बालकांचा चिम्मणचारा

बालकेच ती, खेळणारच. जन्मजात स्वभावच त्यांचा, इकडे तिकडे हुंदडण्याचा.
त्यामुळे त्यांनी पोटभर खाल्ले नाही की आईच्या पोटात कालवाकालव होते. मुळात
बालकांचे वयच खाण्यापेक्षा खेळण्याकडे ओढा असणारे. त्यांनी पुरेसे म्हणजे
एक चपाती, थोडी भाजी, वाटीभर वरणभात वगैरे खाल्लं नाही म्हणजे ती मुलं
अर्धपोटी खेळत आहेत हा समजच चुकीचा!
खरे तर तासाभराने घासभर 'चरण्याची'
बालकांची मूळ वृत्ती असते. परंतु आपण मोठी माणसं उगाचच त्यांचे खाणे वेळेत
अन् वजनमापात तोलत बसतो. त्यांना वेळेनुसार खायला देण्याऐवजी वेळोवेळी
द्यावे लागते तरच ते पचते, अंगी लागते. कारण त्यांच्या जठराचा आकार एकाच
वेळी एक पोळी अन् वरणभात इतकं अन्न साठवून घुसळण करण्या इतका सक्षम नसतो.
जसजशी वाढ होईल तशी पचन संस्थेची वृद्धी होत जाते. तरीही बालकांच्या अशा
वाढीच्या वयात योग्य ते पोषकांश शरीराला प्राप्त करुन देणं हेच खरं
पालकांचं काम.
काही बालकांना भूक लागल्याची जाणीव होते, कळते. मग ते खाऊ
खाऊ करतात. तर काहींना भूक लागलीय याची नीटशी जाणीव न समजल्यामुळे ते
रडतात, चिडचिड करतात. अशा वेळी पालकांचाच कस लागतो की बालकाला भूक लागलीय
की झोप? भुकेच्यावेळी त्यांना आवडणारा, भावणारा पदार्थ लगेच असेल तर मुलं
पोटभर जेवतात. ही त्यांची मानसिकता सवयीनं अन् अनुभवानं शिकण्याची गोष्ट
आहे. फार थोडी मुलं 'मला खूप भूक लागलीय, जेवायला दे.' असं ओरडून सांगू
शकतात. हे पालकांनी लक्षात घ्यायला हवं. काही बालकांना मोठे झाले तरी 'हा
घास चिऊचा, हा घास काऊचा' असं करीत भरवावं लागतं. तर काहींना काहीही
चारण्यासाठी मारावं लागतं. जितक्या बाललीला तितक्या खाऊ घालण्याच्या कला
अंगिकाराव्या लागतात.
या वयातील (२ ते ५) बालकांना अधिक कॅलरीजची
आवश्यकता भासते. कारण ते खेळकर असतात. त्यांचे शरी जादा ऊर्जेची मागणी करीत
असते. शारीर क्रियांतील चयापचयाचा वेगही इतरांपेक्षा अधिकच असतो. अशामुळे
योग्य तितके पोषकांश शरीराला मिळाले नाहीत तर कुपोषण होते. साधारणतः
बालकांना पुढीलप्रमाणे कॅलरीजची आवश्यकता असते-
1) वय- १ ते ३ वर्षे
वजन- १२ कि.ग्रँ. (आसपास)
उष्मांक- १२२० किलोकॅलरीज.
2) वय- ४
ते ६
वजन- १९ कि.ग्रँ. (आसपास)
उष्मांक- १७२० किलोकॅलरीज.

पुढील
वेळापत्रकानुसार बालकांचा आहार तक्ता आखावा-

सकाळी ६.३० दूध

७.३० नाष्टा- रवा, उप्पीट, गोड चपाती.
९.००
प्रोटीनेटेड मिल्क
११.०० गोड बिस्किटे

दुपारी
१२.३० जेवण- पोळीभाजी, वरणभात, कोशिंबीर किंवा लस्सी

३.०० फ्रुट ज्युस किंवा मिल्क शेक
४.०० हॉर्लिक्स, कॉम्प्लँन, बूस्ट इ. एनर्जायझर द्यावे.
७.०० जेवण- मऊ
चपाती, हेल्दी वेफर्स, इडली, डोसा, उत्तप्पा इ.

रात्री ९.०० दूध.

ही
सारणी आदर्श आहारपद्धत म्हणून सुचविली जाते. यामध्ये बालकांच्या सवयीनुसार
वेळांमध्ये बदल केला जाऊ शकतो. तसेच चवीनुसार विविध पाकसिद्धी देखील बदलता
येऊ शकतात.

पूर्वी आमची आजी वा पणजी आमच्या खिशात सुकामेवा (बदाम,
काजू, बेदाणे, खारीक खोबरे इ.) किंवा रानमेवा (फळे, शेंगा) यांचा
'चिम्मणचारा' भरायची. येता जाता आम्ही तो हादडत असू. त्यामुळेच बहुदा आम्ही
धट्टेकट्टे निपजलोत!
आजच्या इन्स्टंट जमान्यात हा चिम्मणचारा कालबाह्य
झालाय. तरीही बदलत्या काळानुसार सवयी बदलाव्याच लागतात. म्हणून बालकांच्या
पुढ्यात कुरकुरे, वडापाव, भेळ असला निकृष्ट चिम्मणचारा न ठेवता त्यांना
आवडणारे ड्रायफ्रूट्स (अक्रोड, प्रेस्ड अंजीर, आंबावड्या, चारोळ्या, पिस्ते
इ.) किंवा सिजनल फळे, कंदमुळे (गाजर, रताळे, बीट इ.) हे द्यावे.
बालकांच्या कलाकलाने त्यांना व्यवस्थित खाऊ घातल्यास ते किलोकिलोने वाढतील
यात शंका नाही...