूस
ओळखला जातो!"
हे ऐकल्यावर त्या द्वारपालाच्या चेहर्‍यावर हसू उमटलं.
"हसलात का?"
द्वारपाल हसू आवरत म्हणाला, "अरे तू आत्तापासूनच अशी भाषा बोलतो आहेस!
तुला इथे येण्याचं प्रयोजनच काय! बरं असो. तुला इथे ही मुद्रा बाळगता
येणार नाही. इथे प्रत्येक विद्यार्थ्याकडे विद्यापीठाची अभिज्ञान-मुद्रा
असते. ती मी तुला आता देतो, आणि तुझी ही मुद्रा मी माझ्याकडे जमा करून
घेतो". असं म्हणून त्या द्वारपालाने ती मुद्रा एका लखोट्यामधे बंद करून
ठेवली, आणि त्याच्या कुटीमधे जाऊन एक अभिज्ञान मुद्रा घेऊन आला. त्या बंद
लखोट्यावर आता काही एक आकडा लिहिलेला विष्णुने पाहिला. ती अभिज्ञान मुद्रा
विष्णुच्या हातावर ठेवत द्वारपाल म्हणाला, "ही मुद्रा आता जपून ठेव. हीच
तुझी इथली ओळख. तुला यापुढे कोणत्याही सरकारी कामकाजासाठी ही मुद्रा लागू
शकते. कोणाही रक्षकाने तुला सुरक्षेच्या कारणास्तव ओळख विचारल्यास तू ही
मुद्रा दाखव, तुझं काम होईल. आता यापुढे तू विद्यालयाच्या प्राचार्यांना
भेट आणि त्यांना तुझं हे पत्र दे. ते माझ्या काही कामाचं नाही." त्याने
विष्णुच्या हातावर ते पत्र परत दिलं आणि त्याला विद्यालयाची वाट मोकळी
केली.

क्षणाचाही विलंब न लावता विष्णुने झपाझप विद्यालयाच्या दिशेने पावलं
टाकायला सुरुवात केली. पुढचा मार्ग विचारण्याचंही भान त्याला राहिलं
नव्हतं. त्याला आता फक्त त्या झाडींमधून पलीकडे दूरवर त्या तिमजली
इमारतीचं शिखर दिसत होतं. सकाळच्या उन्हाने त्याचे कळस असे झगमगत होते,
जणू काही तेच एक प्रकाशस्रोत बनून गेले होते, आणि दिव्याकडे झेपावणार्‍या
पाखराप्रमाणे विष्णु त्या प्रकाशकिरणांच्या दिशेने झेपावत होता. त्याचं
संपूर्ण आयुष्यच आता उजळून जाणार होतं.

गेले कित्येक दिवस विष्णु प्रवासच करत होता. मगधापासून बाहेर पडलेल्या
लोंढ्यांबरोबर मजल दरमजल करत तो निघाला खरा, पण त्याला इतरांच्या एवढा वेळ
कुठे होता. त्यामुळे एखाद्या ठिकाणी त्याच्या बरोबरचा लोंढा विश्रांतीसाठी
थांबला, कि तो त्याच ठिकाणी मुक्काम संपवून निघालेल्या दुसर्‍या
घोळक्याच्या शोधात फिरे, आणि असा घोळका सापडलाच, कि मग त्यांच्या बरोबर
पुढचा मार्ग चालू लागे. मनातली अस्वस्थता, अजूनही फारशा भूतकाळात न
गेलेल्या विषण्ण आठवणी आणि भविष्यकाळाची ओढ त्याला एका ठिकाणी स्वस्थ बसू
देत नव्हती. संपूर्ण प्रवासात त्या कटू आठवणी पुन्हा पुन्हा त्याच्या
मनामधे पिंगा घालत होत्या. 'काय चुकलं होतं माझं? काय चुकलं होतं माझ्या
वडिलांचं? त्य नीच धनानंदाच्या अन्यायी कारभारात आम्ही मुकाटपणे सगळं सहन
करून बसून रहावं की काय! शिक्षक हा समाज घडवतो. त्याच्या कलाकुसरीमधूनच
समाजशिल्प अवतरत असतं. पण त्या शिल्पाचा पायाच जर ढासळू लागला, तर त्याला
सावरणं हे शिक्षकाचंच कर्तव्य आहे. आणि तेच करायचा प्रयत्न केला माझ्या
वडिलांनी. प्रजा ही राजाची गुलाम नाही, तर राजा हा प्रजेचा गुलाम आहे. तोच
राज्याच्या प्रति उत्तरदायी आहे. हे सत्य सांगण्याचा प्रयत्न केला त्यांनी
- नगरजनांना, आणि खुद्द राजाला. पण ज्याची बुद्धी अहंकाराच्या कठीण
हृदयाखाली दबून गेली आहे, त्याला कसा पाझर फुटणार? काय करायला हवं होतं
त्यांनी? सशस्त्र सेना उभारून राजाला पदावरून खाली खेचायला हवं होतं की
काय? पण मग असे आपापसात राज्यपदासाठी लढणारे लोक आहेतच की. असं राज्य हे
दुर्बळांचं राज्य होऊन जातं. अश्या राज्याला कोणी वालीच उरत नाही. आणि
अश्या राज्याचे टपून बसलेले वैरी अश्या वेळी बरोब्बर बाहेर पडून लचके
तोडून घेतात. आमच्या कुटुंबाचे त्या दुष्ट राजाने असेच लचके तोडले.
वडिलांना तुरुंगात डांबून ठेवलं. ते जीवंत आहेत की नाहीत ही माहिती
कळण्याचीही मुभा ठेवली नाही. राज्यामधून आम्हाला बहिष्कृत केलं. आई आजारी
पडल्यावरही मला कोणी भिक्षा दिली नाही. ज्या ज्या माऊलींकडे भिक्षेसाठी
हात पसरले, त्यांच्या सर्वांच्या डोळ्यात आमच्यासाठी करुणा होती, पण
त्यांचे हात राज-भयाने बांधलेले होते'.
असे विचार करत करतच विष्णु मार्गक्रमणा करत असे. अश्यातच त्याला एका
घोळक्यामधे शंकरशेटी भेटले. तक्षशिलेमधले ते एक मोठे व्यापारी. त्यांनी
विष्णुला स्वतःच्या पालखीमधे बसवून घेतलं, आणि विष्णुचा पुढचा प्रवास सुकर
झाला.

"विष्णु... अरे विष्णुगुप्त...." ह्या हाकेने विष्णु एकदम भानावर आला.
मागे वळून बघितलं तर एक विद्यार्थी त्याच्या दिशेने धावत येत होता.
चेहराही ओळखीचा वाटत होता. तेवढ्यात नेत्रांना नेत्रांची ओळख पटली.
भावनावेगात दोघेही एकमेकांवर कडकडून आदळले. त्या विद्यार्थ्याला मिठी मारत
विष्णु म्हणाला, "इंदुशर्मा, किती रे बदललास!!"

(क्रमशः)

 - शंतनु