एक होता शिंपी (एक छोटीशी गोष्ट)

एक होतं आटपाट नगर. त्यात होता एक शिंपी. त्यानं नुकताच बापाचा व्यवसाय सांभाळला होता. आणि हळूहळू शिंपी काम सुरू केलं होतं.
जीवन त्याचं कसं छान चाललं होतं. नवनवीन, वेगवेगळे कपडे तो शिवत होता. आणि चरितार्थही व्यवस्थित चालत होता.
पण एवढ्यात झालं काय की त्याला टोचली एक सुई. त्याच्या हाताखाली काम करणारी एक छोटिशी सुई.
झालं. तो भडकला. एवढिशी सुई, वाकड्यात जातेच कशी?
त्यानं दरडावलं सुईला.. झापलं मस्त धरून.
पण सुई म्हणाली "मी तर पडले सरळ-सोट. बोलून चालून एक सरळ-टोकदार सुई. मी कशाला जाऊ वाकड्यात?
तुम्ही शिवता तिथं पोचणं, टाके मारणं इतकच तर माझं काम. "
पण शिंपी काही ऐकेना. त्यानं ठरवलं "देऊ हिला हाकलून. घेऊ दुसरी एखादी मस्त एक छानशी, आज्ञाधारक बाहेरून. "
तसा त्यानं दिलं तिला काढून, आणि तडक गेला सुयांच्या राणीला भेटायला सुयांच्या राज्यात.

राणीनं त्याचं छानसं आगत-स्वागत केलं. येण्याचं कारण विचारलं.
तसं त्यानं आधीच्या सुईची तक्रार केली; तिच्या राज्यातल्या एखाद्या नवीन कामसू सुईची मागणी केली.
राणी सुज्ञ होती. ती मनाशीच हसली. आधीच्या सुईला तिनं ठेवून घेतलं दुसऱ्या कामासाठी. आणि दुसरी आणखी एक
नावाजलेली सुई दिली पाठवून शिंप्यासोबत.

शिंपी झाला कामावर रुजू, नवीन, दुसऱ्या सुईसोबत. मस्त छान जीवन-क्रम सुरू झाला त्याचा.
रोज नवीन कपडे नवीन रचना, डिझाइन्स. आता त्याचं आणखी कौतुक होऊ लागलं.
आधीच्या सुई पेक्षा हिनं जवळ जवळ दुप्पट दिवस, दोनेक वर्ष काम केलं होतं.
त्याचा सराव दुप्पट झाला होता.
काही दिवस नीट गेले. पण छट.....
ही सुई सुद्धा टोचलीच एक दिवस. त्याच्या हाताखाली काम करणारी एक छोटिशी सुई.
झालं. तो भडकला. एवढिशी सुई, वाकड्यात जातेच कशी?
त्यानं दरडावलं सुईला.. झापलं मस्त धरून.
सुईनं काही बोलायच्या आतच त्यानं ह्या सुईला सुद्धा काढून टाकायचं ठरवलं.
तसा त्यानं दिलं तिला काढून, आणि तडक गेला सुयांच्या राणीला भेटायला सुयांच्या राज्यात.
जाताना त्याला एक वाटलं "चला एक बरं झालं. निदान हिनं पहिल्या सुई पेक्षा जरा चांगलंच काम केलंय.
थोडे जास्त दिवस आहे ती. तिचं स्किल बरं होतं पहिलीपेक्षा. "

राणीनं त्याचं पुन्हा छानसं आगत-स्वागत केलं. येण्याचं कारण विचारलं.
तसं त्यानं दुसऱ्या सुईची तक्रार केली; तिच्या राज्यातल्या एखाद्या नवीन अधिक कामसू सुईची मागणी केली.
राणी सुज्ञ होती. ती मनाशीच हसली. दुसऱ्या सुईला तिनं ठेवून घेतलं दुसऱ्या कामासाठी. आणि तिसरी आणखी एक
नावाजलेली सुई दिली पाठवून शिंप्यासोबत.

शिंपी झाला कामावर रुजू, नवीन सुईसोबत. तिसऱ्या सुई सोबत. मस्त छान जीवन-क्रम सुरू झाला त्याचा.
रोज नवीन कपडे नवीन रचना, डिझाइन्स. आता त्याचं आणखी कौतुक होऊ लागलं.
पहिल्या सुई पेक्षा हिनं जवळ जवळ दिवस तिप्पट दिवस, तीनेक वर्ष काम केलं होतं.
काही दिवस नीट गेले.
त्याचा एकूण सराव पाचेक वर्षांचा झाला होता.
पण छट.....
ही सुई सुद्धा टोचलीच एक दिवस. त्याच्या हाताखाली काम करणारी एक छोटिशी सुई.
झालं. तो भडकला. एवढिशी सुई, वाकड्यात जातेच कशी?
त्यानं दरडावलं सुईला.. झापलं मस्त धरून.
सुईनं काही बोलायच्या आतच त्यानं ह्या, तिसऱ्या सुईला सुद्धा काढून टाकायचं ठरवलं.
तसा त्यानं दिलं तिला काढून, आणि तडक गेला सुयांच्या राणीला भेटायला सुयांच्या राज्यात.
जाताना त्याला एक वाटलं "चला एक बरं झालं. निदान हिनं दुसऱ्या सुई पेक्षा जरा चांगलंच काम केलंय.
थोडे जास्त दिवस आहे ती. तिचं स्किल बरं होतं दुसरीपेक्षा. "

पुन्हा तोच प्रकार.
राणेनं ह्यावेळेस थोडासा गंभीर चेहरा केला. पण त्याला दिली आणखी एक नवी सुई. चौथी सुई.

पुन्हा एकदा छान काम सुरू. अधिक नवीन दिझाइन्स. अधिक सुबक शिवण.
ह्या सुईनं तर चक्क अगदी सुरुवातीला जी सुई होती तिच्या चौपट दिवस, चारेक वर्ष काम केलं होतं.
सारं कसं छान झालं होतं.
त्याचा एकूण सराव नउ-एक वर्ष झाला होता.
शिंप्यानं खुश होउन सुयांच्या राणीला धन्यवाद म्हणण्यासाठी पत्र लिहिलं.
आणि दर वेळेस नवीन सुइचं स्किल अधिकाधिक जे वाढतय त्याबद्दल आभार व्यक्त केले.
जसं जसं काळ जात होता, तसं तसं त्या शिंप्याच्या मते त्या सुयांचं स्किल सुधारत होतं.
स्वतःच्या सुया हाताळाण्याबद्दल त्याला अफाट अभिमान वाटत होता.
प्रचंड खुश होता तो स्वतःच्या हाताळणीबद्दल.
सुयांची वागणुक सुधारतिये याबद्दल त्याला खुपच छान वाटत होतं.