पैलू मनाचे - काही उदास कण...

खमंग मिसळपाव खाता खाता कचकन दाताखाली खडा यावा अस झालं एकदम. नुकताच पाऊस पडून गेल्यानंतरची कुंद हवा. गाडीच्या खिडकीतून येणारा वारा मस्तमौला मनाला झकास्सपैकी उडवत होता. बाहेरची पळणारी हिरवीगार झाडे त्यांच्याबरोबर मागे घेऊन जात होती आणि मन जुन्या गाण्यावरन तरंगत तरंगत भुतकालात रमत होत. जुन्या गोष्टी आठवताना नकळत काही नकोश्या आठवणी डोकावू लागल्या आणि एकमेकांचे हात पकडून आ़ख्खी फौजच मैदानात उतरली. रंगेहाथ पकडली गेलेली थाप, कधीतरी उडवली गेलेली टर, मनात असूनही न देता आलेलं उलट उत्तर, चुकीचे अंदाज आणि माणसं, सगळ्यामध्ये असूनपण कधी अनुभवलेलं एकटेपण, स्वतःच्या बावळटपणाचे नमुने आणि लोकांनी आपल्या समक्ष त्याचा घेतलेला फायदा. च्यायला घुसमट नुसती.
या काळ्या ढगांना पळवू म्हटलं तर मनच फितूर. शक्य असत तर एक ब्रश घेऊन मेंदूतल्या वळ्या मधून या सगळ्या घटना खसखस घासून काढून टाकाल्या असत्या. उगाचच एक उदासी भरून राहिल्यासारखी वाटायला लागली. अ़ख्खा भुतकाळ आपल्याकडे पाहून खो खो हसतोय अस फीलिंग. डोकंच वैतागलं.. हाकलू या म्हटलं तर, जास्त जोमाने हल्ला. चहा पिताना कस, साय बाजूला करून प्यायच्या प्रयत्नात आधी सायच पिली जाते तसं. उगाचच चिडचिड.
आता हा कोहरा कमी होता की रेडिओ वर हेमंतकुमार बरसायला लागला " ये नयन डरे डरे, ये जाम भरे भरे.. "  आज सगळे मिळून रडवणार बहुतेक.    डोळे मिटून शांत बसून राहिलो. किती वेळ अश्या अवस्थेत होतो काय माहीत..    हळूहळू मनातली गर्दी कमी होऊ लागली.    मग मी पण जोर लावला आणि मनाला वर्तमानात ओढू लागलो. गुरुदेवांना साद घातली आणि एकदाची ती मळमळ थांबली. घरी आलो तर चिमण्या हातांची घट्ट मिटी मग उरली सुरली मरगळ पण कुठे टिकतेय.. म्हटलं मना, गंमतच आहे बाबा तुझी, मानलं..