विष्णुगुप्त-भाग १

सकाळची सूर्याची कोवळी किरणं डोळ्यांवर येण्यापूर्वीच विष्णू झोपेतून जागा झाला. अजून सूर्योदय व्हायचा होता, तरी थोडासा उजेड होता. समोरच्या रस्त्यावर फार काही वर्दळ नव्हती. गवळ्यांचे पाय गोरसदोहनाकरिता गोठ्याकडे वळले होते. काही गृहिणी कमरेवर घागर घेऊन पाण्यासाठी सिंधूतीरावर निघाल्या होत्या. काही नागरिक सूर्यदर्शनाकरिता घराबाहेर पडले होते. कोंबड्याच्या आरवण्याखेरीज इतर पक्ष्यांनीही आपल्या कूजनाने सूर्योदयाची चाहूल दिली होती. त्या थोड्याश्या निळसर तांबूस प्रकाशानेही रात्री चमकणार्‍या तारामंडलांना आकाशातून नाहीसं करून टाकलं होतं. दूर पश्चिम क्षितिजावर अजूनही चंद्र फिकट मंद दिसत होता.

पण विष्णूला या कशाचंच काही नव्हतं. कशाने तरी झपाटल्यासारखा तो उठला. आपल्या अंगावरची वस्त्रं हातानेच वरच्यावर झाडल्यासारखी केली. बरोबर आणलेल्या तुटपुंज्या सामानाची झोळी त्याने खांद्यावर टाकली आणि तडक त्या धर्मशाळेच्या बाहेर पडला. आजूबाजूला एकवार नजर टाकून त्याने दिशांचा अंदाज घेतला आणि पश्चिम दिशेच्या रोखाने वाट फुटेल तशी पावलं टाकू लागला. इतर नगरजनांसाठी ती सकाळ नेहमीसारखीच होती,पण विष्णूच्या आयुष्यातला हा एक महत्त्वाचा दिवस होता. इतका अपार आनंद, एवढा उत्साह आणि इतकी पराकोटीला गेलेली उत्सुकता त्याने यापूर्वी कधीच अनुभवली नव्हती. शेवटी न राहवून त्याने समोरून येणार्‍या गृहस्थाला विचारलं,"महाशय, कृपया मला तक्षशिला विद्यालयाकडे कोणता मार्ग जातो, ते दाखवाल का?"

त्या गृहस्थाने एकदा विष्णूला डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळलं. अनेक दिवसांच्या प्रवासाने शिणलेली काया, जीर्ण वस्त्र, खांद्यावर अडकवलेली तुटपुंज्या सामानाची झोळी पण चेहरा मात्र अत्यंत तेजस्वी, [float=font:kishor;place:top;background:7C4916;color:D4A017;]शोधक नजर असलेले बोलके डोळे, तरतरीत नाक, मोठ्ठं कपाळ आणि डोक्यावरून रुळणारी शेंडी अश्या त्या किशोरवयीन मुलाला पाहून त्या गृहस्थाला मोठी गंमत वाटली.[/float] लगेचच योग्य त्या दिशेला त्याने अंगुलिनिर्देश केला. "धन्यवाद महाशय", विष्णू म्हणाला. "शुभास्ते पंथानः", त्या पथिकाने जाता जाता आशीर्वाद दिला. पण ते ऐकायला विष्णूला वेळ कुठे होता? त्याचा अंगुलिनिर्देश पाहताच विष्णूने त्या दिशेने झपाझप पावले टाकायला सुरुवातही केली होती.

तक्षशिला विश्वविद्यालय जसं जवळ येत चाललं तशी विष्णूच्या मनातली उत्सुकता आणखीनच वाढायला लागली. पावलांबरोबरच हृदयाच्या ठोक्यांची गतीही वाढली. डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक दिसू लागली."तक्षशिला! माझं किती दिवसांपासूनचं स्वप्न! या विश्वविद्यालयात केवळ आर्यावर्तातूनच नव्हे तर इतर राष्ट्रांमधूनही अनेक विद्यार्थी विद्यार्जनासाठी येतात म्हणे. इथले आचार्यसुद्धा अतिशय कुशल, बुद्धिवान, अनेक विषयांमध्ये पारंगत. कशी असेल इथली शिक्षणव्यवस्था? कसे असतील इथले विद्यार्थी? त्यांच्यामध्ये आपल्यासारखेच विचार असलेले, आपल्याशी मिळताजुळता स्वभाव असलेले मित्र आपल्याला मिळतील का? ह्या विद्यालयात सर्व चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचं शिक्षण एका वेळी कसं चालत असेल? इथे आचार्य तरी किती असतील?" अश्या कितीतरी प्रश्नांनी विष्णूच्या मनात काल रात्रीपासून कोलाहल माजवला होता आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळण्याची वेळ समीप येऊन ठेपली होती.

चालता चालता विष्णू नगराच्या बर्‍यापैकी बाहेरच्या बाजूला आला. त्याला आता बाकी कशाचं भानच राहिलं नव्हतं. आता त्याला समोर दिसत होतं ते फक्त एक मोठ्ठं प्रवेशद्वार आणि त्याच्यापुढे दाट झाडीतून गेलेली एक छोटीशी पायवाट. भराभर पावलं टाकत तो त्या प्रवेशद्वारापाशी येऊन थबकला.

त्याला पाहून द्वारपालांनी त्याला हटकलं, "काय रे, काय नाव तुझं?". पण विष्णूचं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं. समोरच्या दाट झाडीतून पलीकडे दूरवर तिमजली इमारतीच्या दिसणार्‍या एका कळसाकडे तो टक लावून बघत होता. द्वारपालांच्या त्या प्रश्नावर त्याच्याही नकळत त्याच्या भुवया उंचावल्या गेल्या, अभावितपणे ओठ उघडले आणि शब्द बाहेर पडले, "माझं नाव 'चाणक्य'. मी मगध देशातून इथे उच्चशिक्षणासाठी आलो आहे."