पूर्वी संत होते …..!!

पूर्वी संत होते 
 आता  महंत आहेत
प्रत्येकाचे  आता 
मठ तयार आहेत 
ते खुणावतात तुम्हाला 
ते आव्हान  करतात
भुरळ घालतात 
नजरबंदी  करतात 
नि तुम्ही चक्क फसून  जाता 
सगळ्याच  महंतांचा  प्रवास आता विमानाने होतो 
सगळ्यांचा पदन्यास आता  फुलांच्या  पाकळयावरून  होतो 
त्यांना कोणी एक अनामिक भक्त अडीच किलो सोन्याचा हार दान करतो 
नि हे मनापासून तथास्तु तथास्तु म्हणत असतात  ….!! 
आम्ही साधे भोळे  आहोत
त्यांच्या पायाची धूळ आहोत 
त्यांच्या पायाचे तीर्थ घेण्यास 
सर्वांच्या पुढे आहोत  
पूर्वी संत समाधी घेत 
आता हे महंत भक्तास समाधी घ्यावयास लावतात 
हजारो भक्त महंताच्या नजरबंदीने 
पाण्यात चालत जातात 
जिवंत जलसमाधी  घेत थेट स्वर्गात जातात 
आह्मी भक्त आहोत 
आचार्र्याना भगवान बनवण्यात  पटाईत आहोत 
भगवानाच्या सगळ्याच लीला अगाध असतात   
त्या थेट आम्हाला संभोगातून समाधीकडे घेऊन जातात 
ते संत होते 
हे महंत आहेत 
प्रत्येकाचे साम्राज्य 
इंद्रपुरीचे राज्य आहे 
ह्यांच्या नजरेने मोठमोठे चोर देखील 
सरळसुत नि देवदूत झाले 
ह्यांचे राज्य विदेशापर्यंत गेले 
ह्यांच्या मठात सामील होण्यासाठी परदेशी खुळे खुळे झाले 
हे महंत हुशार आहेत 
ह्यांची देशी  ओषधाचे कारखाने आहेत      
ह्यांच्या टूथपेस्टने दात घासा 
शेवटपर्र्यंत  मजबूत राहण्याची हमी आहे  
शिव-शम्बो ह्यांच्या मागे ठाम उभा आहे ..
अब्जावधी रुपय्यांचा ह्यांनी रिसोर्ट काढला  आहे 
इथे या ....!
ध्यान लावा....!!                                 
योग करा ........!!!
तुमचे सगळे रोग फू  sssss....करा         
ते संत होते 
हे महंत आहेत 
ते सगळेच संत होते 
हे सगळेच महंत आहेत 
ह्यांची सत्ता बघून 
अस्तनीतील साप सुद्धा मंत्रमुग्ध होतात 
हे कुणालाही घडवतात -कुणालाही चढवतात …..!! 
तांत्रिक विद्येत हे माहीर आहेत 
मोठमोठ्याना   नादी लावण्यात हे पक्के   आहेत    
ते संत गेले                  
हे महंत आले ...........!!