घनश्याम सुंदरा

पहाट नेहमी कसा नवीन तजेला घेऊन येते! रात्रीचा अंधार कालच्या सगळ्या विवंचना, दु:खे घेऊन दूर पळून गेलेला असतो. त्या काळज्यांच्या सावल्या भले नंतर पुन्हा येवोत. पण उन्हाबरोबर परत येऊन त्यांनी मनाला अजून तरी झाकोळून टाकलेले नसते. तेव्हा हा वेळ चोवीस तासांमधला एकदम टवटवीत आणि बिनधास्त वेळ असतो. जो काही उद्योग आपण ह्या प्राईम टाईम मध्ये करू, त्यात प्रचंड सुख मिळते. कारण सुखाला अधूनमधून छेद देणाऱ्या कटकटींचे तात्पुरते का होईना, पहाटेच्या वेळेत विस्मरण झालेले असते. "घनश्याम सुंदरा श्रीधरा, अरुणोदय झाला.... " मंगल वातावरणाकडे नेणारा हा पहाटेचा जादूभरा मार्ग!

काही जणांना पहाटेचा वेळ साखरझोपेत घालवून रात्रीची विश्रांती आणखी खेचायची असते. त्यात त्यांना जर सुख असेल, तर असो. ह्या सर्वोत्तम वेळी बिछान्यावर लोळत न पडता, घरापासून जरा दूर मोकळी हवा भरभरून घेत, पाखरांची गाणी ऐकत, आळसावलेले शरीर ताजेतवाने करून नवीन दिवसाच्या रामरगाड्याला सामोरे जाणे मी पसंत करतो. जवळच्या उद्यानात गोलाकार मार्गावर जलद चालीने दहा बारा फेऱ्या मारायच्या. तिथल्या व्यायामाच्या जागेत काही योगासने करून शरीरासोबत मनालाही ताजेतवाने करायचे. ह्या नित्याच्या फेरीत कित्येकदा लिखाणाची नवी बीजे वर येतात. काही न सुटलेल्या तिढ्यांच्या गाठी उकलल्या सारख्या वाटू लागतात.

माझी आई देखील पहाटे उठून माझ्याबरोबर बाहेर यायला उत्सुक असते. तिच्या ८४ वर्षे वयोमानानुसार, माझे फिरणे होईपर्यंत ती हळूहळू चार गोल पुर्ण करते. मग मी व्यायाम करीत असतांना उद्यानातल्या बाकावर पक्षी पाहत बसून राहते. अशा उत्साहाने रोज नवा दिवस सुरू होतो. नेहमीच्या ह्या दिनक्रमामुळे, आजवर सकाळच्या ह्या वेळी आजुबाजुच्या वातावरणात जणू रसरशीत चैतन्याचे सडे शिंपले आहेत असे वाटायचे.

आज खरं तर माझा नेहमीप्रमाणे फिरायला जायचा मूड नव्हता. काल मुलाला बजावून सांगितले होते, निदान आज तरी रात्री लवकर घरी ये, आणि अभ्यास करत बस. बारावीची परिक्षा जवळ आली आहे. मित्रांबरोबर बाहेर उंडारणे बंद कर. पण ऐकतील तर ती मुले कसली? आला नेहमीप्रमाणे उशीरा आणि झोपून गेला. राग आणि हतबलता ह्यामुळे सकाळी फिरायला जावेसे वाटत नव्हते. तरीही नेट लावून गेलो. पण आजची सकाळ एक वेगळीच कहाणी दाखवायला आली असावी. नंतर चिरफाड करून देखील त्या कोणा एकाच्या विमनस्कतेवरचे पडदे उघडू शकले नाही. उरले फक्त एक मळभ. नेहमी उत्साही असलेल्या ह्या समयाने, आज उदास मळभाचे पांघरूण ओढवून घरी पाठवले.

ट्रॅकवर फिरतांना एका गोलाकार बाकावर तीन तरुण मुले बसलेली दिसली. मधल्या टेबलावर दोन तीन बाटल्या, काही चखण्याची पाकीटे वगैरे सामग्री होती. तिथून माझ्या जलद चालीने जाता जाता, नजरेने व्हीस्कीची बाटली आणि सिगरेटचा तीव्र वास व धूर नेमका टिपला. ह्या वेळी नेहमी दिसणारे म्हणजे लगबगीने कामावर निघालेले लोक, शाळेत जाणारी मुले वगैरे. सकाळच्या मंगल वेळी ओली पार्टी करणारे कोण हे रांगडे? पुर्वी कॉलेज होस्टेलवर रहायचो, तेव्हा एक मित्र होता. सकाळी उठल्याबरोबर दुसरे काही करण्याआधी तो सिगारेट शिलगवायचा. सिगारेट सारखे घाणेरड्या वासाचे धुरांडे, जाग आल्या आल्या तोंडात कोंबणे म्हणजे कमालीचे अस्वच्छपणाचे लक्षण. व्हीस्कीशी माझे वैर जरी नसले, तरी सकाळी सहा वाजता बागेत जर कोणी असली पार्टी करतांना दिसला, तर जगातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी संपुष्टात आल्या असाव्यात असे वाटते.

