भेट

     अखिल नीट जेवला नाही. तो सरळ स्वतःच्या खोलीमधे आला. कानात हेडफोन घातले आणि मोबाईलवरची गाणी सुरु केली. गाणी केवळ कोणतेतरी सूर मेंदूत निनादत राहावेत म्हणूनच होते, हे त्यालाही माहीत होतं. मेंदू विचारांमुळे फार तापू नये, हा त्याचा हेतू होता. डोकं तापलं की आपल्याकडून फार कामं होत नाहीत, हे अखिलला पक्कं ठाऊक होतं. महाविद्यालयात असला तरी त्यानं स्वतःला प्रयत्नपूर्वक शांत केलं होतं.  काही अनुभवांवरून डोकं तापवून न घेण्याची त्यानं स्वतःला सवय लावली होती. त्या गाण्यांमुळे मनातले विचार काही संपणार नव्हते. खरं तर त्या सुरांसह विचार करता यावा, असंच त्याच्या मनाचं नियोजन होतं. विचार मुख्य रस्त्यावर आणि काठानं सूर. नादात विचार. विचारांचा नाद.
      नाद सुरु झाला. एक एक गोष्ट तो आठवू लागला... 
      
      दहा बारा दिवसांपूर्वी संध्याकाळी पाचला आपण नेहमीप्रमाणे 'लॉग इन' झालो. 'चॅट रुम'मध्ये गेलो. इकडे तिकडे 'क्लिक'  करायला सुरुवात केली. दोन चार जणांशी फालतू टाईमपास केला. रुममधल्या तीन कुचाळक्यांमध्ये, दोन भांडणांमध्ये भाग घेतला. राहुल्या, संज्याची वाट पाहात होतो. या दोघांमुळे मस्त टाईमपास होतो. एक आयडी चमकला. दोन-तीन आयडींना आपण 'हाय' पाठवलं होतं. त्यांच्यापैकी एकाचं उत्तर होतं. आपण 'आयडी' उघडला. संवाद सुरु झाला.
"थँक्स फॉर रिप्लाय. मायसेल्फ निखिल. यूअर नेम प्लीज."
"विदिशा."
"माय एज इज ट्वेंटी. यूअर?"
उत्तर नाही.
"यूअर?"
उत्तर नाही.
"ओके. नो प्रॉब्लेम. आय गो टू कॉलेज. यू ? 
उत्तर नाही.
अधून मधून काही आयडी त्रास देत होते. त्यांना झापण्यात आपली पाच मिनिटं गेली. 
'च्यायला, आता हिला झापावं का? बोलायचं आहे की नाही? बिझी असेल तर तिने सांगायला पाहिजे...'आपण वैतागलो.
"ओके. युअर हॉबीज? आय लाईक म्युझिक, सिनेमा."
"आय आल्सो लाईक."
हुश्श. आलं बुवा उत्तर एकदाचं.
"युअर फेवरिट हीरो?"
उत्तर नाही.
"ओके. फेवरिट कलर...?"
"यलो."
"सेम हिअर.."
 आपण स्क्रीनवर किंचाळलो आणि तेवढ्यात लाईट गेले. तिथल्या तिथे तो कॉम्प्युटर फोडावा, असं आपल्याला वाटलं. लाईट गेले म्हणून आपण विचारलं की बॅकअप वगैरे आहे का.   लाईट नसते गेले तर आपल्याला काय घेणं होतं की कॅफेमधे बॅक अप आहे की नाही. अर्धा तास वाट पाहून शेवटी आपण निघालो. नाक्यावर एक ' विल्स' घेतली आणि घरी आलो... अगदीच छोटी ओळख. यावेळी जरासुध्दा जास्त बोलता आलं नाही. नाव, सिनेमा आणि रंग.सगळ्या ऑनलाईन ओळखी याच विषयांवरुन सुरु होतात. पोरगी तर भेटली. राहुल्या, संज्या तोपर्यंत आले नव्हते. मरु देत. त्यांना सारखं सारखं काय चाटायचंय?
 
दुसऱ्या दिवशी आपण पाचलाच 'लॉग इन' झालो. चान्स घेऊन पाहिला. पुन्हा असली तर असेलही ती.
"हाय..."
तिकडून 'आयडी' चमचमला. जबरदस्त. केवढा आनंद झाला होता ! 
आपण सांगितलं, 
"सॉरी, काल अचानक लाईट गेले.."
