चमत्कार

चाटून लोणी माजणे बघा चमत्कार त्यांचा
लाटून सत्ता भामटे जनांत सत्कार त्यांचा

टाकून बाजारी पथारी घालती बाबा गंडा
खोटीच सिद्धी त्यांची नकली साक्षात्कार त्यांचा

प्रसवती जीव अफाट फौज जंतूंची वाढे
ही रसा सोसते मुकाट तो बलात्कार त्यांचा

उध्वस्त झालेले पडाव गाडते आता माती
वास्तव्यास फक्त घुबडे आणि घुत्कार त्यांचा

जागून घे हाती कृपाण सर्प हे निर्दाळाया
दंशात नाही घात तीव्र जरी फुत्कार त्यांचा