कारल्याची सळीभाजी

  • पाव किलो कारली (कारली स्वच्छा धुवून ती उभी सळ्यांसारखी कापावी चित्रात दाखवल्याप्रमाणे).
  • ४-५ लसुण पाकळ्या
  • कढीपत्ता, हिंग, हळद, जिर
  • मसाला
  • थोडा लिंबू रस
  • चविपुरते मिठ
  • एक चमचा साखर
  • २ चमचे शेंगदाणा कुट
५ मिनिटे
४ ते ५ जणांसाठी

सगळ्यात आधी कारली धुवून घ्या मग त्यांची चिरफाड करून त्याच्या सळ्या जश्या बटाट्याच्या बाजारात मिळतात त्याप्रमाणे साधारण तेवड्याच आकाराच्या सळ्या करा. आता गॅसवर भांड ठेवा आग लावून भांड चांगल तापू द्या. भांडे आणि तेल तापले की जिर, हिंग, लसुण, कढीपत्ता, हळद हे फोडणीचे सैन्य तापलेल्या तेलावर सोडा. जर तेल चागले तापले असेल तर लढाई चांगली जुंपते आणि ह्याची प्रचिती आपल्याला खमंग सुटलेल्या वासातून येतो. फोडणीचा खमंग वास घेत बसू नका नाहीतर लढाईत जिन्नसांचा कोळसा होईल. भराभर परतून लगेच त्यात सळ्यांची हत्यारे सोडा अजून भडकवण्यासाठी वरून मसाला टाका. थोड परतवून शिजत ठेवा. हो पण मधून मधून ढवळत राहा नाहीतर सैन्य तळाला बसेल. आता कारल शिजत आल की त्यावर अजून लिंबुरस व मिठ चोळा म्हणजे घाला हो नाहीतर हाताने चोळायला जाल आणि मग युद्धात तुम्हीच जखमी व्हाल. परत त्यांना थोडी ढवळून चालना द्या. आता सगळे सैन्य हत्यारे थकली असतील म्हणून आता ही लढाई संपवण्यसाठी त्यावर साखर आणि शेंगदाणा कुट पसरवा आणि थोडे परवतून एक वाफ येउन गॅस बंद करा म्हणजे लढाई संपली आणि तुम्ही जिंकलात.


हे आहे लढाईचे सैन्य


येतोय का फोडणीचा वास?


ही रंगसंगती कशी वाटते?


ही आहे मी जिंकलेली लढाई.

आवडत असल्यास थोडा गोड्या मसाल्याचा मारा करा.
जर डाएटचा विचार मनात येत नसेल तर थोडे जास्त तेल टाकून ही भाजी कुरकुरीत करता येते.

स्वतःचे प्रयोग