धर्म नाही, जात नाही, गोत नाही
भेट असल्यांशी कधी का होत नाही ?
घट्ट रोवावे मुळांना भावनांच्या
प्रेम झंझावात आहे, झोत नाही
एकदा ठरवून टाकावे सखीने
"ना" नसावी, मात्र छाती "हो"त नाही
स्पर्श मागे रेशमी होवून गेले
नेसल्या वस्त्रास तसला पोत नाही
स्वागताला ज्या शिव्या देतोस, मित्रा
तो जिव्हाळा "यो"त नाही, "ब्रो"त नाही
हात कानांवर जगाने ठेवले अन्
शोषितांचे चित्तही टाहोत नाही
काजव्याची काजवीला खूण आहे
ती दिव्याची मार्गदर्शक ज्योत नाही
केवढी विक्षिप्त आहे लोकशाही
तोंडपाटिल खूप, कोणी खोत नाही