एक अक्षर उमटावे अंतरीचे,
एक शब्द पोचावा सार्थ,
एक वाक्य यावे संवादी त्या ह्रदयाला,
एक परिच्छेद व्हावा माणसांचे प्रश्न मांडणारा
नेमका पण असोशीने,
एक लेख साधावा सुबद्ध
जो आधारभूत जाणीवांना
एक प्रकरण जुळून यावे साकल्याने नि सातत्याने प्रवाही
पण चिरंतन संकल्पनेचे,
एक ग्रंथ साधावा जीवनांना उजळून टाकणारा
काही काळ तरी
दुसरा सरस पण तीच शाश्वत मूल्ये सांगणारा येईतो
मग माझ्या अस्तित्वाचा कुठलाही आग्रह न धरता
निघून जाईन नि:शंक मनाने