निगरगट्ट आठवांचा चिखल..

पाऊस आला की मन आठवांनी ओलंचिंब होतं. तसं पाहिलं तर हरेकाच्या मनामध्ये आठवांचा पाऊस हमेशा बरसत असतोच...
अवकाळी बरसणाऱ्या काही आठवणी असतात तर काही भुरभुरत्या सरींसारख्या अंगावर सुखद शिडकावा करणाऱ्या. झिम्मड पावसागत काही फेर धरणाऱ्या तर काही झडीच्या धारांप्रमाणे नकोनकोशा. काही स्मृती श्रावण सरींसारख्या ऊन पाऊस खेळणाऱ्या तर काही उगाचच मनाच्या शिखरावर रेंगाळणाऱ्या. काही आठवांची इंद्रधनुष्ये असतात तर काही स्मृती काळ्याशार ढगांमधून दाटून येत असतात.
जितके पावसाचे प्रकार तितकी स्मृतिंची ही वलये... शांत जलाशयाच्या पृष्ठभागी थेंबाथेंबाने उमटणाऱ्‍या अगणित तरंगांसारखी... झाडाला वेढणाऱ्या वेलींसारखी... चिवट अन वटोळ्यांचा भुलभुलैय्या निर्माण करणारी.
वळवाच्या अचानक येणाऱ्‍या सरी बेभानपणे कोसळतात, तशाच काही कटू स्मृती अवचित मनावर बेफिकीर आघात करू पाहतात. त्या वळवाच्या पावसांत तोंड लपवायला जागा सापडत नाही. भेगाळलेल्या धरतीसारख्या त्या कोरड्या जखमा भरून येण्याऐवजी अधिकच चिघळू लागतात, रुंदावतात. कुठे कुठे ढेकळासारख्या उजाड झालेल्या काही निगरगट्ट आठवांचा पार भुगा होऊन चिखल होतो. आवरू म्हणता तो राडा हाती लागत नाही की वेचतादेखील येत नाही. त्यात रुतले की सुटका ती कसली नाहीच.
काही स्मृती अशा की जोरदार वारं वादळ घेऊन कडाडत अंगावर बरसणाऱ्‍या. लखलखत्या विजेचा आसूड ओढीत एकही कोपरा अंधारात न ठेवणाऱ्‍या, प्रत्येक कृष्णकृत्याचा ढळढळीत पुरावा हजर करणाऱ्‍या. त्या लखलखीत सत्याने डोळे दीपून जातात, तशा आठवांचा तो जळजळीत प्रकाश कधीच सहन होणार नाही इतका प्रखर अन् तेजस्वीसुद्धा.
काही पराभवाचे अन् नामुष्कीचे क्षण असेच पानोपानी ठिबकणाऱ्‍या पर्जन्यजलासारखे, शेवाळाला धरून ओघळणारे, झडीच्या सरींसारखे नकोनकोसे वाटणारे, सांदीकोपऱ्‍यातून स्फुंदत ठिबकणारे.
परंतु काही स्मृती इतक्या सुगंधी अन् प्रेमळ की पहिल्या पावसाच्या शिडकाव्यासरशी हवाहवासा मृद्गंध पसरविणाऱ्‍या. त्या गंधाची नुसती चाहूलही मनाला उभारी देणारी, सुखावणारी, भावविभोर करणारी. पावशाला जशी पहिल्या थेंबाची आस, तशीच ह्या मधुगंधी आठवणींची ओढ प्रत्येकाला लागून राहते. अशाच काही प्रेमळ सुसंवादाच्या प्रीतगंधी आठवणी म्हणजे एखाद्या एकांती गिरीशिखरावर विहरणाऱ्‍या जलदूताप्रमाणे आल्हादी... तिथे रेंगाळणाऱ्या नभातील अगणित सूक्ष्म तुषारांचा मोहक स्पर्श अंगावर शहारे उमटवणारा, शिर्शिरी आणणारा, रोमांच फुलवणारा इतक्या मधुर, सुरम्य स्मृती असतात त्या... ज्यांमध्ये तुम्ही आम्ही देहभान हरपून बसतो, येणाऱ्या प्रत्येक पावसांत भिजत राहतो. जसा आपण पाहू तसा पाऊस भेटतो, मनात दाटतो...
                                                               ( पूर्व प्रसिद्धी--"ऑक्सिजन"- लोकमत-  १६ जुलै १०.)