"ठीक आहे."
वा. या उत्तराने बरं वाटलं. आपण कालचाच सिनेमाचा मुद्दा सुरु केला. सिनेमाजवर बऱ्याच गप्पा झाल्या. हा हीरो, तो हीरो, ही हीरॉईन, ती हीरॉईन.. मस्त वाटलं. बरीच बोलली पण आपल्या लक्षात एकच मुद्दा राहिला. ती ते सिनेमा पाहात नाही जे आपण पाहातो.  आमीर खान आवडतो, म्हणाली. सिनेमावरुन गाडी काही पुढे सरकली नाही तिची. मला सरकवायची होती. अब नही, तो फिर कभी. गप्पा झाल्या, हे महत्त्वाचं. मुलीशी गप्पा, हे महत्त्वाचं. झकास. आपली ती संध्याकाळ आणि रात्र म्हणजे...
     आज जवळजवळ दहा दिवसांनी ऑनलाईन भेटली. आधीच्या चॅटमध्ये म्हणालीच होती की, आठ दहा दिवसांनी ऑनलाईन असेन. आपण आठव्या, नवव्या आणि दहाव्या अशी तीनही दिवशी 'लॉग इन' करुन पाहिलं होतं. दहाव्या दिवशी होती. सिनेमा गप्पा पुन्हा सुरु झाल्या. त्या आपणच सुरु केल्या. मागच्या वेळच्या सिनेमांवरच परत बोलणं झालं. थोडं नाटकावरही. आणखी विचारलं असतं ना नाटकाबद्दल तिनं तर आपण 'मेसेज' मिळालांच नाही, असं नेहमीप्रमाणे सांगितलं असतं. आपल्याकडे 'सोल्यूशन्स' बरीच आहेत. पण आणखी कसले कसले सिनेमा पाहतेस, हे विचारता आलं नाही. विचारता आलं असतं तर आणखी भरपूर खूप काही बोलता आलं असतं. मग, आपण रंगावरुन बोलायला सुरुवात केली. पिवळा रंग आवडतो असं सांगितलं होतं तिनं. आज निळ्या रंगाची भर तिने टाकली. आपण कॉलेजेसबद्दल बोलत गेलो तेव्हा ती नुसतीच ऐकत होती, स्वतःहून काहीच सांगत नव्हती. मधेच केव्हातरी इकॉनॉमिक्स चा विषय निघाला तेव्हा ते आवडतं, असं म्हणाली. नाही म्हणायला आपल्या कॉलेजचं नावही तिने घेतलं एकदा. आपण सामोश्यांबद्दल बोललो तेव्हा तिच्याच तोंडून ' स्वाद' चं नाव आलं.  तिथले सामोसे बरेचदा खाल्लेत, म्हणाली. ' स्वाद'  हॉटेलच्या पलीकडच्या गल्लीतून आपण शेवटपर्यंत गेलो की, जुनं गुलमोहराचं झाड लागतं, हे तिला माहीत आहे. कुठे राहतेस, हे विचारल्यावर तिने आपलाच एरिया सांगितला. पण आणखी काही सांगितलं नाही. आपणच खूप बोलत होतो. ती खूप ऐकत होती... 
     नक्कीच. नक्कीच ती आपल्याच भागात राहते.
     शेवटी, भेटण्याबद्दल विचारलंच आपण धाडस करुन. गॅरंटी नव्हतीच. तिसऱ्याच चॅटमधे आपण हे विचारत होतो.  दोन-तीनदा गप्पा झाल्यावर लगेच काही कोणी भेटायला येत नाही. एरिया आपलाच आहे म्हटल्यावर आपण जास्त विचार केला नाही. थोडी खात्री होती. बऱ्याच गोष्टी आपल्यात सारख्याच आहेत. 
फार फार तर 'नाही' म्हणाली असती. इथे कोण मागे लागणार आहे?
विचारलं आणि चक्क 'हो' म्हणाली. कुठे? विचारलं तर 'रसना' हॉटेल म्हणाली. माझ्या मनात 'रसना'च होतं.   'उद्या संध्याकाळी सहा?' विचारलं तर 'काही प्रॉब्लेम नाही' म्हणाली. शेवटी महत्त्वाचा प्रश्न टाकला की, तुला ओळखायचं कसं तर म्हणाली 'ठरवलं नाही, पण टु व्हीलरने किंवा बसने.'
