जमले नाही

ओठावरती हास्य फुलवणे जमले नाही
तू नसता मज जीवन जगणे जमले नाही
ईश क्रपेने तुजशी नाते जुळले असते
देवा पुढती हात पसरणे जमले नाही
दरवळ देता तू आल्याची चाहुल मजला
ठोके ह्रदयाचे ना चुकणे जमले नाही
खोटे वादे खोट्या शपथा फसवे सारे
म्रगजळ पाहुन प्यास बुझवणे जमले नाही
खांद्यावरती डोके ठेउन व्यक्त कराया
नसता कोणी मजला रडणे जमले नाही
विश्वासाचा घात जरी तू केला माझ्या
राग धरूनी तुजवर रुसणे जमले नाही
तू दु:खाशी नाते माझे विणले ऍसे
तू गेल्यावर मजला हसणे जमले नाही
नियतीच्या मी तालावरती नाचत आलो
हातावरची रेघ बदलणे जमले नाही
"निशिकांताला" भूषण वाटे जखमांचे पण
ह्रदयावरचे घाव बुजवणे जमले नाही

निशिकांत देश्पांडे मो.न. 98907 99023
E MAIL: दुवा क्र. १
प्रतिसादाची अपेक्षा