गीता आणि निष्काम कर्मयोग

निसर्गधर्म:

दिवस उगवला जसा मावळे अस्तापाठे उदय। रिते चि भरते भरले सरते हा सृष्टीचा न्याय॥

उपजे ते ते विनाश पावे नाश पावले निपजे। अटळ गोष्ट ही म्हणुनी अर्जुना तुज हा शोक न साजे॥

मार्गाधारे जसे चालता मुळी न होय अपाय। किन्वा दिपाश्रये वर्तता ठेचाळेना पाय॥

तयापरी निज-धर्म लक्षुनी आचरिता व्यवहार। सकळ कामना सफळ अर्जुना स्वभावे चि साचार॥

योगी आणि कर्तव्यकर्म:

सुखी हर्षुनी जाउ नको तू दु:खी खेद न मान। करी धनू धरी गणुनी जयाजय लाभालाभ समान॥

स्व-कर्म करित जे स्वभावता पावे ते ते सोस। तुज ह्या रीती झुंज झुंजता मुळी न लागे दोष॥

नच कर्म-फली तुझा स्व-कर्मी असे मात्र अधिकार। फली न ठेवी हेतू न च करी अकर्म-अंगीकार॥

यशायशी सम-भाव ठेवणे हे योगाचे सार। साधुनी फली आस न धरिता करी कर्म साचार॥

सफल जाहले जरे घेतले कर्म सुदैवे हाती। येउनी किन्वा प्रत्यवाय ते पावले न परिपूर्ति॥

तरी पांडवा मुळी तोष वा विषाद न मनी आण। कर्म ब्रह्मी समर्पिता ते पूर्ण जाहले जाण॥

कर्माची अनिवार्यता आणि महती:

नियत-कर्म तू करी कर्म ते थोर अकर्माहून। देह-धारणा ती हि घडेना तुज कर्मावाचून॥

तरी प्रसंगे प्राप्त-कर्म ते करी संग सोडून। स्व-कर्म करणे नि:संगपणे ही योगाची खूण॥

स्व-कर्म करिता कर्म-मुक्तता सहज तुला लाभेल। म्हणुनी पाहे तुज कर्म चि हे मोक्ष-पदा नेईल॥

तुटे जेधवा स्व-कर्म-सेवा महायज्ञ संबंध। पडे तेधवा जगात जीवा हा सान्सारिक बंध॥

स्व-कर्म-सेवा हा नित्य नवा महायज्ञ जाणावा। नसे वानवा हा चि मानवा मोक्ष-सुखाचा ठेवा॥

अगा, जया जे विहित तत्त्वता ईश-मनोगत ते च। म्हणुनी सर्वथा ते आचरिता भेटतो चि तो साच॥

विहित कर्म जे ते चि अर्जुना एक जीवनाधार। सर्वात्मक जो मी त्या माझी तीच अर्चना थोर॥

सर्वात्मक जो तया पूजिता स्वकर्म-कुसुमी येथ। पूजन ऐसे तया देतसे परम तोष निभ्रान्त॥

 ज्ञानी आणि कर्मविचार (संतधर्म):

ऐक अर्जुना, मूर्ती या जगी लाहुनी नर-देहाची। ते मूढमती जे नर खंती बाळगिती कर्माची॥

की कर्म-बळे सिद्धी पावले जनकादिक ते पाही। लोक-संग्रही दृष्टी ठेवुनी करी कर्म ते तू हि॥

सकळ-कामना-रहित अर्जुना झाले पूर्ण कृतार्थ। लोक-संग्रहास्तव उरे पाहा कर्तव्य तया ही येथ॥  

डोळस जेवी मार्ग दाखवी अंधा हाती धरूनी। प्रकट करावा अज्ञ-बांधवा तेवी धर्म आचरूनी॥

श्रेष्ठ आचरे ते चि अनुसरे जन हि सकळ सामान्य। प्रमाण मानी जे तो ते ते तया होतसे मान्य॥

असे स्वभावे असे म्हणुनी ते नच द्यावे सोडून। संत श्रेष्ठे करावे चि ते येथे आवर्जून॥

दीप-संगती सहजे होती जसे गृह-व्यापार। तसा वावरे देही पाही योग- युक्त साचार॥

संग सोडुनी करी जो कर्मे ब्रह्मार्पण-बुद्धीने। पापे नर तो लिप्त न होतो जैसे कमल जलाने॥

[श्री गीता-तत्व-सार,  स्वामी स्वरूपानंद (पावस) कृत नित्यपाठाची पुस्तिका (मूल्य रू. ५) यातील हे वेचे . गीतेतील कर्मविचारामागच्या व्यापक दृष्टीकोनाचा बोध व्हावा, काही चिंतन मनन घडावे आणि दिशाभूल वा बुद्धिभेद टळावा या हेतूने दिले आहेत. ]

- हरिभक्त