    आपण आणखी काही विचारलं नाही. 
    उगाच कशावरून तरी रागावली तर?
    जमत आलेलं फिस्कटवायचं नाही.
    बाकीचे प्रश्न नंतर विचारु.
    'हो' म्हणाली हेच 'सही' आहे.
    पण तिने 'मी तुला कसं ओळखू'? हे विचारलं नाही. 
    का ?
    मरु दे.
    'हो' म्हणाली हेच 'सही' आहे.
    पटकन् तयार झाली म्हणजे, बरीच फॉरवर्ड दिसते. आपल्याला अशीच हवी आहे.
    विचारात अखिलला झोप लागली. हेडफोन तसेच कानात राहून गेले. केव्हातरी गाणी संपली. केव्हातरी पहाटे त्याच्या स्वप्नांना सुरुवात झाली. पिवळा रंग, निळा रंग, सिनेमा, इकॉनॉमिक्स, स्वाद, कॉलेज, गुलमोहर...हे सगळं स्वप्नात दिसू लागलं. याच सगळ्या गोष्टींनी मिळून त्याची स्वप्नं बनली. निळा रंग आणि सिनेमा, हे जरा जास्त समोर येत होते. का? हे त्याला माहीत नव्हतं. 
     सकाळी सातला निखिल उठला. झोप फार छान होती, यात त्याच्या मनाला शंकाच नव्हती. उठायच्या आधीचं सर्वात अलीकडचं स्वप्न तो पुन्हा पुन्हा आठवू लागला. तो तिची वाट पाहात हातात 'इकॉनॉमिक्स' चं पुस्तक धरून गुलमोहराच्या झाडाखाली उभा आहे. तेवढ्यात ती आपल्याच दिशेने येत आहे. या स्वप्नातून ते पुस्तक काढून टाकावं, असं त्याला वाटलं. पाहिलेलं स्वप्न असं बदलता येत नाही, ही जीवनातील बोंब आहे, हे पंधराव्या वेळेला त्याने स्वतःला समजावलं. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यापासून त्याने हे आधी जवळजवळ चौदा वेळांना स्वतःला समजावलं होतं.  त्यातल्या त्यात बरं स्वप्न हेच होतं. त्या गुंत्यापैकी जी काही विशिष्ट स्वप्नं होती, ती परवडण्यासारखी नव्हती. त्या गोष्टी फक्त स्वप्नातच शक्य होत्या.  तिलाच काय पण कोणालाच ती सांगणं शक्य नव्हतं. स्वतःला पुन्हा आठवण करुन देतानाही आजूबाजूला कोणी नाही, हे पाहणं गरजेचं होतं.  चहाच्या कपाबरोबर अलीकडच्या आधीचं स्वप्न जितकं आठवत होतं त्यावर त्याने आणखी अर्धा तास घालवला. या आधीचं स्वप्न आठवण्यासाठी त्यानं खूप मेहनत घेतली. पण आठवलंच नाही. त्याच्या लक्षात आलं की,  बाकीची  स्वप्नं अलीकडच्याच स्वप्नाची प्रचंड पर्म्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स आहेत.  गुलमोहराच्या झाडाऐवजी सिनेमा हॉलबाहेर.  कधी आपण वाट पाहायच्या ऐवजी तीच वाट पाहत आहे हातात निळा रुमाल घेऊन आणि आपण तिला भेटायला जातोय. कधी दोघंच ' स्वाद '   मध्ये सामोसा खात... 
      
     एकंदरीत, त्याच्या त्या पहाटेच्या नावावर बऱ्यापैकी स्वप्ने जमा झाली होती.
     दिवस त्याने दिवास्वप्नं पाहण्यात घालवला. दिवसाची स्वप्नं त्याने खूपच जाणीवपूर्वक पाहिली. दिवसाच्या स्वप्नांचा लगाम त्याच्याच हातात होता.  
 
     बरोबर सहाला तो 'रसना'पाशी पोचला. बाईक लावली.
     एक मुलगी दारात उभी होती. तिच्याकडे तो पाहून हसणार इतक्यात आतून बाहेर आलेल्या मुलाबरोबर ती निघून गेली. सव्वासहापर्यंत त्याने मोबाईलवरचे काही मेसेजेस  काढून टाकले.एक 'विल्स' घेतली.  त्याचा एक डोळा काही अंतरावरच्या सिग्नलकडे होता. झुरक्यांबरोबर तो ठरवत गेला...
