मी निसर्गप्रेमी.... मला लाकडावर निजविले
मी पुष्पवेडा.... मला फुलांनी सजविले
मला हौस गाठी मारायची
माणसे प्रेमाने जोडायची
प्रथमच मी मुक्त
मोकाट ऊधळायला
धुतल्या तांदुळासारख्या आयुष्याचे
ते भरलेले मडके..
फोडलेच त्रिवार,
मागे सांडत राहिली सोज्वळ धार
ही छीद्रे आप्तांनीच पाडलेली
माझ्या प्रामाणिकतेचा अश्म
त्यावर जगाची मनसोक्त तिलांजली
माझ्यासारखाच प्रत्येक दगड अस्वस्थ
कधी डोक्यावर बसेल
स्वार्थी हातोडा
अन होतील चिंध्या कायमच्या
काही अश्म
गंगेत सैर करतील
काही समुद्रात,
काही परत डबक्यात
आणि ते
पाणी स्वच्छ करण्याच्या नादात
बेरजेच्या गाठींच्या गुंडाळीमध्ये
स्वतःच गढुळ होऊन जातील.