नंतरच्या फेरीत जरा बारकाईने पाहीले. कोण हे प्राणी? इथल्या टिपीकल तरुणांसारखेच दिसत होते. दोघांची स्थूल अंगकाठी, गबाळे टीशर्ट, ढगळ अर्धी चड्डी, विस्कटलेले केस. चिनी भाषेत तिरमिरीने कसल्याशा गप्पा करीत होते. तिसरा मात्र इथल्या नॅशनल सर्विसचा पूर्ण कडक गणवेष घालून होता. त्याचेही ह्या दोघांच्या साथीला नाममात्र पिणे सुरू होते. तो बोलतही नव्हता. मध्येच तो एक फेरी मारून पुन्हा ह्यांच्यात येऊन बसला. तो पर्यंत बाटली जवळ जवळ पूर्ण संपली होती. ह्या दोघांची काही तरी प्रॉब्लेमवर चर्चा सुरू असावी. नॅशनल सर्विसवाला जिवाभावाचा दोस्त असल्यामुळे त्याला ह्यांच्या अडचणीच्या वेळेस जवळ रहायचे असावे. मला कळेचना, अशी काय परीस्थिती असेल? हे लोक मंगलसमयी तीर्थप्राशन करून कोणत्या देवाचे आशिर्वाद मागत असतील?

व्यायाम संपल्यावर मी आणि आई त्यांच्या टेबलपासून जरा दूरच्या बाकावर बसलो होतो. दोघांचा नॅशनल सर्विसवाला मित्र आणखी एक फेरी मारत होता. ह्या जाड्यांचे पिणे आता संपले होते. त्यांच्या अगम्य चर्चा थंडावल्यासारख्या वाटत होत्या. त्यातल्या एकाने अचानक दुसऱ्याला घट्ट मिठी मारली, आणि हमसाहमशी रडू लागला. दुसरा त्याच्या पाठीवर, केसांवर ममतेने हात फिरवीत होता. खांद्यावर पडणारे मित्राचे कढत अश्रू ह्याच्या डोळ्यात जमा व्हायला लागले. आम्ही होतो त्या अंतरावरून देखील मला त्याचे ओक्साबोक्शी रडणे ऐकू येत होते. कदाचित माझ्या आईला रडण्याचा आवाज ऐकू आला नसावा. रडणारा तरूण पाठमोरा असल्याने तिला चेहरा दिसतही नव्हता. तिने येवढेच पाहिले, दोन तरूण मुले मिठीत एकमेकांना गोंजारीत आहेत. तिला काय वाटले असेल कोण जाणे! तिने माझ्याकडे शरमेने पाहून "इथे कसले कसले विचीत्र प्रकारचे लोक असतात! " असा भाव दाखवला. मला मात्र त्याचा हंबरडा ऐकू आल्यामुळे एकदम भरून आले. काय अडचण असेल त्या बिच्याऱ्याची? नोकरी गमावली असेल, की कोणी जिवाभावाचे सोडून गेले असेल? की बायकोचे भांडण घटस्फोटापर्यंत आले असेल? सकाळच्या प्रहरी नशेच्या बाटलीत दु:ख बुडवायचा प्रयत्न करण्याखेरीज दुसरा काही मार्ग त्याला सुचला नसेल? त्या जाड्या मित्रालाही किंवा त्या शुद्धीत असलेल्या नॅशनल सर्विसवाल्याला देखील नाही? आणि अशा प्रसंगी घरच्या लोकांच्या ऐवजी मित्रांचे पाठबळ त्याने का घेतले असावे?

आधी बजावून देखील मुलगा काल रात्री उशीरा घरी आला, म्हणून मी खूप वैतागलो होतो. इतका, की आजच्या प्रसन्न सकाळी देखील अधूनमधून ती बोच दुखवीत राहीली. एकीकडे माझा फुटकळ इगो मी गोंजारत बसलो होतो. एकीकडे हे दोघे न जाणे कशा प्रकारचे भिषण दु:ख एकमेकांमध्ये कवटाळून रडत होते!

प्राजक्ताचा सुवास उधळत आलेली घनश्याम सुंदराची सकाळ, उमलत्या उन्हात मलूल झाली होती.