      कॉलेज तिने सांगितलेलंच नाही.
     आज तिला विचारायचंच, 
     तुझं कॉलेज कोणतं?
     आपलं असेल तर डिव्हिजन कोणती?
     आज शिरायचं आणखी आत आत.
     आतल्या खुर्च्या रिकाम्याच होत्या पण ती आल्याशिवाय आत जायचं नाही, हे त्याने ठरवलेलं होतं. उजव्या बाजूला झालेल्या अपघाताच्या आवाजाने त्याची तंद्री भंग पावली.  हॉटेलपासून काही अंतरावरच एक अपघात झाला होता. लगेच गर्दी जमली. त्या गर्दीमुळे पलीकडचा सिग्नल दिसेनासा झाला. पोलीस येऊन गर्दी हटवेपर्यंत तेवढ्यात दोन सिग्नल सुटले. 
अखिल अस्वस्थ झाला..
कोण कोण होतं सिग्नलला कोणाला माहिती! 
ती असेल तर? 
हॉटेलजवळ अजून तरी कोणी आलेलं नाही.
अक्सिडेंटमुळे सगळा लोच्या झाला.
पुन्हा त्याने झुरके घ्यायला सुरुवात केली आणि हॉटेलसमोर रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला एक निळी साडी येऊन उभी राहिली. अखिलला वाटलं, आपल्याकडेच पाहतेय. झुरके थांबले आणि चटका बसला. वाहतूक पोलिसाने अपघाताची गर्दी हटवली. पलीकडचा सिग्नल दिसू लागला आणि सिग्नललाच एक टू व्हीलर उभी राहिली. निळी जीन्स. अखिलचं लक्ष तिकडे गेलं. दुसऱ्यांदा चटका बसला.  त्याने अभावितपणे डावीकडे पाहिलं. बसमधून एक जण उतरली. मागे वळून हॉटेलच्या दिशेला येऊ लागली. निळ्या पंजाबीमधे.  यावेळी त्याने चटका बसू दिला नाही, कारण त्याने सिगारेट आधीच विझवली होती. 
च्यायला, यातली एकच कॉलेजमधली वाटतेय. 
सिग्नलची. 
या बाकीच्या दोघी वाटत नाहीत. जरा मोठ्या वाटतात.
पण हीच असणार. सिग्नलवाली. मॅचिंग टु अवर एज.
पण कशावरुन?
काय वय सांगितलं तिनं ?
आठवत नाही. 
....भाऊ, तिने वय सांगितलेलंच नाही. आपण कुठे विचारलं वय परत परत?
सो, व्हॉट इज युअर एज...?फॉलो अप घेतला आपण?
नाही.
म्हणजे, आपण कोणाशी बोलत होतो ?
ती कॉलेजिअन नव्हतीच? कॉलेज संपून दोन वर्षे झालेली होती की पाच वर्षे झालेली होती?
मोठी असेल तर मग या या दोघींपैकीच...
असलीच मोठी तर 'विदिशा' ची 'विदिशा मॅडम' होईल की!
म्हणजे, आपली गोची.
पण ती सिग्नलचीच असणार. 'टू व्हीलर'ने येणार म्हणाली होती.
बसही म्हणाली होती. 
तिची 'टू व्हीलर' काल बिघडलेलीही असू शकते. 
ती समोरची आपल्याचकडे पाहून हसतेय का ?
आणि ही बसमधून उतरुन थेट मागेच वळली. आपल्याचकडे येतेय. तिच्या हातात काय आहे? सिनेमाची सीडी? तिला चष्माही आहे. आपल्या डोक्यात हे आलं नाही. मुलीला चष्मा आहे का, हा विचार मुद्दाम कोण करायला जाणार आहे? मुलीला चष्मा, ही कल्पना कुठे सहन होते आपल्याला? आपल्याला म्हणजे मला. आपल्या डोळ्यासमोर चष्मा नसलेलीच मुलगी येते.  पोरगी म्हटल्यावर क्यूट अँड क्लीन फेस. चष्म्याचा संबंध काय?
अखिलने स्वतःला व्यवस्थित केलं. ताठ उभा राहिला. सिगारेट फेकली. पटकन भांग पाडला आणि जी समोर येईल तिच्या स्वागतासाठी तयार झाला. आता त्याला स्वप्न नाही, सत्य पाहायचं होतं. 
-केदार पाटणकर