कॉमनवेल्थ गेम्स

कॉमनवेल्थ गेम्स अगदी तोंडाशी  येऊन ठेपले आहेत. सुमार दर्जाचे बांधकाम, सुरक्षाव्यवस्था, अस्वच्छता आणि वारेमाप भ्रष्टाचार आदी गोष्टींनी वातावरण अगदी ढवळून निघाले आहे.
 
लाल मशिदी जवळ घडलेल्या घातपाती कारवाया,कालच नेहरू स्टेडियम जवळ कोसळलेला पादचारी पूल, ३ दिग्गज ब्रिटिश खेळाडूंनी सहभागी होण्यास दर्शवलेला नकार, न्यूझीलंड ने संयोजन रद्द करायची दिलेली धमकी,कॉमनवेल्थच्या अध्यक्षांनी 'क्रिडाग्राम"स्वच्छता आणि सुव्यवस्थेवर व्यक्त केलेली प्रचंड नाराजी ह्या मुळे खेळाचा खेळखंडोबा झाला आहे. कमालीची मिसमॅनेजमेंट व भ्रष्टाचाराबद्दल न बोललेलेच बरे.

खरंच आपण ह्या सर्व गोष्टी मॅनेज करायला लायक नाही का? आंतरराष्ट्रीय समुदायापुढे आपण अजून किती नाचक्की करून घेणार? कोणत्या जिवावर आपण ऑलिंपिक ऑरगनाइझ करायची स्वप्ने पाहतो आहोत?

आंतरराष्ट्रीय क्रीडा जगतापुढे झळकायची आयती चालून आलेली संधी आपण गमावली आहे.

माझ्यामते आपण तांत्रिक आणि आर्थिक दृष्ट्या पूर्णपणे संपन्न आहोत. अभाव आहे तो मानसिकतेचा आणि कणखर नेतृत्वाचा. जरा गाजावाजा कमी करून स्वतःच्या कामाकडे लक्ष दिले तरी बरेच काही साध्य करता येईल. करूनच दाखवायचे असे मनोमन  ठरवले असेल तरी बरेच काही साध्य होते.

ह्या विषयावर आपली मते जाणून घेण्यास नक्की आवडेल.